25 November, 2019

पाणी बचतीचे तंत्र वापरल्याखेरीज लाभधाराकांना जलाशयातील पाणी उपलब्ध होणार नाही


पाणी बचतीचे तंत्र वापरल्याखेरीज लाभधाराकांना जलाशयातील पाणी उपलब्ध होणार नाही

हिंगोली, दि.25: महाराष्‌ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 मधील कलम 14(4) नुसार बारमाही पिकांना निर्धारीत केलेल्या दिनांकापासून ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरल्या खेरीज कालव्यामधून पाणी दिले जाणार नाही. या बचतीमधून भविष्यातील वाढीव पिण्याच्या पाण्याची मागणी भागवून शिल्लक राहिलेले पाणी लाभक्षेत्रातील तसेच लगतच्या भागात समन्यायी तत्वावर वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिनांक 20 मे, 2019 च्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार क जुलै 12, 2019 नुसार जलसंपदा प्रकल्पातील जलाशयातील उपसा सिंचन योजनांना ऊस, केळी व फळबागा इत्यादी बारमाही पिकांसाठी, शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरल्याखेरीज 31 ऑक्टोबर 2020 नंतर जलाशयातून पाणी उपलब्ध करुन दिले जाणार नाही. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांची जलाशयातील पाणी उपसा परवानगी कालवा अधिकारीमार्फत रद्द केली जाईल. सर्व बागायतदारांनी, लाभधारकांनी ठिबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावे असे आवाहन अधिक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड यांनी केले आहे.

***

No comments: