06 August, 2021

 

बाल किटक संगोपनाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सौ. गायत्री पडघान यांचा

जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने सत्कार

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 : जिल्ह्यातील कडती येथील शेतकरी सौ. गायत्री गणेश पडघान यांनी आंध्र प्रदेश राज्य रेशीम संशोधन व विकास संस्था, हिंदूपूर येथील आंध्र प्रदेश राज्य रेशीम संशोधन व विकास संस्थेमध्ये बाल किटक संगोपनाचे तीन महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी त्यांचा सत्कार केला.

सौ. गायत्री पडघान यांनी दि. 22 फेब्रुवारी ते 31 जुलै, 2021 या दरम्यान 90 दिवसांचे व्यावसायिक बाल किटक्‍ संगोपनाचे हिंदुपूर येथे निवासी प्रशिक्षण घेतले आहे. असे प्रशिक्षण घेतलेल्या त्या मराठवाडा व विदर्भ विभागातील प्रथम महिला ठरल्या आहेत. प्रशिक्षणादरम्‍यान त्यांना कोविडची लागण झाल्यावर सुध्दा त्यांनी आजारावर मात करत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी केले.

सौ.पडघान यांच्या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना बाल किटक मागविण्यासाठी जास्त अंतर कापावे लागणार नाही. तसेच कोष उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

या सत्कार प्रसंगी रेशीम कार्यालयाचे तांत्रिक सहायक रजनीश कुटे, तान्हाजी परघणे उपस्थित होते.

******

No comments: