30 April, 2019

एमएचटी-सीईटी 2019 परीक्षा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने * 2 ते 13 मे या कालावधीत होणार परिक्षा * परिक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू * हिंगोली येथील न्यू मॉडल डिग्री कॉलेज येथे होणार ऑनलाईन परिक्षा * परिक्षार्थी उमेदवारांनी अधिकृत एक ओळख पत्र सोबत आणाणे आवश्यक.



एमएचटी-सीईटी 2019 परीक्षा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने
* 2 ते 13 मे या कालावधीत होणार परिक्षा
* परिक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू
* हिंगोली येथील न्यू मॉडल डिग्री कॉलेज येथे होणार ऑनलाईन परिक्षा
* परिक्षार्थी उमेदवारांनी अधिकृत एक ओळख पत्र सोबत आणाणे आवश्यक.
                                                                                  
           हिंगोली,दि.30: शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी 2019 ही प्रवेश परीक्षा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने न्यू मॉडल डिग्री कॉलेज औंढा रोड, हिंगोली या ठिकाणी परीक्षा होणार आहे. सदर परीक्षा दिनांक 2 ते 13 मे, 2019 (दिनांक 4 व 5 मे, 2019 हे दोन दिवस वगळून) सकाळ सत्राची वेळ 7.30 ते 1.45 पर्यंत व दुपार सत्राची वेळ 12.30 ते 6.45 पर्यंत या वेळेत होणार आहे.
            सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
          परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी परिक्षेस येतांना आपले प्रवेश पत्र (हॉल टिकिट) तसेच राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत सूचित केलेल्या कोणते ही  छायाचित्र आसलेले एक अधिकृत ओळखपत्राची मुळ (ओरिजनल) प्रत (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळख पत्र, बॅंकेचे पास बुक इत्यादी) सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्या नावांत बदल झालेला असेल त्यांनी गॅझेट नोटीफिकेशन, विवाह प्रमाणपत्र किंवा नांव बदला बाबतचे शपथ पत्र यापैकी एक पुरावा सोबत आणावा.
सदर अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी 2019 ही प्रवेश परीक्षा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने न्यू मॉडल डिग्री कॉलेज या ठिकाणी होणार असल्याने सदर परिक्षा केंद्राची पूर्वतयारी बाबतचा आढावा आज अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, पॉलिटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य श्री. पाटील यांनी घेतला.
          सदरील परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती हाताळण्यासाठी परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****






29 April, 2019

पाणीपट्टीची रक्कम न भरल्याने इसापूर धरणातून पाणीपूरवठा बंद


पाणीपट्टीची रक्कम न भरल्याने इसापूर धरणातून पाणीपूरवठा बंद

        हिंगोली,दि.29: उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) यामध्ये वर्ष 2018-19 करिता जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडून टंचाई कालावधीकरिता जिल्हा परिषद, हिंगोली तर्फे ग्रामीण पाणी पुरवठ्या करिता 12.00 द.ल.घ.मी. पाणी आरक्षित करण्यात आले आहे.
            दरवर्षी या विभागातर्फे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बिगर सिंचन पाणी सोडण्यात येते, तथापि आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयाकडून पूर्णपणे भरणा केली जात नाही. जून 2018 अखेर जिल्हा परिषद, हिंगोली यांचेकडे रु.278.696 लक्ष व वर्ष 2018-19 करिता आरक्षित पाण्याची 50 %  अग्रीम पाणीपट्टी रु. 21.60 लक्ष अशी एकूण रु. 300.296 लक्ष पाणीपट्टी थकीत आहे. यापैकी फक्त रु. 3.00 लक्ष पाणीपट्टी भरणा करण्यात आलेली आहे. शासन निर्णयान्वये आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग, नांदेड यांनी कळविले आहे.
****


पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


 पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.29: सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
पालकमंत्री श्री. कांबळे यांचे मंगळवार, दिनांक 30 एप्रिल, 2019 रोजी सायंकाळी 6.00 वाजता हिंगोली येथे आगमन व राखीव. बुधवार दिनांक 1 मे, 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ (स्थळ : पोलीस कवायत मैदान, हिंगोली), सकाळी 10.30 वाजता हिंगोली येथून वाहनाने जिंतूर-जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

****

24 April, 2019

जलजन्य आजार व दुषित पाण्यामुळे होणारे साथींचे आजार टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन



जलजन्य आजार व दुषित पाण्यामुळे होणारे साथींचे आजार
टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन
        हिंगोली,दि.24: महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या तीव्र उन्हाळा जानवत असून काही गावात पुढील काळामध्ये पाणी टंचाई बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा पाणी टंचाईच्या काळात लोक उपलब्ध होईल तेथील पाणी पिण्यासाठी वापरतात. अशावेळी आपण पिण्यासाठी वापरत असलेले पाणी दुषित तर नाही ना याची खात्री करुनच ते पिण्यासाठी वापरावे. सदरचे पाणी जर दुषित असेल तर त्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर व इतर पोटाचे विकार होण्याची किंवा साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.           
            वरील जलजन्य आजार व दुषित पाण्यामुळे होणारे साथींचे आजार टाळण्यासाठी जनतेने पुढील प्रमाणे काळजी घ्यावी - आपल्या गावात टॅंकरने पाणी पुरवठा होत असल्यास त्या पाण्याचे ब्लिचिंग पावडर द्वारे शुध्दीकरण झाले आहे किवा नाही याची खात्री करावी, गावामध्ये विहीर, हातपंप किंवा नळ योजनेमार्फत पाणी पुरवठा होत असल्यास पुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांचे नियमित पाणी शुध्दीकरण होते किंवा नाही याची खात्री करावी, हॉटेल्स, रसवंती या सारख्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्यास तसेच अशुध्द पाणी पुरवठा आढळून आल्यास अशा ठिकाणचे पदार्थ खाणे/पिणे टाळावे, लहान मुलांना आईस्‍क्रीम,  बर्फ गोळे उघड्यावरील पदार्थ खावू घालणे टाळावे, पिण्यासाठीचे पाणी उकळून व गाळून प्यावे, दुषित पाण्यामुळे साथसदृष्य परिस्थिती आढळून आल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी  संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****


महाराष्ट्र दिन पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न



महाराष्ट्र दिन पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न
        हिंगोली,दि.24: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण दिनांक 1 मे रोजी येथील पोलिस कवायत मैदानावर सकाळी 8.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी दिले आहेत. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिन साजरा करणे बाबतची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री. मिणियार बोलत हेाते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक श्री. मैराळ, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास, प्रकल्प संचालक        श्री. घुले, कौशल्य विकास रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक रेणुका तम्मलवार, तहसिलदार गजानन  शिंदे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी म्हणाले की, महाराष्ट्र दिनाचा मुख्य समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या सर्व विभागानी आपली जबाबदारी योग्यपणे व इतर विभागाशी समन्वय ठेवून पार पाडावी. सर्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस मुख्यालयावर मुख्य ध्वजारोहणाच्या अनुषंगाने मंडप, मैदानाची दुरुस्ती, ध्वजस्तंभाची रंगरंगोटी या व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करावे.  त्याप्रमाणेच मुख्य कार्यक्रमात पथ संचलनात सहभागी होणाऱ्या पोलिस कर्मचारी व विद्यार्थी तसेच नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना सुर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.
पुरस्कार प्रदान करण्यासाठीची माहिती 26 एप्रिल पर्यंत सादर करावी
1 मे महाराष्ट्र दिनी विविध विभागामार्फत पुरस्कार प्रदान केले जातात. सदर पुरस्कार ज्या विभागाना प्रदान करावयाचे आहेत त्यांनी ज्यांना पुरस्कार प्रदान करायाचा आहे त्यांची सविस्तर माहिती व सदर पुरस्कार वितरणांच्या शासन निर्णयासह माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार विभागाकडे शुक्रवार, दि. 26 एप्रिल पर्यंत सादर करावी अशा सूचना ही निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.
****


18 April, 2019

हिंगोली लोकसभेसाठी अंदाजे 64 टक्के मतदान


हिंगोली लोकसभेसाठी अंदाजे 64 टक्के मतदान

हिंगोली,दि.18 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून कोणत्याही अनुचित घटनेशिवाय मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 63 ते 64 टक्के मतदान झाले असून 65 टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत सर्व मतदार संघातून आकडेवारी प्राप्त करण्याचे काम सुरु असून, उद्या या संदर्भात निवडणूक आयोगामार्फत अधिकृत आकडेवारी जाहीर होणार असल्याची  माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंगोली मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते 9 या दरम्यान 7.68 टक्के मतदान झाले होते. तर सकाळी 11 पर्यंत ही टक्केवारी 20.56 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 34.01 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 45.97 टक्के, सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 56.22 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. तथापि किनवट मतदार संघातील 17 मतदान केंद्र तर हदगाव मधील 16, वसमत मधील 13, कळमनुरी मधील 19 आणि हिंगोली मधील 11 मतदान केंद्र या एकुण 76 मतदान केंद्रावर अद्याप ही मतदान सुरु असून सुमारे रात्री 8 ते 9 पर्यंत हे मतदान संपण्याची शक्यता आहे. या एकुण 76 मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती ही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
आपला मताधिकार अधिकाधिक मतदारांनी बजावावा याकरीता यावेळेस निवडणूक आयोगाने वेगवेगळया उपाय योजना केल्या होत्या. उष्णतेची लाट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या होत्या. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर सावलीकरीता मंडप घालण्यात आले होते. यामुळे मतदारांना सोय झाली. याशिवाय पिण्याचे पाणी, निवडणुकीच्या साहीत्यापासून तर मतदान केंद्रावरील रॅम्प, विद्युत व्यवस्था, मेडीकल किट, वाहन, दिव्यांगासाठी व्हीलचेअर या सर्व सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध् करुन देण्यात  आल्या होत्या.
तसेच जिल्ह्यातील सर्व माध्यमांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन, यास विविध माध्यमातून चांगली प्रसिध्दी दिल्याने श्री. जयवंशी यांनी सर्व माध्यम प्रतिनिधीचे यावेळी आभार मानले.

****

16 April, 2019

नियंत्रण कक्षाची स्थापना


नियंत्रण कक्षाची स्थापना

हिंगोली, दि.16: राज्यातील लोकसभा मतदार संघातील दुकाने व आस्थापना, निवासी  हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने सुविधाकार तथा मुख्य समन्वयक एस. के. भंडारवार यांच्या अधिपत्याखालील नांदेड, हिंगोली व परभणी लोकसभा मतदार संघनिहाय  नियंत्रण कक्ष/दक्षता कक्ष स्थापन  करण्यात करण्यात आली आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघाकरिता माथाडी लेखापाल तथा नियंत्रण कक्ष प्रमुख वसंत पाटील (मो.9890561687), माथाडी लिपिक तथा नियंत्रण कक्ष सहायक एम.एम. नाईक (मो.9623922867) तर शिपाई तथा नियंत्रण कक्ष सहायक उत्तम बलकुते (मो.8007901738) यांची या नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियंत्रण कक्ष दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यरत राहील, असे सहायक कामगार आयुक्त, नांदेड यांनी कळविले आहे.
****


जिल्ह्यात मद्य विक्रीस मनाई

जिल्ह्यात मद्य विक्रीस मनाई

हिंगोली, दि.16 : भारत निवडणुक आयोगाने त्यांच्या दि. 10 मार्च, 2019 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये लेाकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 च्या कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानूसार महाराष्ट्रातील हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी निवडणुक घेण्यात येणार आहे. तसेच दिनांक 23 मे, 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. सदर निवडणुक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रीया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या 48 तासांमध्ये मद्यविक्री  करण्यास मनाई/कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135 सी अन्वये तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात व शहरात दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदर पासून तसेच दिनांक 23 मे, 2019 रोजी मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री  मनाई / कोरडा दिवस म्हणून जाहिर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
**** 

ईव्हीएम सुरक्षा कक्षाच्या परिसरात फौजदारी प्रक्रीया कलम 144 लागू


ईव्हीएम सुरक्षा कक्षाच्या परिसरात फौजदारी प्रक्रीया कलम 144 लागू

हिंगोली, दि.16: भारत निवडणुक आयोग यांचेकडून सन-2019 लोकसभा सार्वत्रिक  निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदरील निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार या कार्यालयाची अधिसूचना दिनांक 10 मार्च, 2019 अन्वये 15- हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये गुरुवार दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रीया संपल्यानंतर 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील 82-उमरखेड, 83-किनवट, 84-हदगांव, 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाचे सिलबंद ईव्हीएम मशीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, लिंबाळा मक्ता, औंढा नागनाथ रोड , हिंगोली येथे स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा कक्ष मध्ये ठेवण्यात येणार आहेत. सदरील सुरक्षा कक्षाच्या परिसरात आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होणार नाही तसेच सदरील परिसर शांततामय राहण्याच्या दृष्टाकोनातून ईव्हीएम मशिन सुरक्षा कक्षच्या 200 मीटर परिसरातील पक्षकारांची मंडप उभारणे व ज्या परिसरातील सर्व दूकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालू ठेवण्यास तसेच निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त खाजगी वाहने,  निवडणुकीच्या कर्तव्यावरील इसमा व्यतिरिक्त इतर इसमांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
          फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये हिंगोली येथे 15-हिंगोली लोकसभा  मतदारसंघाच्या सिलबंद ईव्हीएमसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाच्या 200 मीटरच्या  परिसरात दिनांक 18 एप्रिल, 2019 चे 00.00 वाजे पासून ते दिनांक 23 मे, 2019 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहतील. तसेच हे प्रतिबंधात्मक आदेश निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना व निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाहीत, असे रुचेश जयवंशी, जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.           
****

15 April, 2019

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 पुर्वतयारीचा निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी घेतला आढावा




लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 पुर्वतयारीचा
निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी घेतला आढावा

हिंगोली,दि.15: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी होणार आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी लोकसभा मतदार संघनिहाय मतदान प्रक्रिया व पूर्व तयारीचा यावेळी  आढावा घेतला.
यावेळी डॉ. रवीशंकर म्हणाले की, येणारे 72 तास अतिमहत्वाचे असून निवडणूक प्रक्रियेशी संबंधीत सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी. तसेच लोकसभा निवडणुका पारदर्शकपणे, निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले.
यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक योगेशकुमार, खर्च निवडणूक निरिक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, सहाय्यक निवडणूक निरिक्षक अतुल चोरमारे, प्रशांत खेडकर, प्रविण फुलारी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती.

****

निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चे प्रकाशन






निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चे प्रकाशन


‘लोकसभा निवडणूक 2019 राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज’

हिंगोली,दि.15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येणारे राज्य शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ मासिक ‘लोकसभा निवडणूक 2019 राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज’ या विशेषांकाचे प्रकाशन निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक योगेशकुमार, खर्च निवडणूक निरिक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, सहाय्यक निवडणूक निरिक्षक अतुल चोरमारे, प्रशांत खेडकर, प्रविण फुलारी आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने एप्रिल व मे महिन्याचा ‘लोकराज्य राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज’ या लोकाराज्य विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहे. या लोकराज्य विशेषांकामध्ये लोकशाहीचा महोत्सव या सदरात 2019 चा निवडणूक कार्यक्रम, विश्वासपात्र व पारदर्शक या सदरामध्ये यंदा प्रथमच वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राबाबत माहिती, स्वीप कार्यक्रमामधून मतदान जनजागृती माहिती, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची सविस्तर माहिती, ‘मतदान प्रक्रियेविषयी सारे काही मतदारांसाठी’ हे सदर असून पेड न्यूज, समाज माध्यमे तसेच  जाहिरात प्रमाणिकरण आदीं विषयी मासिकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच ‘सदैव दक्ष तिसरा डोळा’ या सदरात सी व्हीजील ॲप, आचारसंहिता पालनाबरोबरच 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणूकीतील सर्व मतदार संघाची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मासिकात या दोन्ही निवडणूकीतील एकूण मतदार, एकूण झालेले मतदान आणि प्रमुख पक्षाचे उमेदवार व त्यांना मिळालेल्या मतांचा समावेश आहे.
यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****







राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक


राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक
 मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिरातींबाबत आदेश

हिंगोली,दि.15 : मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार प्राप्त झालेले तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही.
15- हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता दूसऱ्या टप्प्यात दि. 18 एप्रिल रोजी मतदान होत असून त्या अनुषंगाने दिनांक 17 व 18 एप्रिल रोजी प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिराती प्रसिद्धीपूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती (एमसीएमसी)  यांच्याकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे.


मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत


मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत

        हिंगोली,दि.15: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता दूसऱ्या टप्प्यात गुरुवार, दि. 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांनी दि. गुरुवार, दि. 18 एप्रिल, 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याचे यापूर्वीच कळविले आहे.
लोकसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे, यासाठी निवडणुक क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, व्यापार, औद्योगिक उपक्रम व इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा अपवादात्मक अत्यावश्यक सेवेत (प्रोसेसिंग/ उत्पादन प्रक्रीया असल्यास) जिल्हाधिकारी किंवा मनपा आयुक्त यांच्या पूर्व परवानगीने  दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड यांनी केले आहे.

****

13 April, 2019

विविध प्रकरणात आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यावर कार्यवाही


विविध प्रकरणात आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यावर कार्यवाही


हिंगोली,दि.13: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याअनुषंगाने मतदार संघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी हे निवडणूक मतदान पूर्व तयारीच्या पाहणीकरीता दि. 12 एप्रिल रोजी किनवट मतदार संघाच्या दौऱ्यावर गेले असता त्यांनी विविध पक्षाच्या सहा प्रचार वाहनांची तपासणी केली. यापैकी पाच वाहनांची तपासणी करुन सोडून दिले तर एक वाहन जप्त करण्यात आले.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जयवंशी यांना किनवट येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी विविध पक्षाचे प्रचार वाहने निदर्शनास आले. सदर वाहनाची तपासणी केली असता, यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तीन आणि शिवसेना पक्षाच्या एका वाहनाच्या दर्शनी भागावर मूळ परवाना नसल्याचे निदर्शनास आले. परंतू सदर वाहनाचे कागदपत्र सोबत असल्याने संबंधीतांना सक्त ताकीद देत नोटीस देवून सदर वाहन सोडण्यात आले. तसेच वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या दोन वाहनांसोबत मूळ परवाना असल्याने सदर वाहनांची तपासणी करुन सोडण्यात  आले. परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचार वाहन क्र. एम.एच.22 ए ए 1924 या वाहनावर प्रकाशक, मुद्रक व प्रतिनीधी यांची नांवे नसल्याचे निदर्शनास आल्याने आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन प्रकरणी कार्यवाही करुन सदर वाहन जप्त करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख आदींची उपस्थिती होती.
कळमनुरी मतदारसंघात शुक्रवार दि. 12 एप्रिल, 2019 रोजी आखाडा बाळापूर येथे शिवसेना-भाजप युतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेत जाणाऱ्या लोकांना हनुमंत रामचंद्र गिते या इसमाने विनापरवाना मंडप, लोकांना खाद्य पदार्थ, पाण्याच्या बाटलीचे मोफत वाटप करुन प्रलोभन दाखवुन उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी खर्च केला. तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच शिवसेना-भाजप युतीच्या प्रचार सभेला लोकांची गर्दी व्हावी या उद्देशाने शिवसेना-भाजप युती पक्षामार्फत लोकांसाठी मोफत वाहनाची व्यवस्था करुन लोकांना सभेच्या ठिकाणी आणल्याची तक्रार निवडणूक निरीक्षक यांना प्राप्त झाली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश संबंधीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली आहे.

****

पेड न्यूज प्रकरणी दोन उमेदवारांना नोटीस · समितीमार्फत आतापर्यंत 4 उमेदवारांना 7 तर इतर 18 जणांना नोटीसा


पेड न्यूज प्रकरणी दोन उमेदवारांना नोटीस

·   समितीमार्फत आतापर्यंत 4 उमेदवारांना 7 तर इतर 18 जणांना नोटीसा
हिंगोली, दि.13: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता निवडणूकीतील राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या दैनंदिन प्रचाराच्या प्रसिध्द होणाऱ्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील संशयीत पेड न्युजवर माध्यम प्रमाणन सनियंत्रण समिती मार्फत लक्ष ठेवून योग्य कार्यवाही करण्यात येत आहेत.
15-हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवार त्रिशला मिलिंद कांबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांची उमेदवारी अवैध ठरविण्यासाठी शिवसेना पक्षासोबत कट रचून, पत्रकार परिषदेचे आयोजन करुन पत्रकारांना बातमीच्या बदल्यात जाहिराती किंवा पैसे देवून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात बातम्या प्रसिध्द करण्याबाबतची तक्रार पुराव्यासह निवडणूक विभागास प्राप्‍त झाली होती. त्यानुसार काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांची उमेदवारी अवैध ठरविण्याबाबतची बातमी काही वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली आहे. या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक यांना प्राप्त झालेल्या पुराव्यानुसार अपक्ष उमेदवार त्रिशला मिलिंद कांबळे यांना सदर प्रकरणांबाबत पैसे व जाहिरातीचे आमिष दाखवून छापून आणलेल्या बातम्यांचा खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात का समाविष्ट करु नये? अशी विचारणा समितीने केली आहे. तसेच या प्रकरणाबाबत निवडणूक विभागास प्राप्त झालेल्या पुराव्यात शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या नावांचा उल्लेख आला असल्याने त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का? तसेच छापून आणलेल्या बातम्यां पेड न्यूज म्हणुन गृहीत का धरु नये? आणि त्याचा खर्च आपल्या निवडणू‍क खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावली आहे.
तसेच शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ तामसा ता. हदगाव, जि. नांदेड येथे झालेल्या प्रचार सभेचे वृत्त बुधवार दि. 10 एप्रिल, 2019 रोजीच्या दैनिक लोकमत आणि दैनिक देशोन्नती या वृत्तपत्रात ‘उमेदवार म्हणुन आम्ही पाठीशी-सुर्यकांता पाटील’ मथळ्याखाली समान मजकुर असलेले वृत्त प्रसिध्द झाले आहे. याकरीता सदर वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्त पेड न्यूज म्हणुन गृहीत का धरु नये? आणि त्याचा खर्च आपल्या निवडणू‍क खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावली आहे.
यापूर्वी माध्यम, प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन न घेता समाज माध्यमावर  निवडणूकीचा प्रचार-प्रसार केल्याबाबत 4 उमेदवारांना 07 आणि व्हॉट्स ॲपचा गैरवापर करुन प्रचार-प्रसिध्दी केल्याने 18 जणांना समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  रूचेश जयवंशी यांनी नोटीस बजावली आहे.

*****

12 April, 2019

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.12: जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक संबंधी दिनांक 10 मार्च 2019 पासून आचारसंहिता लागू झाली असून दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणुक संबंधी जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारसभा, बैठका चालू आहेत.
            तसेच दिनांक 13 एप्रिल रोजी रामनवमी हा सण साजरा होणार असून रामनवमी निमित्त राम मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा  करण्यात येतो व मिरवणुका, पालखी मिरवणुका काढण्यात येतात.दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पो.स्टे. हद्दीमध्ये मिरवणुका निघणार आहेत. सदरील मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी असतो. दिनांक 17 एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी होणार असून वसमत, हिंगोली, कळमनुरी या ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. दिनांक 19 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी  होणार आहे. सर्व हनुमान मंदिरांमध्ये जन्मोत्सव  साजरा केला जातो.
            अशा सर्व विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 12 एप्रिल 2019 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 26 एप्रिल, 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****


11 April, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन




जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

        हिंगोली,दि.11: महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            निवडणुक निरीक्षक (सामान्य) डॉ. जे. रविशंकर, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार,  निवासी उप जिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) गोविंद रणविरकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****


10 April, 2019

हिंगोली मतदार संघात दिव्यांग मतदारांसाठी जय्यत तयारी




हिंगोली मतदार संघात दिव्यांग मतदारांसाठी जय्यत तयारी


हिंगोली,दि.10: 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणाऱ्या निवडणूकीत जिल्ह्यात 3 हजार 677 दिव्यांग मतदारांची नोंद झाली असून PWD App मुळे दिव्यांग मतदारांमध्ये वाढ होत आहे. तसेच 962 मतदान केंद्रावर ‘रॅम्प’ ची व्यवस्था करण्यात आली असून 39 मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर प्रवेश करून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य सहजतेने हाताळता यावे व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन, मतदान केंद्रांवर कोणतीही गैरसोय होऊ नये याकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, यांनी सर्व संबंधित विभागाला दिल्या होत्या.
त्यानुसारु संबंधित विभागानी दिव्यांग मतदानाची जय्यत तयारी केली असून 18 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मतदानासाठी 3 हजार 677  दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रात कोणत्याही अडथळयाशिवाय प्रवेश करण्यासाठी हिंगोली, वसमत व कळमनुरी या तीन विधानसभा मतदार संघातील क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत 39 मतदान केंद्रावर ‘रॅम्प’ ची व्यवस्था करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना सुखरूप मतदान केंद्रावर आणणे आणि मतदान करून घरी सुखरूपपणे सोडणे यासाठी सदर मतदान केंद्रावर स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांना तत्काळ मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येईल, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर देण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष वाहनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.
यावेळी रुचेश जयंवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, एच. पी. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी व भाऊसाहेब जाधव, भाऊराव चव्हाण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यासह पंचायत समितीचे, नगर पालिकेचे, नगर पंचायतीचे व समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दिव्यांगानी PWD App चा उपयोग करुन जास्तीत-जास्त दिव्यांग मतदारांनी नांव नोंदणी करावी व सर्वांनी गुरुवार 18 एप्रिल, 2019 रोजी सकाळी 7.00 ते  सांयकाळी 6.00 या वेळेत 100% मतदान करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
****



