'शासकीय योजनांची जत्रा' कार्यक्रमांतर्गत
लाभार्थ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ द्यावा
-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली
(जिमाका), दि.24 : सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत
पोहोचावा या हेतूने शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थींना थेट लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी
‘शासकीय योजनांची जत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाची
अंमलबजावणी करताना सुसूत्रता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विभागनिहाय नियोजन केले
आहे. या अभियानाच्या गतीमान अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा जनकल्याण कक्ष असणार
आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन लाभार्थ्यांना जास्तीत जास्त योजनांचा
लाभ देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री शासकीय योजना गतीमान अंमलबजावणी अभियानांतर्गत
'शासकीय योजनांची जत्रा' कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सर्व विभागप्रमुखांची बैठक
नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री
पापळकर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार आदी उपस्थित होते.
शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाच्या माध्यमातून
प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यत शासन योजनांचा लाभ पोहचला पाहिजे. प्रत्येक गावनिहाय,
तालुकानिहाय, नियोजन आराखडा तयार करावा लागणार आहे. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या
योजनांचा आराखडा तयार करावा. वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ या माध्यमातून
दिला जाणार आहे. गरजूपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी
दि. 15 एप्रिल ते 15 मे, 2023 या काळात नागरिकांना
योजनांची माहिती देऊन प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करावयाची आहे. या अभियानांतर्गत
किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
येणार आहे. सीएससी सेंटरची नावनोंदणीसाठी मदत घेण्यात येणार आहे. शासकीय योजनांची जत्रा हे अभियान मिशन मोडवर राबविले
जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी सांगितले.
यावेळी कृषि, ग्रामविकास, महसूल विभागांसह
शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment