03 April, 2023

 

महाज्योतीच्या वेबसाइटला 2022-23 या वर्षामधे दिली 30 लाख विद्यार्थ्यांनी भेट

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक विचारकार्याला स्मरुन आधुनिक समाज निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत महराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात.

यात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना, जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षा प्रशिक्षण योजना. एम.पी.एस.सी. परीक्षा प्रशिक्षण योजना, यु.पी.एस.सी. परीक्षा प्रशिक्षण योजना, यु.पी.एस.सी. नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य योजना, कमर्शिअल पायलट प्रशिक्षण योजना, पीएच.डी. करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती योजना, एम.फिल. करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती योजना, कौशल्य विकास योजना या योजनांचा समावेश आहे.

या सर्व योजनांची विस्तृत माहिती महाज्योतीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 2022-23 या वर्षात तब्बल 30 लाख विद्यार्थ्यांनी या वेबसाईटला भेट दिली आहे आणि सदर योजनांचा लाभ करुन घेतला आहे. महाज्योतीच्या WWW.mahajyoti.org.in या वेबसाइटवर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. आपल्या वैयक्तिक विकासासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी महाज्योतीच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केलेले आहे.   

*****

No comments: