कोरोना नियमाचे पालन
करुन
सर्व उपहारगृहे, दुकाने
रात्री 10 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास मुभा
-
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
हिंगोली (जिमाका) , दि. 13 :
जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आस्थापना व दुकाने चालू करण्यासाठी जिल्ह्यातील
रुग्णांच्या सद्यस्थितीचा विचार करुन शासन स्तरावरुन मार्गदर्शक आदेश प्राप्त झाले
आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी
दि. 15 ऑगस्ट, 2021 रोजी
पासून पुढील आदेश लागू होईपर्यंत आस्थापना व दुकाने उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे सुधारित
आदेश जारी केले आहेत.
1. उपहारगृहे : खुली
अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या
पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.
अ) उपहारगृह, बारमध्ये
प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर
अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी लावणे आवश्यक
राहील.
आ) उपहारगृह, बारमध्ये
काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे
कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन
मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व
व्यवस्थापक उपहारगृह, बारमध्ये काम करु शकतील. तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने
उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
इ) वातानुकुलीत
उपहारगृह, बार असल्यास, वायूविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा
दरवाजा उघडा ठेऊन आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील.
ई) प्रसाधनगृहातही उच्च
क्षमतेचा एक्झॉट फॅन असे आवश्यक राहील .
उ) उपहारगृह, बारमध्ये
विहित शारीरिक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.
ऊ) उपहारगृह, बारमध्ये
निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहील.
वरील अटींच्या अधीन
राहून उपहारगृह, बार सुरु ठेवण्यास सर्व दिवशी रात्री 10.00 वाजेपर्यंत मुभा
देण्यात येत आहे. उपहारगृह, बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत
जास्त रात्री 9.00 वाजेपर्यंत घेण्यात यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु
ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
2. दुकाने : जिल्ह्यातील
सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवशी रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा
देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा
कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील.
3. शॉपिंग मॉल्स :
जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची
मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व
कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या
दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील व
तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे
आवश्यक राहील.
4. जिम्नॅशिअम,
योगासेंटर, सलून स्पा : वातानुकुलीत तसेच विनावातानुकुलीत जिम्नॅशिअम, योगासेंटर,
सलून-स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची
मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकुलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन
व वातानुकुलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.
5. इनडोअर स्पोर्टस :
इनडोअर स्पोर्टस असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14
दिवस झालेले असणे आवश्यक राहील. या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायूविजन
व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश,
पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा
देण्यात येत आहे.
6. कार्यालय, औद्योगिक,
सेवाविषयक आस्थापना :
अ) सर्व शासकीय ,
निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व
व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे.
आ) ज्या खाजगी व
औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात
येत आहे.
इ) सर्व आस्थापनांनी
गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन
करावे. ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरुन काम करणे शक्य आहे अशा सर्व
आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा द्यावी.
कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे
शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.
ई) तसेच खाजगी
कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा
देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात
कार्यालयीन एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक
राहील.
7. जिल्ह्यातील सर्व
मैदाने, उद्याने, सर्व दिवस नियमित वेळेत चालू राहतील. परंतु सदर ठिकाणी गर्दी
होणार नाही याची संबंधितानी दक्षता घ्यावी.
8. विवाह सोहळे :
अ) खुल्या प्रांगणातील
, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित खुल्या प्रांगण,
लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या
प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
आ) खुल्या प्रांगणातील
, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन
क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल.
इ) बंदिस्त मंगल
कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त
100 व्यक्ती या मर्यादेत असेल.
ई) मात्र कोणत्याही
परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा
करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला
तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर
तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयावर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल
कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
उ) तसेच मंगल कार्यालय,
हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँड पथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह
व्यवस्थेशी संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण
होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक
राहील.
9. सिनेमागृहे व
मल्टीप्लेक्स : जिल्ह्यातील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स (स्वतंत्र तसेच
शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
10. धार्मिक स्थळे :
राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.
11. ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश
करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 42 तास पूर्वींची
आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहील.
12. कोविड
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात, जिल्ह्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत
केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी,
जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम,
निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे इत्यादीवरील निर्बंध कायम राहतील.
13.मेडिकल ऑक्सिजनची
उपलब्धता मर्यादित असल्याने , जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोविड
रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन 400 मे. टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागत
असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर
निर्बंध लागू करण्यात येतील.
14. जिल्ह्यातील सर्व
नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची
स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध इत्यादी सर्व
निर्बंधाचे पालन करणे अनिवार्य राहील.
15. सर्व दुकाने,
कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक, व्यवस्थापनाने त्यांचे
आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व या
कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण माहिती, प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम
प्राधिकाऱ्यानी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी.
16. दुकाने, उपहारगृहे,
वार, मॉल्स, कार्यालये, औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालिक निर्जंतुकीकरण व
सॅनिटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधित मालकांची व व्यवस्थापनाची असेल. तसेच
यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फारेड, कॉन्टॅक्टलेस
थर्मामीटर याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडिकल
वेस्ट (वापरलेले मास्क टिशू पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित
कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची असेल.
हे आदेश हिंगोली जिल्ह्यात दि.
15 ऑगस्ट, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील. या
आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस
अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी
न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल.
या आदेशाचे पालन
करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार
तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी
यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment