27 September, 2018


स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी ‘लोकराज्य’ मासिक उपयुक्त




        हिंगोली,दि.27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिध्दी होणारे ‘लोकराज्य’ मासिक स्पर्धा परिक्षेच्या तयारी करीता अत्यंत उपयुक्त मासिक असल्याचे प्राचार्य डॉ. आर. एन. इंगळे यांनी केले.
            वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालय येथे ‘लोकराज्य’ वाचक मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य इंगळे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, उप प्राचार्य प्रा. एन. एन. लोखंडे, प्रा. डॉ. पी.जी. गवळी, प्रा. ए. एन. कल्याणकर यांची उपस्थिती होती.
            यावेळी प्राचार्य इंगळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ केवळ मासिक नसून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम, यशकथा आदीची माहिती देणारे महत्वपूर्ण मासिक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अवांतर वाचनाची आवश्यकता असते आणि यासाठी ‘लोकराज्य’ मासिक महत्वाचे असून, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या मासिकाचे वर्गणीदार व्हावे.  शासनाने अत्यंत अल्प दरात आपणांकरीता हे मासिक उपलब्ध करुन दिले आहे, असेही प्राचार्य इंगळे यावेळी म्हणाले.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी म्हणाले की शासनाच्या विविध योजना आणि विविध माहितीची प्रचार आणि प्रसिध्दी करण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत होते. त्याचाच एक भाग म्हणून महासंचालनालयातर्फे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ हे मासिक दरमहा प्रसिध्द केले जाते. या ‘लोकराज्य’ मासिकात राज्य शासनाच्या विविध योजना, शासन निर्णय, मंत्रीमंडळाचे निर्णय, विविध उपक्रम, यशकथा आदी  अधिकृत माहिती, आकडेवारीसह देण्यात येते. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनीनी आतापासूनच आपले ध्येय निश्चित करुन आपल्या भविष्याकडे वाटचाल करावी. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी आजच ‘लोकराज्य’ मासिकाचे वर्गणीदार व्हावे.        
            यावेळी प्रा. डॉ. पी. जी. गवळी यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुलकर्णी यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****



No comments: