24 August, 2021

 

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु

                                       - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



 

        हिंगोली, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात शासनाची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वयाने व सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी  केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी. सभागृहात आयोजित स्वागत व निरोप कार्यक्रमात श्री. पापळकर बोलत होते. यावेळी मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सौ. जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांची उपस्थिती होती.    

            हिंगोली जिल्ह्याची विकासाकडे यशस्वी  वाटचाल सुरु आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यात स्त्रोत कमी आणि आव्हाने अधिक आहेत. यासाठी सर्व विभागानी एकमेकांशी समन्वय ठेवत व सहकार्य करत जिल्ह्याच्या विकास कामासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी राबविलेले उपक्रम पुढे चालू ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा असाच नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगून मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यात काही नवीन उपक्रम सुरु करुन जिल्ह्याची परंपरा अशीच आपणही पुढे चालू ठेवू, असेही श्री. पापळकर यांनी यावेळी म्हणाले.

            हिंगोलीतील सुमारे पावनेतीन वर्षाच्या कार्यकाळात कोविड, नैसर्गिक आपत्ती यासारखे अनेक आव्हाने  सामोरे होती. परंतु आपल्या सहकार्याने व समन्वयाने चर्चा करत प्रत्येक आव्हान स्वीकारुन यशस्वीपणे कामे केली. जिल्ह्यातील रुग्णालये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हेंटीलेटर्ससह इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणे, रामलीला मैदानाचे सुशोभिकरण, अपंग पुनर्वसन केंद्र स्थापन करणे, जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करणे, कोरोनाच्या परिस्थितीतही महसूलचे 110 टक्के उद्दिष्ट गाठणे, तसेच कोरोना महामारीचा सामना ही सर्व कामे येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच सहजपणे करता आली. हिंगोलीची यंत्रणा सक्षम असल्यामुळे येथे काम करण्याची संधी आहे, असे सांगून हिंगोली जिल्ह्यातील कार्यकाळ माझ्या जीवनातीत अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी केले .

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर पालिका प्रशासन अधिकारी रामदास पाटील यांनी केले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, पत्रकार, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख, विविध संघटनाचे प्रमुख यांनी पुष्प गुच्छ देत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांना निरोप दिला. सुरुवातीला शंतनू पोले यांच्या चमूने गीत सादर करुन गीताच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

****

 

येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून

मार्च अखेरपर्यंत सर्व शाळा शंभर टक्के तंबाखू मुक्त करावेत

                                                --- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश



हिंगोली, दि. 24 (जिमाका) :  येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून योग्य नियोजन करुन मार्च अखेरपर्यंत सर्व शाळा शंभर टक्के तंबाखू मुक्त करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. या बैठकीस समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, शिक्षण, कृषी, नगर परिषद, पंचायत समिती, वस्तु व सेवा कर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह डॉ.हेडगेवार दंत महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय व शिवाजी महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पोपळकर म्हणाले, येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात याव्यात. यामध्ये जिल्हा परिषद व समाज कल्याणच्या शाळा व वसतीगृहाचा समावेश करावा. योग्य ते नियोजन करुन शाळा परिसरात विविध निर्देश फलक लावावेत. सर्व महाविद्यालयांनी तंबाखूचा सर्वे करावा. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात शंभर यार्ड परिसरात कुठलाही तंबाखू जन्य पदार्थ विकण्यास कायद्याने बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास 200 रुपयापर्यंत दंड वसूल केला जाईल असे फलक लावावेत.  प्रत्येक तालुकास्तरावर भरारी पथकाची नेमणूक करावी. तसेच प्रत्येक गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व आशा वर्करच्या मदतीने सर्वे करुन माहिती घ्यावी. तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे कार्यालय, हॉटेल, भोजनालय, गार्डन, बस स्थानक, रेल्वे स्थानकावर धुम्रपान निषेध क्षेत्र असे बोर्ड लावावेत आणि कोटपा कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

यावेळी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संगाये यांनी ग्रामीण विकास संस्थेमार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच सलाम मुंबई फांऊडेशनचे सतीश वानखेडे यांनी तंबाखु मुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

****

 



जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या

जिल्हाधिकारी व विविध कार्यालयांना भेटी

 

 हिंगोली, दि. 24 (जिमाका) :  येथील जिल्हाधिकारी कार्यालय व विविध विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज भेट देऊन पाहणी केली . यावेळी त्यांनी प्रत्येक कार्यालयातील उपस्थित व अनुपस्थित कर्मचाऱ्यांची पाहणी केली व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तेथील कामकाजाची माहिती घेतली . तसेच कार्यालयात स्वच्छता व फाईल मांडणी कशी ठेवावी याबाबत सूचना केल्या.

   यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके उपस्थित होते.

 ****

15 August, 2021

 

महिला लोकशाही दिनाचे 17 ऑगस्ट रोजी आयोजन

 

हिंगोली, दि. 15 (जिमाका) :  महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच दि. 16 ऑगस्ट, 2021 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे माहे ऑगस्ट, 2021 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक 17 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात आले आहे.

            समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर, असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

*****

 

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही

यासाठी शिक्षकांनी जबाबदारीने काम करावे

 

-         पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

 





हिंगोली, दि. 15 (जिमाका) :  प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केल्यामुळेच आज आपला महाराष्ट्र हा देशातील पहिले राज्य ठरला आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात खूप मोठी स्पर्धा आहे. यासाठी शासनाने सर्व सुविधा, ज्ञान, तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांना आकार देवून त्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांचे आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन ज्ञान आत्मसात करुन ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षकांनी करावे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित ऑनलाईन शिक्षक स्पर्धा पुरस्कार, कोरोना योध्दा पुरस्कार आणि महाआवास अभियान ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात पालकमंत्री श्रीमती गायकवाड या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती महादेव एकलारे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपणा सर्वांसाठी मागील दीड वर्ष हे असाधारण आणि वेगळे होते. कोविडमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली . सह्याद्री चॅनल व गुगलच्या माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून आपण ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. हिंगोली जिल्हा परिषदेने राबविलेली ऑनलाईन शिक्षक स्पर्धा ही अभिनंदनीय असून असेच उपक्रम यापुढेही घेण्यात यावे, असे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केल्यामुळेच आज आपला महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. आजच्या जागतीक युगात खूप मोठी स्पर्धा आहे. यासाठी शासनामार्फत सर्व सुविधा, ज्ञान, तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थ्यांना आकार देवून त्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांचे आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन ज्ञान आत्मसात करुन ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षकांनी करावे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार याची जबाबदारी शिक्षकांची आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणा-या सुविधा  विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षकांनी करावे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपला उत्साह पुरस्कारापुरता न ठेवता असाच कायम ठेवला पाहिजे. आपणाकडे उद्याचे भविष्य घडविण्याची जबाबदारी  असून हेच विद्यार्थी महाराष्ट्राचा नावलौकिक, गौरव जगभरात घेऊन जातील. विविध माध्यमातून शिक्षण सातत्याने सुरु राहील यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावा.

जिल्हा परिषदेने ऑनलाईन शिक्षक स्पर्धा, महाआवास योजना असे विविध उपक्रम चांगल्या प्रकारे राबविल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अभिनंदन करुन पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.

शिक्षक स्पर्धा, महाआवास योजना स्पर्धा घेऊन त्याचे वितरण आज करण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा परिषदेने 19 हजार मंजूर घरकुलांपैकी 75 टक्के घरकुलाचे काम पूर्ण  करुन मराठवाड्यात पहिला आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी यावेळी दिली.

या स्पर्धेमुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचा-यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून इतरापेक्षा वेगळे काय करता येते हे त्यांनी या स्पर्धेत दाखवून दिले आहे. कोरोना परिस्थितीमुळे आलेली मरगळ दूर स्फूर्तीने विद्यार्थी घडविण्याचे काम करण्यासाठी ही शाळा लवकरात लवकर सुरु होवो आणि विद्यार्थी बहरुन जावो अशी प्रार्थना पुरस्कारप्राप्त शिक्षिका अर्चना पांडे यांनी आपले मनोगतात व्यक्त केली .

प्रास्ताविकात शिक्षणाकारी संदीप सोनटक्के यांनी ऑनलाईन शिक्षक स्पर्धा आयोजनाची भूमिका विशद केली .

यावेळी वादविवाद स्पर्धा, कोविड काळातील शैक्षणिक उपक्रमाचे सादरीकरण, इयत्ता पहिली ते 10 वी पाठ्यपुस्तकातील कविता गायन, पोस्टर रांगोळी, स्टोरी टेलींग कंपलेशन इंग्लीश, शैक्षणिक व्हिडिओ, सामान्य ज्ञान, वैयक्तीक नृत्य, गणित-विज्ञान स्पर्धा, मी घडवलेली शाळा सादरीकरण (फक्त मुख्याध्यापकासाठी), बडबड व बाल गीत सादरीकरण (महिला शिक्षकासाठी), सामुहिक नृत्य या प्रत्येक विषयातील प्रथम येणाऱ्या पाच शिक्षकांचा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीप्रत्र देवून गौरविण्यात आले.

तसेच कोरोनाच्या कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉक्टरांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

महाआवास अभियान-ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम पुरस्कार औंढा पंचायत समितीला, द्वितीय हिंगोली तर तृतीय कळमनुरी पंचायत समितीला मिळाला. सर्वोत्कृष्ट क्लस्टरमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार वसमत तालुक्यातील अनुक्रमे टेंभूर्नी, गिरगाव, हयातनगर या गावाला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार कळमनुरी तालुक्यातील अनुक्रमे नरवाडी, मसोड, शेनोडी या गावाला मिळाला. ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणाऱ्या उत्कृष्ट वित्तीय संस्थांचा प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे महाराष्ट्र ग्रामीण बँक, औंढा नागनाथ, स्टेट बँक ऑफ इंडिया, जवळा बाजार यांना देण्यात आला.  

राज्य पुरस्कृत आवास योजनेचा सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार प्रथम औंढा नागनाथ , द्वितीय वसमत आणि तृतीय हिंगोली तालुक्याला देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट क्लस्टरमध्ये प्रथम वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, द्वितीय औंढा तालुक्‌यातील येहळेगाव, तृतीय पुरस्कार हिंगोली तालुक्यातील खेर्डा या गावाला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार कळमनुरी तालुक्यातील अनुक्रमे पार्डी, कुंभारवाडी, जामगव्हाण या गावाला मिळाला आहे. या सर्व पुरस्काराचे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. याबरोबरच महाआवास अभियानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे विविध पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ****

हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा

मुकाबला करत राज्यात आपला वेगळा पॅटर्न निर्माण केला

 

-         पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

 

हिंगोली, दि. 15 (जिमाका) :  जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

            भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, राज्य राखीव दलाचे समादेशक संदिपसिंह गिल, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक  यशवंत काळे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी हिंगोली जिल्हा सज्ज आहे. हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांचे अभिनंदन केले.

कोरोनाच्या महासंकटाचा मुकाबला करत जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून विकास कामे सुरु आहेत. विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमाच्या माध्यमातून राज्याने देशापुढे आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्याच प्रमाणे हिंगोली जिल्हा देखील प्रगतीच्या वाटेवर आहे. देश, राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे, असून सांगून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

कोरोना विरुध्दच्या या युध्दात देशासह महाराष्ट्र राज्य यशस्वी लढा देत आहे. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण 16 हजार 08 रुग्ण झालेले आढळले आहेत. त्यापैकी 15 हजार 608 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98 टक्के इतके आहे. तर जिल्ह्यात एकूण 389 लोकांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण संख्या असून, मृत्यूदर देखील सर्वात कमी आहे.

दूसऱ्या लाटेमध्ये कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन निर्मिती, औषधांची उपलब्धता, लसीकरण, कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळा, ऑक्सिजन बेड्स आदींच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात आली. यासोबतच टाळेबंदीसह काही निर्बंध ही लागू करण्यात आले. याचा चांगला परिणाम म्हणजे रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. जिल्ह्यात 4 ऑक्सिजन टँक उभारण्यात आले आहेत. तसेच 2 ऑक्सिजन प्लाँट कार्यान्वित करण्यात आले असून आणखी 5 ऑक्सिजन प्लाँट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे दोन आणि उप जिल्हा रुग्णालय, वसमत येथे एक 20 के.एल. क्षमतेचे एकुण 3 ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार आहेत.

 आज रोजी जिल्ह्यात 900 ऑक्सिजन बेड्स व 1 हजार 884 नॉन ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. तसेच हिंगोली  जिल्ह्यात कोविड-19 साठी स्वतंत्र 100 बेड्सचे सर्व सोयीनी युक्त कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. यामध्ये सेंट्रल ऑक्सिजन लाईन, व्हेंटीलेटर, डायलिसीस युनिटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिला व लहान मुलांसाठी 100 बेड्सचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच लेवल तीनचे इंटेन्सिव पेडीयाट्रीक केअर युनिट व 20 बेड्सचे NICU, 25 स्वतंत्र व्हेंटीलेटर, आणि 124 खाटांचे SNCU उपलब्ध करण्यात आले. तसेच 1 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन 50  बेड्चे अत्याधुनिक व्हेंटीलेटरयुक्त बाल रुग्ण अतिदक्षता केंद्र तयार करण्यात आले आहे. या अतिदक्षता केंद्रात ऑक्सिजन लाईन, कम्प्रेसड एअर लाईन आणि सक्शन लाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच या केंद्रासाठी 200 लिटर प्रती मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्यात आला असून ऑक्सिजन टँन्कमार्फत सुध्दा ऑक्सिजन पुरविले जाणार आहे. सर्व तालुक्याच्या ठिकाणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड रुग्णांची व नवजात शिशु आणि मुलांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि इतर सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी जिल्ह्याला आतापर्यंत एकूण 3 लाख 06 हजार 680 लसी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी 88 केंद्र कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार 2 लाख 98 हजार 601 लसी देण्यात आल्या असुन 14 हजार लसी उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णांचा दर 9 टक्क्यावरुन आता 7.92 टक्क्यावर आला आहे. तर मागील 15 आठवड्यातील पॉझिटीव्हीटीचा दर 2 टक्क्यापेक्षा कमी आहे.

हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करुन आपल्याला या पुढेही सतत सांघीक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गायकवाड यांनी केले.

कोरोनासाठी लसीकरण सुरु झाले असले तरी अजून, धोका कमी झालेला नाही. यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर राखणे या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात HIV बाधीत रुग्णांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 1 कोटी 63 लक्ष किंमतीचे स्वतंत्र ART केंद्र उभारण्यात आले आहे. भारतात असे एकूण 3 ART केंद्र असून महाराष्ट्रात हिंगोली येथे उभारण्यात आलेले पहिले ART केंद्र आहे. या केंद्रात HIV रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत 5 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन कॉन्सटेटर उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केले.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय एवं आधिकारीता मंत्रालय आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून स्वर्गीय खासदार राजीवजी सातव दिव्यांग पुर्नवसन केंद्र उभारण्यात येत आहे. त्याचा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना लाभ होणार आहे.

हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलिसांचे कुटूंब व जनतेसाठी ‘पोलीस कोविड सेंटर’ सुरु करुन त्यामध्ये वैद्यकीय सोईसुविधा पुरविण्यात आल्या. तसेच कोविड-19 च्या काळात घरगुती कौटुंबिक वाद मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘भरोसा सेल’ ची स्थापना करुन हिरकणी कक्ष व मुलांना खेळण्यासाठी बाल उद्यान तयार करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, बालरोग तज्ञ डॉ. दिपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल डोंगरे, डॉ. नारायण भालेराव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, सहाय्यक मेट्रन ज्योती पवार यांना कोविड-19 योध्दा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच यावेळी ऑनलाईन उपक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन करणाऱ्या शिक्षकांना व महात्मा ज्योतीबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या रुग्णालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित मान्यवरांची भेट भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 ****







 

14 August, 2021

 

पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते

सामाजिक भवन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणाचे भूमिपूजन



हिंगोली, (जिमाका) दि. 14 :  वसमत येथील सामाजिक भवन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  पुतळा सुशोभिकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी आमदार राजू नवघरे, श्रीनिवास पोराजवार, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. विजयराव खडसे, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, तहसीलदार अरविंद बोळंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

येथील स्मारक अत्यंत सुंदर झाले असून अनेकांच्या योगदानातून हे स्मारक उभे राहिले आहे. यापुढेही कोणत्याही विधायक व विकास कामे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी  दिली.

याप्रसंगी पूज्यभदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील देवून मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील धम्म उपासक, उपासिका तसेच नगर परिषद सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****