06 September, 2018

जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार


जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार

हिंगोली, दि.6: गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे, जो मुख्यत: मुलांना होतो. सन 2016 च्या आकडेवाडीनुसार गोवर आजारामुळे भारतामध्ये दरवर्षी अनेकजण मृत्युमुखी पडतात. रुबेला या आजाराचा संसर्ग गर्भवती स्त्रियांना झाल्यास त्यांचा अचानक गर्भपात किंवा जन्मजात दोष असे की (अंधत्व, बहिरेपणा आणि हृदयविकृती) होऊ शकते.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2018 मध्ये जिल्ह्यात गोवर-रुबेला लसिकरण मोहिम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या मोहोमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्षापर्यंत वयोगटातील जवळपास 9 लक्ष लाभार्थ्यांचे लसिकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सदर लसिकरण मोहिमेच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबी निश्चित करण्यात आलेल्या आहेत, त्याबाबी पुढील प्रमाणे आहेत.
निश्चित लाभार्थ्यापैकी काही लाभार्थ्यांना जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्यांना हा अतिरिक्त डोस द्यावयाचा आहे. मोहिमेसाठी निर्धारित करण्यात आलेल्या वयोगटातील एकूण लाभार्थ्यांपैकी 60-65 टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत. गोवर रुबेला लसिकरण मोहिम शुभारंभ झाल्यानंतर किमान 4-6 आठवड्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत आरोग्य विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पहिल्या 2-3 आठवड्यात लसिकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत 35-40 टक्के लाभार्थ्यांचे गोवर रुबेला लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमित लसिकरण सत्राच्या किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी करण्यात येईल., लसिकरण मोहिमेतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन दिले जाईल. मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक ग्रामीण आणि नागरी भागामध्ये 100 टक्के लाभार्थ्यांना लसिकरण करणे आवश्यक आहे. गोवर रुबेला लसिकरण मोहिमेमध्ये शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, गृहविभाग, अल्पसंख्यांक विभाग, माहिती व प्रसारण विभाग, रेल्वे विभाग, पंचायतीराज विभाग इत्यादींची मोहिम यशस्वी करण्यासाठी  महत्वाची भूमिका आहे. खाजगी शाळांचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा पुरविणारे सर्व विभाग यांचा सुध्दा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. येथून पुढे होणाऱ्या सर्व प्रकारच्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व गावपातळीवरील आढावा सभा, कार्यशाळा, जाहीर सभा अशा प्रत्येक ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविली आहे.  

*****

No comments: