02 November, 2019






अतिवृष्टीने झालेल्या पिक नुकसानीची
पालकमंत्री यांनी केली पाहणी
हिंगोली, दि.2: मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्ह्यात  दौरा करुन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसान परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
मा. मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करुन व पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते.त्या अनुषंगाने पालकमंत्री अतुल सावे यांनी आज सेनगांव तालूक्यातील मौजे येलदरी, चिंचखेडा, भानखेडा, भानखेडा तांडा, हत्ता आणि हिंगोली तालुक्यातील मौजे केसापूर व सवड येथील सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी नुकसान झालेल्या शेतशिवारातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, तहसिलदार जिवककुमार कांबळे, कैलासचंद्र वाघमारे, ज्योती पवार आदीसह सर्व संबंधीत यंत्रणाप्रमुखांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, अतिवृष्टीमूळे काढणीला आलेल्या पिकाचे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांची स्थिती अत्यंत बिकट आहे.  नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन पंचानामे करुन अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानुसारच झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकरी बांधवांना अनुदान मिळणार आहे. तरी शेतक-यांनी अशा परिस्थितीत धीर सोडू नये. या नैसर्गीक आपत्तीच्या प्रसंगी शासन पुर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वोतपरी मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले. 
शासनाकडे हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेत पिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात झालेल्या पाहणीनुसार शासनस्तरावर सरसकट नुकसान भारपाई देण्यासाठी पाठपुरावा करणार असून ज्याठिकाणी शासनाची संबंधीत यंत्रणा पोहचली नसेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर जिओ टॅग करुन फोटो अपलोड केल्यास ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी शेतक-यांशी संवाद साधतांना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पाहणी व पंचानामे करुन शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांनी सबंधीत यंत्रणेला दिले.
यानंतर कळमनुरी तालूक्यातील मोजे उमरा व औंढा तालुक्यातील मौजे बोरजा, येहळेगाव आणि वसमत तालूक्यातील वाई या गावास पालकमंत्री श्री. सावे यांनी यावेळी भेट देवून तेथील नुकसान ग्रस्त शिवारांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पाहणी दौऱ्यात पदाधिकारी, अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, शेतक-यांची उपस्थिती होती.

*****


No comments: