04 September, 2018

‘लोकराज्य’ शासनाची अधिकृत माहिती देणारे मासिक -- प्राचार्य गणेश शिंदे


‘लोकराज्य’ शासनाची अधिकृत माहिती देणारे मासिक


                                        -- प्राचार्य गणेश शिंदे
        हिंगोली,दि.04:  स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तसेच राज्यातील जनतेला शासनाच्या विविध उपक्रम आणि योजनाची अधिकृत माहिती देणारे लोकराज्य हे एकमेव मासिक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य गणेश शिंदे यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘लोकराज्य’ वाचक अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने येथील शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात ‘लोकराज्य’ वाचक अभियान मेळावाप्रसंगी जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक संस्थेचे प्राचार्य गणेश शिंदे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बाळासाहेब क्षीरसागर आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. शिंदे म्हणाले की, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतू जीवनामध्ये यश संपादन करुन उज्ज्वल भविष्यासाठी अवांतर वाचनाचे अत्यंत महत्व आहे. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन कालावधीतच स्पर्धा परिक्षाची तयार करण्याची आवश्यकता आहे. आणि याकरीता अवांतर वाचनाची आवश्यकता असते आणि यासाठी लोकराज्य मासिकाचे वाचन हे अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेची तयारी होवू शकते तसेच नागरिकांना शासनाच्या  विविध उपक्रमाची देखील माहिती होण्यास मदत होते.
            पूर्वी माहितीची साधने कमी असल्याने शासनाच्या उपक्रमाची माहित मिळण्यास अडचण होती. परंतू आता लोकराज्यसारख्या मासिकद्वारे सर्व योजनेची माहिती मिळत आहे. सदर मासिक ऑनलाईन देखील उपलब्ध आहे. यामुळे विविध क्षेत्रातील संधीची माहिती आपणांस सहज उपलब्ध होण्यास मदत होत आहे. लोकराज्य मासिकांचे दरमहा प्रसिध्द होणारे  विविध विशेषांक हे अधिकृत वाचनीय व माहितीपूर्ण असतात. त्याकरीता जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
            प्राचार्य श्री. क्षीरसागर यावेळी म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणारे शासनाचे  ‘लोकराज्य’ मासिक हे अत्यंत उपयुक्त असून हे मासिक स्पर्धा परिक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी  स्पर्धा परिक्षेची तयारी करत आतापासूनच आपले भविष्य सुरक्षित करावे.
            जिल्हा माहिती अधिकारी श्री. अरुण सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच यावेळी मान्यवरांनी  जिल्हा माहिती कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलला भेट दिली.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. येवले यांनी केले तर यांनी प्रा. इंगोले यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****

No comments: