24 August, 2021

 

येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून

मार्च अखेरपर्यंत सर्व शाळा शंभर टक्के तंबाखू मुक्त करावेत

                                                --- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश



हिंगोली, दि. 24 (जिमाका) :  येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून योग्य नियोजन करुन मार्च अखेरपर्यंत सर्व शाळा शंभर टक्के तंबाखू मुक्त करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. या बैठकीस समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, शिक्षण, कृषी, नगर परिषद, पंचायत समिती, वस्तु व सेवा कर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह डॉ.हेडगेवार दंत महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय व शिवाजी महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पोपळकर म्हणाले, येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात याव्यात. यामध्ये जिल्हा परिषद व समाज कल्याणच्या शाळा व वसतीगृहाचा समावेश करावा. योग्य ते नियोजन करुन शाळा परिसरात विविध निर्देश फलक लावावेत. सर्व महाविद्यालयांनी तंबाखूचा सर्वे करावा. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात शंभर यार्ड परिसरात कुठलाही तंबाखू जन्य पदार्थ विकण्यास कायद्याने बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास 200 रुपयापर्यंत दंड वसूल केला जाईल असे फलक लावावेत.  प्रत्येक तालुकास्तरावर भरारी पथकाची नेमणूक करावी. तसेच प्रत्येक गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व आशा वर्करच्या मदतीने सर्वे करुन माहिती घ्यावी. तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे कार्यालय, हॉटेल, भोजनालय, गार्डन, बस स्थानक, रेल्वे स्थानकावर धुम्रपान निषेध क्षेत्र असे बोर्ड लावावेत आणि कोटपा कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

यावेळी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संगाये यांनी ग्रामीण विकास संस्थेमार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच सलाम मुंबई फांऊडेशनचे सतीश वानखेडे यांनी तंबाखु मुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

****

No comments: