18 January, 2017

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 18 :- दि. 25 जानेवारी, 2017 रोजी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालये आणि जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा करण्यात येणार आहे. या बाबतच्या सुचना सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी व सर्व तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय मतदार दिनाचे रोजी नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना संबंधित मतदान केंद्राचे ठिकाणी छायाचित्र मतदार ओळखपत्र (EPIC) वाटप करून राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ, त्या त्या मतदान केंद्राचे ठिकाणी संमारंभ पुर्व प्रदान करण्यात येणार आहे.
            मतदारांमध्ये विशेषत: नव मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढविण्याच्या दृष्टीणे महाविद्यालय तसेच शालेय स्तरावर खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अ.क्र.
स्पर्धा / कार्यक्रम
दिनांक व वेळ
ठिकाण
संपर्क प्रमुख
1
इयत्ता 09 वी  ते 12 वी या वर्गातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनची (EVMs) माहिती देणे व परिसंवाद
दि. 20.01.2017
दु. 01.00 ते 03.00
सरजुदेवी आर्य कन्या विद्यालय, हिंगोली.
1 श्री. विजय अवधाने, तहसिलदार, हिंगोली.
2 श्रीमती मंगला गायकवाड, प्राचार्य स.वि. हिंगोली.
2
ईयत्ता 09 वी  ते 12 वी या वर्गातील विद्यार्थांची "प्रत्येक मत महत्वाचे आहे" या विषयाव निबंध स्पर्धा
दि. 20.01.2017 दु. 03.30 ते 05.30
माणिक स्मारक विद्यालय, हिंगोली
1 श्रीमती मंगला गायकवाड, प्राचार्य स.वि. हिंगोली.
2 श्री. एस. यु. सुर्यवाड, मुख्याध्यापक, मा. स्मा. वि. हिंगोली.
3
ईयत्ता 09 वी  ते 12 वी या वर्गातील विद्यार्थांची "प्रत्येक मत महत्वाचे आहे" या विषयावर परिसंवाद
दि. 21.01.2017
स. 11.00 ते 01.00
शिवाजी महाविद्यालय, हिंगोली.
डॉ. बी. एस. क्षिरसागर, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, हिंगोली.
4
ईयत्ता 09 वी  ते 12 वी या वर्गातील विद्यार्थांची "प्रत्येक मत महत्वाचे आहे" या विषयावर रांगोळी स्पर्धा
दि. 23.01.2017
स. 11.00 ते 01.00
आदर्श महाविद्यालय, हिंगोली.
1 श्री. लक्ष्मीनारायण एम. सामलेटी, उपप्राचार्य, आ. महाविद्यालय, हिंगोली
2 प्रा. श्री. राम तोडकर, आ.म. हिंगोली
5
ईयत्ता 09 वी  ते 12 वी या वर्गातील विद्यार्थांची या वर्गातील विद्यार्थांची सायकल रॅली
दि. 24.01.2017
स. 08.00 ते 10.00
तहसिल कार्याल, हिंगोली ते जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.
1 श्री. विजय अवधाने, तहसिलदार, हिंगोली.
2 नरेंद्र पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली.

            उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन दिनांक: 17 जानेवारी, 2017 रोजी निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले आहे. तसेच दिनांक : 25 जानेवारी, 2017 रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाचा मुख्य कार्यक्रम आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे घेण्यात येणार आहे.
            तरी इयत्ता 09 वी ते 12 वी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त स्पर्धां / कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयच्या वतीने करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

17 January, 2017

विद्यार्थ्यांचे बँक खातेसोबत
आधार कार्ड लिंकीगसाठी प्राचार्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 17 :- भारत सरकार शिष्यवृत्ती संदर्भात दि. 21 जानेवारी, 2017 रोजी दु. 3.00 वाजता जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आयोजित केलेली असून सदर बैठकीमध्ये सन 2016-17 च्या भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेचा महाविद्यालय निहाय भरलेल्या अर्जांसोबत तसेच सदर अर्जांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात येणार आहे.
तसेच सन 2016-17 मध्ये महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे बँक खाते सोबत आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात महाविद्यालयनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. कारण सन 2016-17 पासून भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेचा लाभ देण्याकरिता विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
तरी दि. 21 जानेवारी, 2017 रोजी दु. 3.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुर्व बाजुस, दर्गा रोड, हिंगोली येथे बैठकीसाठी ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा शिष्यवृत्ती संदर्भात काम पहाणारे कर्मचारी माहितीसह उपस्थित राहणार नाहीत, अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी समाज कल्याण विभागामार्फत कोणत्याही शैक्षणिक योजनेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व संबंधित विद्यार्थी यांची राहिल, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
आकर्षक क्रमांकासाठी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 17 :- जिल्ह्यातील सर्व मोटार वाहन मालकांसाठी या कार्यालयातील यापुर्वीची मोटार सायकल संवर्गाकरिताची मालिका MH38-S ही संपुष्टात आल्यामुळे या कार्यालयाने मोटार सायकल संवर्गाकरिता नवीन मालिका MH38-T0001 ते 9999 ही मालिका चालु करण्यात आली आहे.
तरी ज्यांना वाहनाकरिता आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे. त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधुन आपला आकर्षक क्रमांक राखीव करून घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले आहे.

***** 
कुष्ठरोगाची तपासणी करून वेळीच औषधोपचार घ्यावे
                                 -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 17 :- कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींनी जवळच्या आरोग्य केद्रात तपासणी करून वेळीच औषधोपचार घ्यावे. असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान जिल्हा समन्वय समितीची बैठकीत सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) निलेश घुले,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. व बा.) श्रीमती तृप्ती ढेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) श्रीमती दिपाली कोतवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल देशमुख, आर. पी. कन्नुवार, डॉ. गग्गड, वाय. एस. लहानकर, पी. एस. जटाळे, जी. पी. होकर्णे, श्री. जाधव, श्री. ठाकरे, श्री. चाऊस आदी अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, समाजातील प्रत्येकाने आपली व आपल्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करावी व कुष्ठरोगाची लक्षणे (उदा. शरीरावर न खाजणारा, न दुखणारा लालसर बधीर चट्टा, दुखऱ्या मज्जातंतु इ. ) प्रकारचे लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन निदान निश्चिती करून औषधोपचार घ्यावा, असे आवाहन श्री. भंडारी यांनी केले.
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. राहुल गिते यांनी महात्मा गांधी पुण्यतिथी दिन 30 जानेवारी, 2017 रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची सुरूवात ग्रामसभा घेऊन यशस्वीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच ग्रामसभेमध्ये गावातील सरपंच, ग्रामसेवक गावातील नागरिक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी इत्यादींचा सहभाग घेऊन ग्रामसभेमध्ये प्रतिज्ञा वाचन करण्यात येणार आहे.
दि. 06 ते 21 फेब्रुवारी, 2017 या कालावधीत जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याकरिता आरोग्य विभागामार्फत सुक्ष्म नियोजन करण्यात आल्याचे डॉ. गिते यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बैठकीत कुष्ठरोगावर प्रतिबंध करण्यासाठी योगदान देण्याबाबत सर्व समिती सदस्यांनी प्रतिज्ञा वाचन केले.

*****

16 January, 2017

विद्युत सुरक्षा सप्ताहनिमित्त जनजागृती रॅली संपन्न
हिंगोली, दि. 16 :- विद्युत सुरक्षे विषयी लोकांना माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने दि. 11 ते 17 जानेवारी 2017 या कालावधी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅलीचा शुभारंभ केला.
यावेळी जिल्हाधिकारी  अनिल भंडारी म्हणाले की, विद्युत सुरक्षा किती महत्वाची आहे हे उपस्थितांना पटवून देऊन विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षेचा संदेश प्रत्येक घरात पोहचविण्याचे आवाहन केले व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना इन्फारेड साधनांचा वापर करुन विद्युतधारा वाहत असलेल्या यंत्रणेतील दोष काढण्यासाठी वापर करावा अशी सुचना केली व उपस्थित विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे रॅलीत सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले.
महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री. हुमने यांनी उपस्थितांना म्हणाले की विज कशी धोकादायक आहे याविषयी माहिती दिली व विद्युत अपघात कमी करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील ते सांगीतले. तसेच महावितरण विभागाचे उपस्थित कर्मचा-यांना विजेचे नियम पाळल्यास विद्युत अपघात कमी होतील असेही त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमावेळी विद्युत सुरक्षा सप्ताहाची पार्श्वभुमी व गरज, विद्युत निरीक्षक कार्यालय हिंगोलीचे सहाय्यक अभियंता एस.व्हि.निरावार यांनी प्रास्ताविकेद्वारे स्पष्ट केले व विद्युत सुरक्षेच्या संदेशातून जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच त्यांनी रॅलीत सहभागी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षेचा संदेश आचरणात आणावा तसेच घराघरामध्ये पोहोचविण्याचे सांगीतले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती आठवले मॅडम, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्री.आवचार, विद्युत निरीक्षक कार्यालयातील कर्मचारी श्रीमती के. एस. चिंचवणकर, के. जी. घुगे, एच. सी. अंबिलवादे तसेच महावितरणचे मा.सं.वि.चे व्यवस्थापक श्री.गायकवाड, उपलेखाव्यवस्थापक श्री. पेडगावकर, श्री. पीसे उप कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
            सदरील रॅली जिल्हा परिषद मैदान ते गांधी चौक पर्यंत आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जे. जे. पठाण यांनी केले. रॅलीचे समारोप करतांना रॅलीतील सहभागी सर्व अधिकारी ,कर्मचारी शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे आभार मानुन रॅलीचा समारोप करण्यात आला.


*****

13 January, 2017

विद्युत सुरक्षा सप्ताहात विजेचे उपकरण हाताळणी संदर्भात मार्गदर्शन
हिंगोली, दि. 13 :- विद्युत सुरक्षे विषयी लोकांना माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने दिनांक 11 ते 17 जानेवारी, 2017 या कालावधी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आज रोजी सकाळच्या सत्रात हिंगोली येथील मौलाना आझाद उर्दु ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थांना विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्य विद्युत सुरक्षे बाबत एस. व्हि. निरावार, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यांनी या वेळी विजेच्या उप करणाची सुरक्षित हाताळणी कशी करायची याचे मार्गदर्शन केले व प्रतिज्ञा वदवून घेतली.
              दुपारच्या सत्रात शासकीय तंत्रनिकेतन, एम.आय.डि.सी, लिंबाळा हिंगोली येथे विद्युत सुरक्षे बाबत कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन श्री. लोळगे यांनी केले.अध्यक्षस्थान शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री. कादरी सर यांनी भुषविले तर प्रमुख वक्ते म्हणून राजेश नांदगावकर शासकिय विद्युत ठेकेदार यांची उपस्थिती होती श्री. नांदगावकर यांनी त्यांचे अनुभव सांगत विध्यार्थांना विजे बद्दल जागरुक केले.
            विद्युत निरीक्षक कार्यालय हिंगोली येथील एस. व्हि. निरावार, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यांनी विजेचे महत्व व तसेच विजेचे धोके समजावून सांगीतले व विजेचा शॉक लागल्यावर कृतीम श्वसन देवून विजेचा शॉक लागलेल्या इसमाचा जीव कसा वाचवता येतो याचे प्रात्यक्षिक दाखविले सदर कार्यक्रमावेळी विद्युत निरीक्षक कार्यालय हिंगोली येथील प्रतिनिधी एच.सी.अंबलिवादे व के.जी.घुगे उपस्थित होते.

*****


 

12 January, 2017

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करा
                                                      -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी 
        हिंगोली, दि. 12 : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले. 
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक आचारसंहितेच्या संदर्भात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. भंडारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी  श्री. रणवीरकर, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे म्हणाले की,  जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता 11 जानेवारी पासून जिल्ह्यात लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी विविध यंत्रणांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये. या काळात नवीन कामे सुरू करता येणार नाही. नवीन नियुक्त्या, बदल्या, भरत्या करता येणार नाही. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत शंका असल्यास राज्य निवडणूक आयोग किंवा जिल्हा निवडणुक विभागाचे मार्गदर्शन घेण्यात यावे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत सभा, मिरवणुका, भितीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स लावण्याबाबत कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे.  सदर निवडणुकीकरीता उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्रे 24 तास ऑनलाईन भरता येणार असल्याने विद्युत विभागाने विद्यूत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.  
            तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी विविध यंत्रणांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहे. विशेष करुन संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी फिरते पथकांची  नियुक्ती करणे, शांतता-सुव्यवस्थेसाठी अवैध प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी नियोजन करणे, अवैधरित्या मद्य व मांस विक्रीवर नजर ठेवणे, यासाठीच्या नियोजनाबाबतही निर्देश दिले. निवडणूक काळातील आर्थिक व्यवहारांबाबत व्यावसायीक, व्यापारी तसेच अन्य प्राधिकरणांनी, विहित पद्धतीचा अवलंब करतात का यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश ही श्री. भंडारी यांनी यावेळी दिले.

*****