27 August, 2021

 

विविध व्यवसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून

युवा उद्योजक पिढी निर्माण करण्याचे काम करावे

                                      - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 : नेहरु युवा केंद्राच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्र आणि एनएसएसच्या सहकार्याने युवकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे विविध व्यवसायिक प्रशिक्षण देऊन सक्षम युवा उद्योजक पिढी निर्माण करण्याचे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, कौशल्य विकास कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. ए. काद्री, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश कानवडे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. दत्ता कुंचलेवाड, आदर्श महाविद्यालयातील एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन हटकर, क्रीडा विभागाचे जयवंत असोले, समाज कल्याण विभागाचे गंभीर शेबेटवाड, स्काऊट गाईडच्या माधुरी हाळवी, संस्थेचे प्रतिनिधी नामदेव सपाटे, चक्रपानी गायकवाड, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संदीप शिंदे यांची उपस्थिती होती.  

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून युवकांना प्रशिक्षण द्यावे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी व इतर विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून बँक मित्रांना ऑनलाईन बँकेच्या कामकाजाविषयी जनतेपर्यंत माहिती कशी पोहोचवावी याविषयीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

‘स्वच्छ गाव-हरित गाव’ या उपक्रमाद्वारे युवकांना प्रशिक्षण देवून जिल्ह्यातील गावात स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी प्रबोधन करावे. तसेच वन विभागाशी संपर्क साधून युवकांच्या माध्यमातून सर्व गावांत वृक्ष लागवड करावी व लोकेशन वाईज छायाचित्रे अपलोड करावेत. तसेच एनएसएसच्या माध्यमातून युवकांचे प्रबोधन करावे. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. नेहरु युवा केंद्राच्या प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी आत्मनिर्भर भारत योजनेतून युवकांचे मॅपिंग, कौशल्य हाताळणे, बँक मित्राना प्रशिक्षण देणे,  कोविडची जनजागृती करणे, कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, भारतातील युवकांना निरोगी व तंदुरुस्त जीवनशैली जगण्यासाठी प्रबोधन करणे, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे यासह विविध योजनेचा कृती आराखडा यावेळी सादर केला .

*****

No comments: