गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार
-- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली, दि. 17 : गारपीटग्रस्त शेती पिकांचे पंचनामे पुर्ण झाले असून
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे. त्याची निश्चितपणे नुकसान भरपाई
लवकरच देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सवाच्या प्रसंगी पालकमंत्री बोलत
होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
शिवरानीताई नरवाडे, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष टारफे, नगराध्यक्ष
बाबाराव बांगर, प्र. जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी.
तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, जिल्हा कृषी महोत्सव हे पुढील
पाच दिवस चालणार असून शेतकऱ्यांना विविध स्टॉलच्या माध्यमातून उत्पन्न वाढण्याविषयी
मार्गदर्शन मिळणार आहे. कृषी विभागाने या प्रदर्शनाच्या माध्यमातूनच नाही तर मोठमोठ्या
शहरामध्ये सुध्दा शेतकऱ्यांच्या मालाची व भाजीपाल्याची विक्री करणार आहे. तसेच विधीमंडळाच्या
सभागृहाच्या बाहेरसुध्दा आठवडी बाजार सुरू केलेले आहे. दुष्काळामध्ये सुध्दा शासन शेतकऱ्यांच्या
पाठीशी खंबीरपणे उभा असून दोन रुपये किलो दराने गहु व तीन रुपये किलो दराने तांदुळ
अन्न सुरक्षा योजनेतून शेतकऱ्यांना दिले.
दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यभर जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून
बंधाऱ्याच्या कामाच्या खोलीकरणातून पावसाचे पाणी अडवून शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक
प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून न राहता पशुसंवर्धन
व दुग्धव्यवसाय विभागाच्या योजनेच्या माध्यमातून
जोडधंदा करून उत्पन्न घ्यावे. शेतकरी कर्जमाफी योजनेत 40 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी
झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना ही दोन चार दिवसात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
पावसाचे पाणी अडवून नदी व विहिरीची पाणी पातळी वाढली असून सुक्ष्म सिंचनाच्या
माध्यमातून शेतकऱ्यांनी पाण्याच्या अवलंबतेवर पिकाचे नियोजन करून ठिबक सिंचनाव्दारे
शेती करावी असे आवाहन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. जिल्हा कृषी महोत्सवात महिलांनी
सुध्दा सक्रीय सहभाग नोंदवला असून बचत गटाच्या माध्यमातून आपल्या कुटूंबाला सावरण्याच
काम त्या करीत आहेत. बचत गटाला अतिशय अल्प दराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश
बँकांना दिले आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बचत गटाला 100 टक्के अनुदानावर
मागासवर्गीयांना ट्रॅक्टर मोफत देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी
सांगितले.
प्रारंभी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित केलेली कृषी दिंडीला पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी उपस्थिती लावली
तसेच जिल्हा कृषी महोत्सवात उभारण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी केली.
यावेळी
आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष टारफे, प्र. जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, मुख्य
कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांची समयोचित भाषणे झाली.
येथील देवडा अंध विद्यालयाच्या अंध विद्यार्थीनींनी स्वागतपर गीत गायले.
याप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्तेअंध विद्यार्थीनीना पुष्पगुच्छ देऊन
सत्कार करण्यात आला. तसेच पांगरा शिंदे येथील प्रगतशील शेतकरी नारायण शिंदे व तोंडापूर
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पी. पी. शेळके यांनी कयाधू यंग 49 या नवीन
वाणाचे संशोधन लावला असून जिल्हा कृषी महोत्सवात सदरील वाण उपलब्ध आहे. शेतीविषयक तंत्रज्ञानाची
शेतकऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने रिलायन्स कंपनीचे एम किसान सॉफ्टवेअरचे उदघाटन
पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाले या सॉफ्टवेअरमधून शेतकऱ्यांना शेतीविषयक
तंत्रज्ञानाची ऑडिओ क्लिप व एसएमएस ची माहिती मिळणार आहे.
सदर
कृषी महोत्सवाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक मिलिंद जाधव यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला बचत गटाच्या
महिला, पत्रकार, अधिकारी / कर्मचारी व स्टॉल विक्रेत्याची उपस्थिती होती.
जिल्हा कृषी महोत्सवाचे प्रदर्शन दि. 21 फेब्रुवारी, 2018 पर्यंत सर्वांसाठी
खुले राहणार आहे याचा लाभ शेतकरी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment