14 October, 2016

जिल्ह्यातील प्राचार्याची डिजीटल स्वाक्षरी व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 13 :- सन 2016-2017 या शैक्षणिक वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत विविध शैक्षणिक योजनाकरिता प्राचार्यांची डिजीटल स्वाक्षरी व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँकखात्याशी लिंक असणे आवश्यक केल्यामुळे संबंधित प्राचार्यांच्या डिजीटल स्वाक्षरी शिवाय आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक लिंक केल्याशिवाय शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, विद्यावेतन यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ विद्यार्थी व महाविद्यालय यांना मिळणार नाही. या बाबतच्या सूचना प्राचार्यांच्या आढावा बैठकीमध्ये वारंवार देऊनही संबंधित प्राचार्यांनी सदर बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे आज पर्यंत बहुतांश प्राचार्यांचे डिजीटल स्वाक्षऱ्या समाज कल्याण विभागास प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच किती विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक करण्यात आले या बाबतची माहिती महाविद्यालयाकडून मिळालेली नाही.
तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्वत:ची डिजीटल स्वाक्षरी करून त्या बाबत समाज कल्याण विभागास कळवावे व आपल्या महाविद्यालयात प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केल्याची खात्री करुन घ्यावी. नसल्यास त्या बाबत आपल्यास्तरावरूकार्यवाही करावी. परंतु सन 2016-2017 मध्ये प्राचार्यांची डिजीटल स्वाक्षरी आणि विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक न झाल्यामुळे समाज कल्याण विभागामार्फत कोणत्याही शैक्षणिक योजने पासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व संबंधित विद्यार्थी यांची राहिल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: