03 August, 2021

 

सर्व आस्थापना, दुकाने उघडण्यास

सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी

·        शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीत उघडण्यास परवानगी तर रविवारी पूर्णपणे बंद

 

हिंगोली (जिमाका) , दि. 03 :   जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आस्थापना व दुकाने चालू करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांच्या सद्यस्थितीचा विचार करुन शासन स्तरावरुन मार्गदर्शक आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्र.जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शंकर बरगे यांनी  दि. 03 ऑगस्ट, 2021 रोजी पासून पुढील आदेश लागू होईपर्यंत आस्थापना व दुकाने उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे सुधारित आदेश जारी केले आहेत.

1. अत्यावश्यक सेवा बाबी : जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे), पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य (वैयक्तिक / संस्थेसाठी) विक्रेते यांची दुकाने, आस्थापना दि. 03 ऑगस्ट, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत दैनंदिन सकाळी 9.00 ते रात्री 8.00  या वेळेप्रमाणे चालू करण्याची परवानगी राहील. या कालावधीत फक्त दुध विक्री केंद्र, विक्रेते यांना दैनंदिन सकाळी  7.00 ते  8.00 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. ई-कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील.

जिल्ह्यातील APMC बाजार, कृषी संबंधित सर्व दुकाने (जसे की खते, बी, बियाणे,कृषी साहित्य, अवजारे, गॅरेज, टायर विक्री, दुरुस्ती दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा इत्यादी दुकाने, आस्थापना दैनंदिन सकाळी 9.00 ते रात्री 8.00 पर्यंत चालू राहतील.

2. जिल्ह्यातील इतर आस्थापना, दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) : जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने, आस्थापना यांना दि. 03 ऑगस्ट, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 9.00 ते रात्री 8.00 या वेळेत चालू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. परंतु ही दुकाने, आस्थापना ह्या शनिवारी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेत उघडण्यास परवानगी राहील. तर रविवारी ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील.  जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरंट कोरोनाचे पालन करुन ग्राहकांच्या 50 टक्के उपस्थितीच्या मर्यादेत पुढील आदेशापर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी  9.00 ते दुपारी 4.00 या वेळेत आणि शनिवार ते रविवार खानावळ , रेस्टॉरंट यांना उघडण्यास परवानगी नसेल. परंतु पार्सल, घरपोच सुविधा कोरोना नियमाचे पालन करुन सोमवार ते रविवार सकाळी 9.00 ते रात्री 9.00 पर्यंत चालू राहतील.

3. कार्यालयीन उपस्थिती : जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील उपस्थिती शंभर टक्के राहील.

4. लग्न समारंभ : या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने (Court Marriage) पार पाडावेत. जर पारंपारिक पध्दतीने लग्न आयोजित करावयाचे असल्यास वर-वधू मिळून केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात यावे. यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही . परंतु लग्न समारंभ आयोजित करत असल्याची पूर्वकल्पना संबंधित तहसील कार्यालयास देणे बंधनकारक आहे.

5. अत्यंविधी / अत्यंसंस्कारासाठी  केवळ 20 नागरिकांना परवानगी असेल.

6. खाजगी प्रवासी वाहतूक : जिल्ह्याबाहेर खाजगी वाहनाद्वारे, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी  परवानगी असेल. परंतु राज्यातील लेवल-5 या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यात थांबण्यासाठी किंवा त्या जिल्ह्यातून प्रवास करण्यासाठी ई-पास घेवून प्रवास करने बंधनकारक असेल.

7. सार्वजनिक प्रवासी वाहतूक : MSRTC मालकीची वाहने शासन निर्देशाप्रमाणे पूर्णक्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असेल. परंतु प्रवासी उभे राहून प्रवास करण्यास परवानगी असणार नाही. तसेच सर्व प्रवाशांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.

8. माल वाहतूक : माल वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत केवळ 03  व्यक्तींना (चालक, क्लिनर, हेल्पर) परवानगी असेल.

9. बँका : जिल्ह्यातील सर्व बँका या कालावधीत शासकीय कामकाजासाठी, व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी, शेतकऱ्यांची पिक कर्जाची कामे, सर्व सामान्य नागरिकांसाठी इत्यादी कामकाजसाठी बँकेच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

10. उद्योग : जिल्ह्यातील सर्व प्रकारचे उद्योग सुरु ठेवण्यास शासन निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल.

11. सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने येथे फिरणे, सायकलींग, सर्व क्रीडा प्रकारास (outdoor) परवानगी असेल. या क्रीडा प्रकारास सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 आणि सायंकाळी 05.00 ते रात्री 09.00 या वेळेत परवानगी असेल .

12. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या (खाजगी/शासकीय) बांधकामास, शेती कामास परवानगी असेल.

13. जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रशिक्षण, बँकाचे प्रशिक्षण, बैठका इत्यादी कार्यक्रम घेण्यास कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल.

14. जिल्ह्यातील जिम, व्यायामशाळा, योगा सेंटर, स्पा, केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लर यांना केवळ 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या वेळेत आणि शनिवारी सकाळी 8.00 ते दुपारी 3.00 या वेळेत उघडण्यास परवानगी असेल. परंतु दुकानात एसी (AC)  उपकरण लावण्यास परवानगी नसेल. तसेच रविवारी सदर दुकाने उघडण्यास परवानगी नसेल.

15. जिल्ह्यातील लॉन्स, मंगल कार्यालये यांना केवळ 50 नागरिकांच्या क्षमतेने लग्न आयोजित करण्यासाठी परवानगी असेल.

16. जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सभा इत्यादी कार्यक्रमांना परवानगी नसेल.

17. जिल्ह्यातील सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे हे पुढील आदेशापर्यंत बंद असतील.

18. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. (धार्मिक स्थळाशी संबंधित 02 व्यक्तींसाठी दैनंदिन विधीसाठी परवानगी असेल) तसेच धार्मिक जत्रा, यात्रा, उरुस, मिरवणूक इत्यादींना पुढील आदेशापर्यंत बंदी असेल.

19. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस (खाजगी शिकवणी वर्ग) उघडण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शिक्षण विभागाने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशाचे पालन करावे.

20. जिल्ह्यात सार्वजनिकपणे वाढदिवस साजरा करणे, राजकीय कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक प्रचार, आंदोलने, धरणे, उपोषणे, मोर्चा यांना पूर्णपणे बंदी असेल.

21. नागरिकांना रात्री 9.00 ते सकाळी 5.00 पर्यंत विनाकारण फिरण्यास , एकत्र जमण्यास परवानगी नसेल.

22. या आदेशानुसार ज्या आस्थापना, दुकाने, कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आली आहे केवळ अशांनाच सद्यस्थितीत परवानगी राहील. तसेच या आदेशात ज्या आस्थापना, दुकाने, कार्यक्रम यांचा उल्लेख करण्यात आला नाही अशांना पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात बंदी असेल.

हे आदेश हिंगोली जिल्ह्यात दि. 03 ऑगस्ट, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत  लागू राहील. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल.

या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.

****

No comments: