17 October, 2016

वैयक्तीक शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण व नवीन सामुहिक शेततळ्यासाठी
 अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 17 :- शेतकऱ्यांनी स्वखर्चाने उभारणी केलेल्या शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून 60.00 लाख व नवीन सामुहिक शेततळ्यासाठी 190.30 लाख रुपयांचे अनुदान शासनाने मंजुर केले आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी अनुदानासाठी कृषि विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यांची उभारणी केलेली आहे. पाणी साठवण क्षमता कायम राहण्यासाठी शेततळ्यांना प्लॅस्टिक अस्तरीकरण आवश्यक असते. इच्छूक शेतकऱ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
सध्या प्लॅस्टिक अस्तरीकरणास मंजुर झालेल्या अनुदानाच्या कार्यक्रमाचे शेततळ्यांच्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 हजार रुपये इतके अनुदान मंजुर केले जाते. प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी कोणत्याही योजनेचे बंधन नाही. अर्ज केल्यानंतर छाननी होऊन अनुदान देण्यात येणार आहे. विशेषत: फळबागा, भाजीपाला, औषधी वनस्पती, फुलांची लागवडसाठी उभारण्यात आलेल्या शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
नवीन सामुहिक शेततळे लाभार्थी निवडीकरिता पुढीलप्रमाणे निकष असणार आहे. :- सामुहिक शेततळे घटकाचा लाभ हा समुहासाठी आहे. समुहात दोन किंवा अधिक लाभार्थी असावेत. लाभार्थी संयुक्त कुंटूबातील नसावेत. लाभार्थी समुहाकडे असणाऱ्या फळबाग, भाजीपाला, फुले व औषधी वनस्पती इ. फलोत्पादन क्षेत्राशी निगडीत सामुहिक शेततळ्याचे आकारमान मंजूर करण्यात यावेत. एकूण फलोत्पादन क्षेत्राच्या किमान 50 टक्के फळबागांचे क्षेत्र असावेत.
फलोत्पादन क्षेत्र हेक्टर व सामुहिक शेततळ्यांचे मंजूर करावयाचे आकरमान घ. मी. पुढीलप्रमाणे :- 2.00 हेक्टर - 2 हजार, 5.00 हेक्टर - 5 हजार, 8.00 हेक्टर - 8 हजार, 10.00 हेक्टर - 10 हजार नवीन सामुहिक शेततळ्याचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व महिला प्रवर्गासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच फिरते हळद प्रक्रिया केंद्र साठी खर्चाच्या 40 टक्के अनुदान असून इच्छूक लाभार्थ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करण्यात यावा.

*****

No comments: