06 October, 2019

कायदा व सुव्यवस्था निरीक्षक दिपक कुमार यांचे हिंगोलीत आगमन


कायदा व सुव्यवस्था  निरीक्षक
दिपक कुमार यांचे हिंगोलीत आगमन

            हिंगोली, दि.5 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली मतदार संघाकरिता भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी दिपक कुमार यांची कायदा व सुव्यवस्था निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
श्री. दिपक कुमार यांचे हिंगोली येथे आगमन झाले आहे. त्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वागत केले. श्री. दिपक कुमार निवडणुकीबाबत नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 10 ते 11 या वेळेत  उपलब्ध असतील त्यांचा संपर्क क्रमांक 7820874073 असा आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी चेरले त्यांचे संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक  9923588115 असा आहे.
*****

आम्ही मतदान करणार… चुनाव पाठशालेत महाविद्यालयीन-युवकांचा निर्धार


आम्ही मतदान करणार…
चुनाव पाठशालेत महाविद्यालयीन-युवकांचा निर्धार




            हिंगोली, दि.5 : आम्ही मतदान करणार, नातेवाईकांनाही करण्याचा आग्रह धरणार, असा निर्धार आदर्श महाविद्यालयातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी आज केला.
            हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आदर्श महाविद्यालयात ‘चुनाव पाठशाला’ आयोजित करण्यात आली होती. या पाठशाळेत विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाणे निर्धार केला.
            या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेष फडसे, स्वीपचे समन्वय अधिकारी प्रा. गणेश शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य बी. डी. वाघमारे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, पशुसंवर्धन अधिकारी प्रवीणकुमार घुले आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, मतदान राज्यघटनेने दिलेला पवित्र अधिकार आहे. तो युवकांनी बजवावा. त्याचबरोबर भाऊ-बहिण, आई-वडील आणि इतर नातेवाईकांनाही मतदान करण्यासाठी आग्रह करा.
            पोलीस अधीक्षक योगेश कुमार म्हणाले,युवकांनी मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट होण्यासाठी योगदान द्यावे.
            श्री. फडसे यांनीही युवकांना मतदान करुन लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
            यावेळी प्रा. गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी युवकांना निवडणूक, लोकशाहीतील महत्व, मतदानाचा अधिकार यांची माहिती दिली. आभार शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी मानले. सूत्रसंचालन दीपक कोकरे यांनी केले. बालाजी काळे, विजय बांगर, मुकुंद पवार, अण्णासाहेब कुटे, अरुण बैस यांनी संयोजन केले.
*****

निवडणूक निरीक्षक डॉ.रेणू राज हिंगोलीत


निवडणूक  निरीक्षक
डॉ.रेणू राज हिंगोलीत

            हिंगोली, दि.5 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनूरी व 94-हिंगोली मतदार संघाकरिता भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. रेणू राज यांची सर्वसाधारण निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
डॉ. रेणू राज यांचे हिंगोली येथे आगमन झाले आहे. त्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी शासकीय विश्रामगृह येथे स्वागत केले. डॉ. रेणू राज निवडणुकीबाबत नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 ते 11 या वेळेत  उपलब्ध असतील त्यांचा संपर्क क्रमांक 8080933619 असा आहे.
कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक रेणुका तम्मलवार त्यांच्या संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक  9373777934 असा आहे.
*****

01 October, 2019

निवडणूक आयोगांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा : फुलारी


निवडणूक आयोगांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा : फुलारी

          हिंगोली, दि. 1 : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना वसमत मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी आज येथे दिल्या.
            वसमत मतदारसंघातील निवडणूक विषयाच्या संदर्भात वसमत तहसील कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत श्री. फुलारी यांनी सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ज्योती पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक साबळे आदि उपस्थित होते.
श्री. फुलारी यांनी साहित्य वितरण व्यवस्था, तपासणी सूची जोडपत्र, मतदान साहित्य तपासणी, व्हीव्हीपॅट, मशीन कसे सुरु करावे. मॉक पोल कसा घ्यावा, नमुना 17-क, अर्ज कसा भरावा याची माहिती दिली.
            विधानसभा मतदारसंघतील जवळा बाजार, शिरड शहापूर, लोहरा बु. बाभुळगाव येथील मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रावर जास्तीत-जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे त्यांनी सांगितले. मतदान अधिकारी क्र. 1, 2, 3 यांची कर्तव्ये, चॅलेंज वोट, टेंडर वोट याची माहिती त्यांनी दिली. दिव्यांगासाठी केलेल्या सुविधेबद्दल त्यांनी सांगितले.  या बैठकीस क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी आदि उपस्थित होते.
*****

मतदाना दिवशी सुट्टी देण्याचे आदेश


मतदाना दिवशी
सुट्टी देण्याचे आदेश

          हिंगोली, दि. 1 : राज्य विधानसभेसाठी येत्या 21 ऑक्टोबर, 2019 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सुट्टी जाहिर करावी, अशा सूचना राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून देण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
            या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूकीतील मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिनी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक स्थितीत अधिकारी, कामगार, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर त्याएैवजी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पुर्वपरवानगी घ्यावी लागेल.
कामगारांना दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदारांकडून मतदानासाठी सूट्टी अथवा सवलत न मिळाल्यामुळे मतदान करता न आल्याची तक्रार आल्यास संबंधित आस्थापना मालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
*****

कलापथकाच्या कार्यक्रमातून होणार मतदारांची जागृती


कलापथकाच्या कार्यक्रमातून
होणार मतदारांची जागृती


          हिंगोली, दि. 1 : जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातील गावा-गावांत कलापथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जाणार आहे. शाहीर प्रकाश दांडेकर यांच्या पथकाव्दारे हे कार्यक्रम केले जाणार आहेत.
            मतदान प्रक्रियेत जास्तीत-जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शाहीर प्रकाश दांडेकर यांचे पथक जनजागृतीचे काम करणार आहे.
            शाहीर दांडेकर यांच्या पथकाचा आज जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजीव नंदकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीप समितीच्या सदस्य सचिव रेणुका तम्मलवार उपस्थित होते.
            शाहीर दांडेकर यांचे पथक वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघातील विविध गावांत कार्यक्रम घेणार आहेत. ज्या गावात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्या गावात जनजागृती केली जाणार आहे. शाहीर दांडेकर यांच्या पथकात किरण दांडेकर, अशोक केंद्रेकर, विठ्ठल कांबळे यांचा समावेश आहे.
*****

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी माध्यम प्रमाणिकरण समितीची स्थापना


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी
माध्यम प्रमाणिकरण समितीची स्थापना

          हिंगोली, दि. 1 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी MCMC) स्थापना जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.
निवडणूक  कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणाऱ्या सोशल मिडीया, टी.व्ही.चॅनेल, रेडीओ, केबल्स व वर्तमानपत्रातील निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे, जाहिरातींना परवानगी देणे,एखादी बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून त्याबाबत योग्य कारवाई करणे आदी कामे समिती  करणार आहे.
समितीमध्ये जिल्‍ह्यातील वसमत मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, कळमनुरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, हिंगोली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे,  स्वतंत्र नागरिक म्हणून प्रा. मदन मार्डीकर सदस्य असून जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत  सदस्य सचिव आहेत.
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज :- टीव्‍ही चॅनेल,  रेडीओ एफएम, आकाशवाणी, प्रचाररथ, सिनेमागृह, सोशल मिडीया तसेच वृत्‍तपत्रांच्‍या इ-आवृत्‍तीतील (जाहिराती)  सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्‍या दृक-श्राव्य (ऑडिओ-व्‍हिज्‍युअल) जाहिरातींसाठी  प्रसारणपूर्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्‍यासाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज (इंग्रजी किंवा  मराठी भाषेतील) दोन प्रतींमध्‍ये आवश्यक माहिती भरुन सादर केला जावा. अर्जासोबत दोन सीडी ( सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्‍या टंकलिखीत मजकुरासह दोन प्रती -  ट्रान्‍सस्‍क्रीप्ट )  जिल्‍हा  माहिती कार्यालय, दुसरा मजला,  मध्‍यवर्ती  प्रशासकीय इमारत,  जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली   ( दूरध्‍वनी क्रमांक : 02456-222635) येथील जिल्‍हास्‍तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्‍या कक्षाशी संपर्क साधावा.
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण समितीकडे फक्त उमेदवारांच्या  जाहिरातीचे प्रमाणिकरण करून दिले जाणार आहे. राजकीय पक्षांच्‍या  जाहिराती  राज्‍यस्‍तरावरील समितीकडून प्रमाणित करुन दिल्‍या जातील. त्‍यासाठी मुंबई येथील समितीशी संपर्क साधावा. हिंगोली जिल्‍ह्यातील विधानसभेचे  उमेदवार अथवा त्‍यांचे प्रतिनिधी(प्राधिकृत असलेले) जिल्‍हा समितीकडे अर्ज सादर करु शकतात. त्याप्रमाणेच फक्‍त उमेदवाराच्‍या वैयक्तिक सोशल मिडीयाच्‍या अकाऊंटवरील पोस्ट, फोटो,  व्हिडीओ यांच्‍यासाठी पुर्व प्रमाणिकरण करुन घेण्याची  गरज नाही.
प्रत्‍येक  ऑडिओ  जाहिरात किंवा ऑडिओ-व्‍हिज्‍युअल जाहिरात  स्‍वतंत्र असावी.  एकाच सीडीमध्‍ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नये. अर्जदाराचे पूर्ण नाव,  पत्‍ता,  जाहिरात कोणत्‍या उमेदवारासाठी आहे  त्‍याचे नाव,  पक्षाचे नाव,  जाहिरात कुठे दाखवणार,  जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च,  जाहिरातीतील भाषा यांचा स्पष्ट उल्‍लेख असला पाहिजे.
मान्‍यताप्राप्त राजकीय  पक्षाचे उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी तीन  दिवस  आणि  इतर उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी सात  दिवस आगोदर अर्ज करु शकतात. सीडीमधील मजकूर प्रसारण योग्‍य असावा. इतरांची  बदनामी  करणारा, जाती-जातींमध्‍ये,  धार्मिक  तेढ निर्माण  करणारा नसावा. देशविघातक कृत्‍याला  प्रोत्‍साहन देणारा  नसावा. तसेच मुद्रीत माध्‍यमातील  (प्रिंट मिडीया) जाहिराती  मतदानाच्‍या दिवशी  किंवा  मतदानाच्‍या एक दिवस अगोदर प्रकाशित  करावयाची  असल्‍यास जिल्‍हास्‍तरीय  समितीचे  प्रमाणपत्र  अनिवार्य  आहे.
*****