मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध
करा
निवडणूक
निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर
हिंगोली,दि.08: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ निवडणूक मतदान दूसऱ्या
टप्प्यात होणार आहे. मतदारांकरीता मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे
मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहे. परंतू अजूनही मतदार संघातील काही मतदान केंद्रावर
मतदारांकरीता मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असून, सदर मुलभूत सुविधा
उपलब्ध करण्याचे निर्देश निवडणूक निरिक्षक (सामान्य) डॉ. जे. रवीशंकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत
ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी एच.पी. तुम्मोड, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह
नोडल अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी श्री. रवीशंकर म्हणाले की, हिंगोली लोकसभा
मतदार संघाकरीताची निवडणूक मतदान दूसऱ्या टप्प्यात दि. 18 एप्रिल, 2019 रोजी होणार असून, हिंगोली लोकसभा मतदार संघात एकुण 1 हजार 990 मतदान केंद्र
आहेत. काही मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, स्वच्छता गृह, पुरेशी प्रकाश व्यवस्था अशा
प्रकारच्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने
जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा असणे
बंधनकारक आहे. यात जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प, व्हिल चेअर, मतदानासाठी
रांगेत उभे असलेल्या मतदारासाठी बसण्यासाठी खुर्च्या/बेंच, पिण्याचे पाणी, योग्य प्रकाश
व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष, प्रसाधनगृह, उन्हापासून संरक्षणासाठी शेड
आदींचा समावेश आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर या सोयी सुविधा नसल्याचे
स्पष्ट झाले असून, येत्या 03 दिवसात सर्व मतदान केंद्रावर या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या
दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेला यावेळी निवडणूक निरिक्षक (सामान्य)
डॉ. जे. रवीशंकर यांनी दिले.
सद्या उन्हाळा सुरु असल्याने तापमानात तीव्रतेन
वाढ होत आहे. मतदारांना उष्माघाताचा धोका होवू नये याकरीता आरोग्य विभागाने आरोग्य
केंद्रावर उपचारांची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी
यावेळी दिल्या.
No comments:
Post a Comment