22 August, 2016

व्यायाम शाळा साहित्य अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 22 :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ज्या संस्थांना व्यायाम शाळा विकास योजना (सर्वसाधारण/विशेष घटक) बांधकामासाठी मार्च 2016 पर्यंत अनुदान मंजुर करण्यात आले होते अशा संस्थांनी सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरीता व्यायाम शाळा बांधकामाचे व्दितीय हफ्ता प्रस्ताव व ज्या संस्थांनी व्यायाम शाळा बांधकाम पुर्ण केले आहेत अशा संस्थांनी व्यायाम साहित्याकरीता प्रस्ताव या कार्यालयास दि. 23 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
विहित मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास अशा संस्थांना अनुदान मंजुर केले जाणार नाही याची संबंधित संस्थेने नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        *****
नरेगातंर्गत जिल्ह्यात सिंचन विहीरींचे कामे तात्काळ सुरु करावीत 
                                                                --- खासदार श्री. राजीव सातव

हिंगोली,दि.22:- राज्यात जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत २८ प्रकारच्या योजना असून या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा, अशा सुचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार राजीव सातव यांनी दिल्या.
केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनातंर्गत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी समितीची जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दक्षता व सनियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, आमदार डॉ. संतोष टारफे, सतीष पाचपूते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिपचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी आदिंची उपस्थिती होती.
यावेळी श्री. सातव म्हणाले की, बैठकीत महिला बाल विकासतंर्गत अंगणवाड्यांसाठी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच धडक विहीर मोहिमेचा कार्यक्रम 15 दिवसात आला नाही , तर नरेगातंर्गत सिंचन विहीरींची कामे तात्काळ सुरु कराव. तसेच यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पदभरतीबाबतही आढावा घेण्यात आला. तसेच रेल्वे विभागाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याबाबतही नगर परिषदेच्या मुख्याधिकारी  यांनी तात्काळ कार्यवाही करावे, खासदार श्री.सातव यांनी संबंधितांना सुचना दिल्या.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम निर्मल भारत अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना, इंदिरा आवास योजना, डाक विभागाकडील योजना, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना यासह अन्य केंद्रशासन पुरस्कृत योजनांचा प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिह्यातील पंचायत समितीचे सभापती, समितीचे अशासकीय अध्यक्ष, विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.

                                                                        *****

 

21 August, 2016

महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांचा
हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम

हिंगोली, दि. 21 :- राज्याचे महसुल राज्यमंत्री श्री. संजय राठोड हे दिनांक 25 ऑगस्ट, 2016 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे.
गुरूवार, दि. 25 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय वाहनाने जिंतूर-अमरगड  मार्गे सेनगांव जि. हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.45 ते 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह, सेनगांव जि. हिंगोली येथे आगमन व सामाजिक कार्यक्रम, वसंतराव नाईक पुण्यतिथी महोत्सवास उपस्थिती. (स्थळ:- शासकीय विश्रामगृह, सेनगाव, जि. हिंगोली) सकाळी 11.45 वाजता शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 ते 01.30 वाजता जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 01.30 ते 02.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे राखीव. दुपारी 2.00 ते 3.00 वाजता हिंगोली, सेनगांव, औंढा-नागनाथ, वसमत, कळमनुरी येथील पक्ष कार्यकर्ते व समाजातील कार्यकर्त्यांसमवेत शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे बैठक व चर्चा. दुपारी 3.30 वाजता शासकीय वाहनाने कळमनुरी मार्गे शेंबाळ पिंप्री-पुसद-यवतमाळकडे प्रयाण.

                                                                        *****
जिल्ह्यात कुटुंबस्तर गृहभेट अभियानाचे आयोजन
हिंगोली, दि.20:-  स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दि. 22 ऑगस्ट ते 02 ऑक्टोबर, 2016 या कालावधीत राज्यव्यापी गृहभेट अभियान राबविण्यात येणार आहे. सन 2016-17 मधील वार्षिक कृती आराखड्यातील 125 ग्रामपंचायतीमध्ये 28 हजार 280 एवढे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी या अभियानाचे नाव स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी असे असून घोषवाक्य भेटी गाठी - स्वच्छतेसाठी असा आहे. या अभियानाचा शुभारंभ दि. 22 ऑगस्ट, 2016 रोजी होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
अभियानाच्या शुभारंभासाठी गावपातळीवर जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद विषय समित्याचे सभापती, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गावस्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी गृहभेटीची सुरूवात करून अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश :- शौचालय नसणाऱ्या कुटुंबाना भेटी देणे, कुटुंब स्तरावर शौचालयाचे महत्व पटवून देणे. कुटुंब शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करणे, शौचालय बांधकामासाठी तांत्रिक माहिती देणे व मार्गदर्शन करणे, शौचालयाचा वापर हा सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असण्याची जाणीव निर्माण करणे. 125 ग्रामपंचायतीमध्ये या अभियानादरम्यान समुदाय संचलित हागणदारी मुक्त निर्मुलन कृती आराखडा नियोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये वैयक्तीक शौचालय बांधकाम व त्याचा वापर, शौषखड्डे, सांडपाणी घनकचरा, स्वच्छतेविषयी ग्रामस्थाना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विषयी माहिती दिली. प्राथमिक बैठक, गाव फेरी, मशाल फेरी, गावातील समुदायाने गावाचा नकाशा काढला. शाळा, अंगणवाडी येथे जाऊन शौचालयाची शाळेतील स्वच्छतेची माहिती घेतली. गावातील सांडपाणी व घनकचरा या बाबत मार्गदर्शन, गृहभेटी नियोजन प्रक्रिया यामध्ये संवाद कार्यक्रम, कोपरा बैठक, गावातील तरुण मंडळ यांचा सहभाग, शाळेतील मुलाचा सहभाग व स्वच्छता फेरी, गावातील क्रीडा मंडळ, महिला बचत गट यांचा सहभाग. या अभियानामध्ये सर्व विभागाचे कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी क्षेत्र, खाजगी उद्योजक यांचा सहभाग असणार आहे.
महास्वच्छता दिन :- अभियानाच्या कालावधीत शेवटच्या टप्यामध्ये 02 ऑक्टोबर, 2016 रोजी राज्यभर महास्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यासाठी सर्व यंत्रणेची मदत घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये या तारखेला विक्रमी संख्येमध्ये स्वच्छतेसाठी गृहभेटी देण्यात येणार आहे.

*****
गोळीबार सरावासाठी मैदान ( फायर बट ) ची उपलब्धता
        हिंगोली, दि. 20 :- जिल्ह्यात नजीकच्या काळात गणपती, नवरात्र व इतर महत्वाचे बंदोबस्त असल्याने हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी तसेच दंगल नियंत्रक पथक, जलद प्रतिसाद पथकात नेमणुकिस असलेले पोलीस कर्मचारी यांचा वार्षिक गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याचे हिंगोली येथील पोलीस अधिक्षक यांनी नमुद करून दिनांक 20 ते 31 ऑगस्ट, 2016 या कालावधीत घेण्याचे नियोजित केलेले आहे. तरी गोळीबार सरावासाठीचे मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी आलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करीत आहे, सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सुचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                            ***** 
अद्यावत व्यायामशाळा कुस्ती, ज्युदो, कराटे व इतर खेळांच्या अनुदानासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि. 20 :- महाराष्ट्र कुस्ती कलेची परंपरा जोपासण्यासाठी व्यायाम शाळा, तालमी व आखाड्याचे योगदान महत्वाचे आहे. युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन सुदृढ नागरिक तयार करणे व अत्याधुनिक व्यायाम साहित्य कुस्ती, ज्युदो, कराटे या कलेच्या विकासासाठी अद्यावत मॅट व इतर खेळाचे आधुनिक साहित्य क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, मंडळे, संघटना यांना व्यायामचे आधुनिक साहित्य, कुस्ती, ज्युदो व कराटे या खेळाच्या विकासासाठी मॅट खरेदी करून स्वयंसेवी संस्थांना अद्यावत व्यायामशाळा कुस्ती, ज्युदो, कराटे व इतर खेळाच्या विकासासाठी अनुदान या योजनेंतर्गत अत्याधुनिक व्यायाम साहित्य शासनातर्फे खरेदी करुन उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी शासनातर्फे कमाल रु. 1.00 लाख खर्च करण्यात येतो तथापि मंजूर आर्थिक सहाय्याच्या 25 टक्के संस्थेचा हिस्सा असे अत्याधुनिक साहित्य संचालनालयस्तरावरुन पुरविण्यात येते.
            संस्थेकडे स्वत:च्या मालकीची जमीन अथवा दीर्घ मुदतीच्या करारावर उपलब्ध असलेल्या जमीनीवर किमान 500 चौ. फु. चटई क्षेत्राच्या व्यायाम गृहासहीत भांडारगृह/कार्यालयाची खोली व अर्जात नमुद केलेल्या बाबीच्या मुळ कागदपत्रासह प्रस्ताव जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे दि. 30 ऑगस्ट, 2016 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ***** 

20 August, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त प्रतिज्ञा  

हिंगोली, दि.20:- भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती दिवस हा सद् भावना दिवस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त जिल्हाधिकारी                      श्री. अनिल भंडारी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद् भावना दिनाची शपथ दिली .
" मी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म प्रदेश किंवा भाषा विषयक, भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे, भावनिक एैक्य आणि सामंजस्य, यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे, सर्व प्रकारचे मतभेद, मी हिंसाचाराचा अवलंब न करता, विचार विनिमय करुन, व संविधानिक मार्गानी सोडवीन."   
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) ए.के.तडवी, उपविभागीय अधिकारी अमित शेंडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक आकाश कुलकर्णी आदिसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

*****