09 April, 2019

मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता होणार सुरुवात



मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता होणार सुरुवात

हिंगोली,दि.09: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ निवडणूकीचे मतदान दूसऱ्या टप्प्यात होणार असून गुरुवार दि. 23 मे, 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीची प्रक्रीया गुरुवार दि. 23 मे, 2019 रोजी सकाळी ठिक 8.00 वाजता सुरु करण्याचे  मा. भारत निवडणूक आयोग आणि मा. प्रधान सचिव तथा मुख्य निवडणुक अधिकारी  यांचे निर्देश आहेत. त्यानुसार गुरुवार दि 23 मे, 2019 रोजी सकाळी ठिक 08.00 वाजता मतमोजणीस सुरुवात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****



08 April, 2019

राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिरातींबाबत आदेश


राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिरातींबाबत आदेश

हिंगोली,दि.08 : मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार प्राप्त झालेले तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही.
15- हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता दूसऱ्या टप्प्यात दि. 18 एप्रिल रोजी मतदान होत असून त्या अनुषंगाने दिनांक 17 व 18 एप्रिल रोजी प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिराती प्रसिद्धीपूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती (एमसीएमसी)  यांच्याकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे.

****


मतदान प्रक्रियेमध्ये सुक्ष्म निरिक्षकांची भूमिका महत्वाची निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर





मतदान प्रक्रियेमध्ये सुक्ष्म निरिक्षकांची भूमिका महत्वाची

निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर

हिंगोली,दि.08: सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑर्ब्जव्हर्स) हे भारत निवडणूक आयोगाचे कान डोळे असून या निवडणूक प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डी.पी.सी. सभागृहात आयोजित सुक्ष्म निरीक्षकांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना      श्री. रवीशंकर हे बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्यासह सर्व निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होते.
यावेळी श्री. रवीशंकर म्हणाले की, मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोलींग (अभिरुप मतदान) या मतदान प्रक्रियेपासून ते सायंकाळी मतदान संपेपर्यत घडणाऱ्या सर्व घटनांचे अवलोकन करुन त्या माहितीचा अहवाल हा निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांच्या मार्फत मा. निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो. मतदानाच्या वेळी घडणाऱ्या अनुचित घटना, तक्रारीचे प्रसंग अथवा कोणतीही कायदा मोडणारी बाब यावर कारवाई करण्यापूर्वी मा. निवडणूक आयोग हा सुक्ष्म निरीक्षकाकडून आलेल्या अहवालाची दखल घेत असतो. सुक्ष्म निरीक्षकाचे काम हे संवदेनशील असून, मतदानाच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सुक्ष्म निरीक्षकास असणे आवश्यक आहे. सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती ही शक्यतो ज्या मतदान केंद्रावर संवदेनशील अथवा तणावग्रस्त वातावरण आहे त्या ठिकाणी करण्यात येते. या निवडणूका नि:पक्ष आणि मोकळया वातावरणात होण्यासाठी निवडणूकीचे सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असे               श्री. रवीशंकर म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले की, निवडणूक सुक्ष्म निरीक्षक हे मुख्य निवडणूक निरीक्षक आणि             मा. निवणूक आयोगास उत्तरदायी आहेत. मतदान प्रक्रियेत सुक्ष्म निरिक्षकांची भूमिका ही खुप महत्वाची असते. मतदार संघाचे मुख्य निवडणूक निरिक्षक हे सर्व ठिकाणी पोहोचू शकत नसल्याने यावेळी मतदान केंद्रावर नियुक्ती केलेले सुक्ष्म निरीक्षक हे मुख्य निवडणूक निरिक्षक आणि मा. निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणुन काम करतात.
यावेळी श्री. कऱ्हाळे यांनी निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांच्या कामकाजाबद्दलचे सादरीकरणाद्वारे सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका चांगल्यारितीने पार पाडता यावी यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर होणारी कामकाज प्रक्रिया, तेथील अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेची सविस्तर माहिती दिली. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थीना नियमावली पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
****