आरोग्यमंत्र्यांकडून आरोग्य सुविधांची पाहणी ; बालकांची आस्थेवाईकपणे विचारपूस
हिंगोली, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाला आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
आरोग्य संवाद यात्रा 2026 अंतर्गत आयोजित या भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य संस्थेतील विविध सुविधांचा आढावा घेतला. यावेळी आमदार संतोष बांगर, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले उपस्थित होते.
*आरोग्य सुविधांचा घेतला आढावा*
आ. बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, माता व बाल आरोग्य सेवा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची माहिती आरोग्यमंत्र्यांनी घेतली. उपलब्ध वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
ग्रामीण नागरिकांशी थेट संवाद साधून आरोग्य सेवा वेळेत व नियमितपणे मिळतात का, उपचार घेताना कोणत्या अडचणी येतात, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ उपक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत नागरिकांमध्ये असलेली जागरूकता तसेच योजनांचा लाभ मिळत असल्याबाबतही त्यांनी विचारणा केली.
*हृदयशस्त्रक्रिया झालेल्या बालकांची विचारपूस*
उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांची प्रत्यक्ष माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी आणि सूचनांची दखल घेत आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयशस्त्रक्रिया झालेल्या बालकांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत बालकांना पुढील उपचार व आरोग्य सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वी शस्त्रक्रीया झालेल्या बालकांनी मंत्री श्री. आबीटकर यांना पुष्प देवून स्वागत केले. यावेळी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरणही करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment