14 August, 2021

अंगणवाड्यांना गॅस उपलब्ध झाल्याने मदतनीसांची धुरापासून होणार मुक्ती                         -- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

         हिंगोली, (जिमाका) दि. 14 : जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना खाऊ बनवण्यासाठी गॅसचे वितरण करण्यात येणार असून आता अंगणवाडी मदतनीसांची धुरापासून मुक्ती होणार आहे. त्यामुळे त्यांचा किमान एक तास वेळेची बचत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आज कळमनुरी येथे केले.

            कळमनुरी पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील 130 अंगणवाड्याना गॅस व शेगडी वितरणांच्या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती गायकवाड या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनीताई सातव होत्या. यावेळी माजी आमदार संतोष टारफे, पंचायत समिती सभापती पंचफुलाबाई बेले, उपसभापती मंजूषा राजेगोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, श्री. बोंदरे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार मयूर खेंगले, गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे यांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचवून विकास करण्याचे स्व. खासदार राजीव सातव यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून करावे. गॅस वितरणामुळे सर्व अंगणवाड्यातील मदनीसांची धुरापासून आता मुक्ती होणार आहे. त्यामुळे गॅस वितरणाचा फायदा अंगणवाडी सेविकापेक्षा मदतनीसांना जास्त होणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपल्या जीवाची परवा न करता कोरोनाच्या काळात ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरांना भेटी देवून ताप, ऑक्सिजन तपासण्यासह कोमार्बीड रुग्णांचा डाटा संकलीत करण्याची महत्वाची कामगिरी पार पाडली आहे. तसेच कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना घरपोच आहार पोहोचविण्याचे देखील काम केले आहे. यापुढेही असेच नावलौकिक वाढविण्याचे काम आपल्या माध्यमातून व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करुन सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.  

पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना गॅसचे वितरण करुन त्यांची कायमची सोय केली आहे. महिला या शक्तीच्या प्रतीक आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केल्यामुळे त्यांचे कौतूक केले. हिंगोली जिल्हा संपन्न करण्यासाठी विकासाच्या योजना ग्रामीण भागात राबवाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. असेच काम यापुढेही करावे व शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावेत, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी मंत्री रजनीताई सातव यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. आदिनाथ आंधळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने 14 वित्त आयोगातून कळमनुरी तालुक्यातील 250 अंगणवाड्यांपैकी 130 अंगणवाड्यांना गॅसचे वितरण करण्यात येत आहे. उर्वरित अंणगवाड्यांना दुसऱ्या टप्प्यात गॅसचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देवून कार्यक्रम आयोजनाची भूमिका विशद केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रजल्वन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी स्व. खासदार राजीव सातव यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात दहा अंगणवाड्यांना गॅस व शेगडीचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते

कळमनुरी येथील शाळेच्या वाढीव इमारतीचे व रस्त्याचे भूमिपूजन


 

            कळमनुरी येथील नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून नगर परिषद मालकीच्या शाळेच्या वाढीव इमारतीचे बांधकामाचे तसेच मागास क्षेत्राव्यतिरिक्त नागरी क्षेत्र सुधार योजनेतून विकासनगर येथे हिंगोली-नांदेड हायवे ते आयटीआय कॉलेज निवासस्थानापर्यंत सीसी रस्ता कामाचे भूमिपूजन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आज कळमनुरी येथे करण्यात आला.

            यावेळी माजी मंत्री रजनीताई सातव, डॉ. प्रज्ञा सातव, माजी आमदार संतोष टारफे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार मयूर खेंगले, मुख्याधिकारी उमेश कोटीकर यांची उपस्थिती होती.

 

****

  

No comments: