25 April, 2023

 

नदीची सभ्यता टिकविण्यासाठी सर्वांनी पाऊल उचलणे गरजेचे

- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा




 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सूर्याकडून होणाऱ्या बाष्पीभवनाची टक्केवारी कमी करण्यासाठी पाण्याला जमिनीच्या गर्भात ठेवले पाहिजे. जमीन सर्वात मोठी बँक आहे तिच्यावर जीवनाचा प्रवास अवलंबून आहे. नदीची सभ्यता नष्ट होण्यापूर्वी तेथील जैविक सभ्यता नष्ट होत असते. त्यामुळे सभ्यता टिकविण्यासाठी सर्वानी पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत वसमत येथे आयोजित सभेत केले.  

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन हिंगोली, वन विभाग हिंगोली आणि  उगम ग्रामीण विकास संस्था हिंगोली, सर्व शिक्षक संघटना वसमत, औंढा ना. यांच्या संयुक्त विद्यमाने चला जाणूया नदीला अभियानंतर्गत वसमत येथे आसना नदी जनसंवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यावेळी डॉ. राणा बोलत होते.  यावेळी चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य सर्वश्री. नरेंद्र चुग, प्रमोद देशमुख, सुमंत पांडे, जयाजी पाईकराव, नदी समन्वयक तानाजी भोसले, बालाजी नरवाडे, सुशिलाताई पाईकराव, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, समाज कल्याणचे विभागीय उपायुक्त अविनाश देवसटवार, वन परिक्षेत्र अधिकारी शेळके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, महाराष्ट्र सर्वात जास्त बांध असलेले राज्य असून सुध्दा सर्वात जास्त पाणी उपसा महाराष्ट्रामध्ये होतो. त्याच बरोबर सर्वात जास्त आत्महत्या सुध्दा महाराष्ट्रात होतात, ही दुखा:ची बाब आहे. आपण धरतीमातेचे दुध कधीच समाप्त केले आहे. आता आपण धरतीआईचे रक्त पीत आहोत. पुनर्भरण मोठ्याप्रमाणावर होत आहे, पण संतुलित वापर हा प्रकार अजून लोकांमध्ये दिसत नसल्याचे त्यांनी मार्गदर्शनातून नमूद केले. नदीला पुनर्जीवित करण्यासाठी शासन, महाजन, समाज व संत एकत्र येणे गरजेचे आहे. नदी पुनर्जीवनाचे टप्पे ठरलेले असून जन संवाद यात्रा याचाच एक भाग आहे. सर्वानी मिनिटे देऊन भागणार नाही तर समोर ध्येय आणि सातत्य ठेवून काम करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

इंग्रज भारतातून गेले तेव्हा त्यांनी निर्माण केलेल्या व काबीज केलेल्या सर्व बाबी नियंत्रणासाठी सरकारच्या हाती दिल्या. मात्र पाणी स्वातंत्र्य राहिले ही चांगली घटना झाली. नाहीतर बहुतांश लोकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागले असते. परंतु ते दिवस जास्त दूर नाहीत. आफ्रिकेमध्ये कंपनीने सर्व पाणी विकत घेतले आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर दारु देतात मात्र पाणी नाही. हीच वाटचाल आपण करताना दिसत आहे. त्यामुळे पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब जिरवला पाहिजे व मोजून वापरला पाहिजे तर पाणी समृद्धी होणे शक्य आहे. पाणी उपसा, वृक्षतोड, नगदी पिकांचा अवलंब व पर्यावरणाचा ऱ्हास हा विकासाच्या नावाखाली होत असलेला विनाश असल्याची भावना व्यक्त केली. यामुळे वातावरणीय बदल होत आहेत. अवेळी पाऊस येतो, जास्त तापमान वाढते, बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो तर दुसऱ्या शिंगावर पाऊस पडत नाही. जर अशी स्थिती निर्माण होत असेल तर आपण कोणत्या विकासाकडे जात आहे याचा विचार करण्याची नितांत गरज आहे, असेही डॉ. राणा यांनी सांगितले.

पाणी आपण निर्माण करु शकत नाही तसेच पडणारा पाऊस आपल्याकडेच पडेल याची शाश्वतता नाही म्हणून पाण्याचे नियोजन करा. पूर्वी विशिष्ट दगडापर्यंत पाणी आले म्हणजे किती पिक घेता येतात त्याचा ठोकटाळे असत पण आता तसा काही ठोकताळा राहिला नाही. आता शेजारील पाणी उपसा करतो मग आम्ही उपसा करायचा. राजस्थानमध्ये जेवढे पाणी वाया घातले तेवढे आयुष्यातील दिवस कमी झाले अशी समज आहे. कारण ते पाण्याला तेवढे महत्व देतात.

पाण्याचा आदर करा, पुनर्वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा व पुनर्जीवित करा अशा सूचना डॉ. राणा यांनी दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी भोसले यांनी केले. तसेच नरेंद्र चुग, प्रमोद देशमुख, सुमंत पांडे व जयाजी पाईकराव यांनीही मार्गदर्शन केले. तर सूत्र संचालन नामदेव दळवी व शिवानंद पोटे यांनी केले. यावेळी जनसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या शिक्षक, विद्यार्थी, नदी प्रहरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक संघटना, श्याम संगेवार, दिशांत पाईकराव, बालाजी नरवाडे, विकास कांबळे, सिद्धार्थ निनूले व दीपक सागरे यांनी प्रयत्न केले.

******

 वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा 

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारतीय हवामान विभागाने दि. 26 एप्रिल ते दि. 29 एप्रिल, 2023 या कालावधीत मराठवाड्यात हिंगोलीसह काही जिल्ह्यामध्ये पावसाच्या शक्यतेचा इशारा व वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

                           

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1)      आकाशात विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2)     जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3)      झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4)    वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5)     वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो. त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6)     विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करुन ठेवावीत.

7)     वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

 

आकाशात विजा चमकत असल्यास हे करु नका :

1)      पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.   

2)     विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3)      दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4)    धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका. 

 

*******

 

कयाधू नदी जनसंवाद यात्रा समारोपीय कार्यक्रमात

जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांचे 26 एप्रिल रोजी मार्गदर्शन

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन, वन विभाग व उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त चला जाणूया नदीला अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात कयाधू व आसना नदी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती.

कयाधू नदी जनसंवाद यात्रेचा समारोपीय कार्यक्रम दि. 26 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून जलपुरुष तथा अध्यक्ष जागतिक पूर आणि दुष्काळ निवारण आयोग व रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्रसिंह राणा उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, जलप्रेमी, नदी प्रेमी, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

*****


 हिंगोली व सेनगाव येथील दोन बाल विवाह बांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निमूर्लन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच दरम्यान जिल्ह्यातील हिंगोली  व सेनगाव येथे अल्पवयीन मुलींचे बाल विवाह होणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार सेनगाव पोलीस स्टेशन, येथील पोलीस निरिक्षक रंजित भोईटे यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण यांनी घटनास्थळी भेट देवून उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन सेनगाव येथे 01 व हिंगोली येथे 01 असे दोन बाल विवाह थांबविण्यात आले. बालिकेच्या आई-वडीलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.

या वेळी हिंगोली येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच सेनगाव तालुक्या मध्ये सेनगावचे बिट जमादार एस.पी. चव्हाण, नगरसेवक अमोल तिडके, माजी सभापती आप्पासाहेब देशमुख इ. उपस्थित होते. या दोन्ही वालिकांना पुढील कार्यवाहीसाठी मा. बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले.

*****

 

कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

 पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने चालू विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  जिल्ह्यात बाल विवाह समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निमूर्लन समिती गठीत करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने कळमनुरी तालुक्यातील मौजे डोंगरगाव पूल येथे दि. 19 एप्रिल, 2023 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सदर बैठकीस सर्व ग्राम बाल संरक्षण समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत गावातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांविषयी व ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये नव्याने 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतीची बाल मित्र म्हणून निवड करण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली.

सदरील गावात चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड.अनुराधा पंडित यांनी उपस्थित सर्व गावकऱ्यांना बाल विवाह प्रतिबंध कायदा, 2006 विषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्वाकडून बाल विवाह प्रतिबंध प्रतिज्ञेची शपथ घेण्यात आली. याच दरम्यान एका 17 वर्षीय बालिकेचा बाल विवाह होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळताच आखाडा बाळापुर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या सहकार्याने घटनास्थळी भेट देण्यात आली. सदरील बालिकेच्या आई-वडीलांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते या विषयी अॅड. अनुराधा पंडित यांनी मार्गदर्शन करुन नियोजित बाल विवाह थांबविण्यात आला. बालीकेच्या आई-वडीलाकडून मुलींचे वय 18 वर्ष पुर्ण होई पर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.

यावेळी गावातील सरपंच लक्ष्मीबाई घोडगे, उपसरपंच जी. एम. देशमुख, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी ए.डी. शिंदे, अंगणवाडी सेविका रत्नमाला घोडगे, मदतनीस शेषीकला घोडगे, बिट जमादार ए.एस. शेख इ. उपस्थित होते. पुढील कार्यवाहीसाठी सदरीलल बालिकेस मा. बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले.

 

******

 

स्पर्धा परीक्षा मुलाखतीचे तंत्रे व तयारी या विषयावर ऑनलाईन वेबिनार

 

        हिंगोली (जिमाका), दि. 25 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली अंतर्गत जत्रा शासकीय योजनांची –सर्व सामान्यांच्या विकासाची या कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा मुलाखती तंत्रे व तयारी या विषयावर दि. 26 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता google meet https://meet.google.com/qyw-ersx-gvd  या लिंकवर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

            या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये डॉ.अनिल जाधव, सल्लागार, मॉडेल करिअर सेंटर, औरंगाबाद हे मार्गदर्शन करणार आहेत.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https://meet.google.com/qyw-ersx-gvd या ऑनलाईन लिंकवर (meeting URL)  क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app)  यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app)  मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (Mute) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

****

 

इच्छूक संस्थांनी कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रम चालविण्यासाठी

30 एप्रिल पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

                                                                                                             

हिंगोली (जिमाका), दि.25 : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-2024 करिता मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करुण्यासाठी इच्छूक पंजीकृत संस्थाकडून/व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थांकडून अर्ज मागविण्याबाबतची जाहिरात मंडळाच्या www.msbsde.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

प्रवेश सत्र 2023-24 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम/तुकडीवाढ सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छूक संस्थांनी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. तसेच संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे प्रस्तावाच्या 4 नस्ती दि. 30 एप्रिल, 2023 पूर्वी सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.  

*****