27 September, 2018


स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी ‘लोकराज्य’ मासिक उपयुक्त




        हिंगोली,दि.27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिध्दी होणारे ‘लोकराज्य’ मासिक स्पर्धा परिक्षेच्या तयारी करीता अत्यंत उपयुक्त मासिक असल्याचे प्राचार्य डॉ. आर. एन. इंगळे यांनी केले.
            वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालय येथे ‘लोकराज्य’ वाचक मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य इंगळे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, उप प्राचार्य प्रा. एन. एन. लोखंडे, प्रा. डॉ. पी.जी. गवळी, प्रा. ए. एन. कल्याणकर यांची उपस्थिती होती.
            यावेळी प्राचार्य इंगळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ केवळ मासिक नसून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम, यशकथा आदीची माहिती देणारे महत्वपूर्ण मासिक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अवांतर वाचनाची आवश्यकता असते आणि यासाठी ‘लोकराज्य’ मासिक महत्वाचे असून, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या मासिकाचे वर्गणीदार व्हावे.  शासनाने अत्यंत अल्प दरात आपणांकरीता हे मासिक उपलब्ध करुन दिले आहे, असेही प्राचार्य इंगळे यावेळी म्हणाले.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी म्हणाले की शासनाच्या विविध योजना आणि विविध माहितीची प्रचार आणि प्रसिध्दी करण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत होते. त्याचाच एक भाग म्हणून महासंचालनालयातर्फे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ हे मासिक दरमहा प्रसिध्द केले जाते. या ‘लोकराज्य’ मासिकात राज्य शासनाच्या विविध योजना, शासन निर्णय, मंत्रीमंडळाचे निर्णय, विविध उपक्रम, यशकथा आदी  अधिकृत माहिती, आकडेवारीसह देण्यात येते. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनीनी आतापासूनच आपले ध्येय निश्चित करुन आपल्या भविष्याकडे वाटचाल करावी. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी आजच ‘लोकराज्य’ मासिकाचे वर्गणीदार व्हावे.        
            यावेळी प्रा. डॉ. पी. जी. गवळी यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुलकर्णी यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****





तोष्णीवाल महाविद्यालय येथे ‘लोकराज्य’ वाचक मेळावा संपन्न

        हिंगोली,दि.26: सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालय येथे आज ‘लोकराज्य’ वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुळे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, प्रा. धनाजी पाटील यांची उपस्थिती होती.
            यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणारे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिका विषयी तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ‘लोकराज्य’ मासिक कसे उपयुक्त आहे याची ही माहिती यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनीना देण्यात आली.
            यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुळे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. , प्रा. धनाजी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रा. शंकर पजाई यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. कुलदीप पवार यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****



कै. बाबूराव पाटील महाविद्यालय येथे ‘लोकराज्य’ वाचक मेळावा संपन्न


        हिंगोली,दि.26 : येथील कै. बाबूराव पाटील महाविद्यालय येथे ‘लोकराज्य’ वाचक मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एस. भोयर, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, प्रा. एस.पी. बलखंडे, प्रा. एम.बी. डोखळे यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी शासनाच्या विविध योजना आणि विविध माहितीची प्रचार आणि प्रसिध्दी करण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत होते. त्याचाच एक भाग म्हणून महासंचालनालयातर्फे शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ हे मासिक प्रकाशित केले जाते. ‘लोकराज्य’ मासिकात राज्य शासनाची अधिकृत माहिती, आकडेवारीसह उपलब्ध होते. ‘लोकराज्य’ हे केवळ मासिक नसून ते महत्वाचा संदर्भ ग्रंथ असल्याचे सांगुन, विद्यार्थी-विद्यार्थीनीना प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी  ‘लोकराज्य’ मासिकाचा महत्व सांगितले. 
            प्राचार्य भोयर यावेळी म्हणाले की, ‘लोकराज्य’ केवळ मासिक नसून महत्वपूर्ण असा संदर्भ ग्रंथ आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातही ‘लोकराज्य’ मासिक महत्वाचे स्थान आहे. शासनाने अत्यंत अल्प दरात आपणांकरीता हे मासिक उपलब्ध करुन दिलेले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी  ‘लोकराज्य’ मासिक महत्वाचे असून, या संधीचा सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीनी लाभ घेवून आता पासूनच आपणांस कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याचे ध्येय निश्चित करुनच भविष्याची तयारी करावी, असेही प्रा. भोयर यावेळी म्हणाले.
            यावेळी प्रा. एस.पी. बलखंडे,  प्रा. एम.बी. डोखळे यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रा. एन.एम. फड यांनी केले तर प्रा. के. एस. इंगळे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****


25 September, 2018


जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन


        हिंगोली,दि.25: पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
          येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा निवासी उप जिल्हाधिकारी  खुदाबक्ष तडवी,  उप जिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर, खनीज कर्म अधिकारी श्री कळसकर, नायब तहसिलदार श्री. मीटकरी, श्री. कावरखे, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

****


23 September, 2018





जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ
- पालकमंत्री दिलीप कांबळे

            हिंगोली,23: केंद्र शासनाची महत्वाकांक्षी  ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ चा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून, या आरोग्य योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ च्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, आज शुभारंभ झालेल्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेसोबतच राज्य शासनाची  ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ ही एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. आयुष्यमान जन आरोग्य योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असून, यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही. या योजनेअंतर्गत 1300 हून अधिक गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. हे उपचार देशातील कोणत्याही शासकीय किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये करता येणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांना देखील सहभागी करुन घेतले जाणार असून हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी योजनेमुळे देशातील नगारिकांना आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली असून, नागरिकांनी या योजने अंतर्गत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेत गंभीर आजारापासून सावध राहावे.
            तसेच या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा यासाठी आशाताई सेविकांची जबाबदारी वाढली आहे. तसेच  लोकप्रतिनीधीनी देखील या योजेनेचा व्यापक प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांना या महत्वाच्या योजनेची माहिती करुन द्यावी असे ही पालकमंत्री कांबळे यावेळी म्हणाले.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, आज आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांतीकारी योजनेची सुरुवात झाली आहे. सन 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य योजनेतंर्गत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपल्या जीवन आणि आरोग्य सुरक्षीत करावे. तसेच  या योजनेबाबत अधिक माहितीकरीता 14555 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
            आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाना देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. सर्वांना सांकेतीक क्रमांक देण्यात येणार आहे सदर क्रमांक सांगितल्या नंतर त्याला आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेतंर्गत वर्षातून एक वेळेस पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ वैद्यकीय उपचाराकरीता मिळणार आहे. याकरीता आता लाभार्थ्यांना शिधापत्रिका किंवा कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता लागणार नाही. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 117 लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत जन आरोगय योजने अंतर्गत नोंद झाली आहे. तसेच या योजने अंतर्गत राज्यातील पहिले ई-कार्ड हे हिंगोली जिल्ह्यात तयार झाल्याची माहिती प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
            यावेळी आयुष्यमान भारत योजने सोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा यावेळी निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘ई-कार्ड’चे वाटप करण्यात आले.
            कार्यक्रमाचे सुत्र संचालन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी केले तर डॉ. कवटे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, आशाताई सेविका, नागरिकांची मोठ्या उपस्थिती होती.
****


19 September, 2018



माहिती अधिकार हा जनतेला अधिकार देणारा कायदा
-- माहिती आयुक्त दिलीप धारुरकर
·         माहिती अधिकाराच्या 352 प्रकरणाची सुनावणी

            हिंगोली,19: लोकशाही मध्ये माहिती अधिकार कायद्यास महत्वाचे स्थान आहे. माहिती अधिकार देणारा कायदा असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला न्याय मागण्याचा अधिकार प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत श्री. धारुरकर बोलत होते. यावेळी आयोगाचे सहसचिव श्री. सरोदे, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांची उपस्थिती होती.
            पुढे श्री. धारुरकर म्हणाले की, समाज उभारणीसाठी माहिती अधिकाराचा उपयोग शस्त्र म्हणून झाला पाहिजे.
प्रशासकीय पातळीवरील व्यक्तीगत स्वरुपाच्या अडचणी सोडवण्यासाठी या कायद्याचा पंचवीस ते तीस टक्के उपयोग केला जातो. समाज उभारणीसाठी आणि विकास प्रक्रिया गतीमान करण्यासाठी या अधिकाराचा शस्त्र म्हणून उपयोग होणे आवश्यक असून, या माहिती अधिकाराचा वापर हा जनहितासाठी होणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेने माहितीचा अधिकार कायद्याची माहिती करुन घेवून स्वयंस्फूर्तीने माहिती प्रकट करावी. तसेच या कायद्याची सकारात्मक  अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूला समतोल असणे आवश्यक आहे.
            माहिती अधिकारातंर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 400 प्रकरणे दाखल झाली होती. याकरीता आयोगाने हिंगोलीत येऊनच सदर प्रकरणांवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ग्रामीण भागातील प्रकरणे जास्त होती. योग्यरितीने किंवा नियमानुसार राबविण्यात न आलेल्या शासकीय योजना आणि शासकीय अभिलेखांचे नीट जतन न केल्याबाबतच्या प्रकरणांचा समावेश होता. माहिती अधिकाराचा कायदा संवेदनशील असून, यामुळे शासकीय कामकाज योग्यरितीने  होण्यास आणि शासकीय योजना व्यवस्थित नियमानुसार राबविण्यास मदत होत असल्याचे ही माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी सांगितले.
            या उपक्रमातंर्गत औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी हिंगोली जिल्ह्यातील 400 प्रकरणांवर सुनावणी घेवून निपटारा करण्यासाठी 18 आणि 19 सप्टेंबर, 2018 रोजी येथील डी.पी.सी. सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दोन दिवसीय सुनावणी घेतली. यामध्ये पहिल्या दिवशी 202 तर दूसऱ्या दिवशी 150 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्याची माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी दिली.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या मार्फत प्रकाशित होणारे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा अंक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी यावेळी माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांना भेट दिला.
****


18 September, 2018

महाराष्ट्रातील 3 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार हिंगोली जिल्ह्यातील 1 तर लातूरच्या 2 शाळांचा सन्मान






महाराष्ट्रातील 3 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार
हिंगोली जिल्ह्यातील 1 तर लातूरच्या 2 शाळांचा सन्मान

            नवी दिल्ली,18: हिंगोली जिल्ह्यातील गोटीवाडी येथील ‘पोस्ट बेसिक आश्रम शाळे’ला ‘स्वच्छ विद्यालय’ या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्य हस्ते आज गौरविण्यात आले, तर लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे या जिल्ह्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.  विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
            येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  केंद्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, केंद्रीय शालेय शिक्षण  विभागाच्या सचिव रिना रे, सहसचिव मनिष गर्ग, सीबीएससीच्या अध्यक्ष अनिता करवाल उपस्थित होते.      
            याप्रसंगी देशभरातील एकूण 52 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी 37 शाळा या ग्रामीण भागातील तर 15 शाळा शहरी भागातील आहेत.  एकूण 52 पैकी  45 शाळा या शासकीय अथवा शासकीय अनुदान प्राप्त आहेत. 7 शाळा खाजगी आहेत. आज प्रदान झालेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, 50 हजार रूपये रोख असे आहे. 50 हजार रूपये शाळांच्या खात्यात डिजीटल सेवेतंर्गत जमा करण्यात आलेले आहेत. 
हिंगोलीतील गोटेवाडीच्या आश्रम शाळेला पुरस्कार
            हिंगोली जिल्ह्यातील गोटेवाडी येथील ‘पोस्ट बेसिक आश्रम शाळे’ला स्वच्छतेच्या सर्व कसोटया पुर्ण केल्याबद्दल ‘स्वच्छ विद्यालय’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरिवण्यात आले. पुरस्कार आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. विशाल राठोड, मुख्याध्यापक साहेबराव आवचर आणि विद्यार्थी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लातूर जिह्याला 3 पुरस्कार
            लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे या जिल्ह्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सामाजिक न्याय विभागाचे  जिल्हा प्रमुख श्री बाबासाहेब आरवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशभरातील केवळ 9 जिल्ह्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
****

वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा, वारंगा फाटा येथील कर्मचारी सतत गैरहजर


वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा, वारंगा फाटा
येथील कर्मचारी सतत गैरहजर

        हिंगोली, दि.18: वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा, वारंगा फाटा ता. कळमनुरी येथे वसतिगृह विभागातील कामाठी या पदावरील कर्मचारी प्रविण वामनराव जाधव हे दिनांक 10 फेब्रुवारी 2018 पासून विनापरवानगी सतत गैरहजर आहेत, असे उपजिल्हाधिकारी (सा), हिंगोली यांनी कळविले आहे.
0000