11 November, 2019

ग्रामीण डाक सेवक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती


ग्रामीण डाक सेवक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती

·   महाराष्ट्रासाठी एकूण 3 हजार 650 जागा रिक्त
·   नांदेड जिल्ह्यासाठी 154 ग्रामीण डाक सेवकांची पदे रिक्त

         हिंगोली, दि.11 : भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकूण 3 हजार 650 जागा रिक्त असून नांदेड जिल्ह्यासाठी 154 ग्रामीण डाक सेवकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर आहे. या पदाकरीता उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त दहावीच्या गुणातील गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जदार हा 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावा. ओबीसीसाठी 3 वर्ष, एससी-एसटी साठी 5 वर्ष आणि अपंगांसाठी 10 वर्षे वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे . जे उमेदवार ओ.बी.सी., एस.सी., एस.टी . पदासाठी आरक्षित नसतील तेच उमेदवार ई.डब्ल्यू.एस. पदासाठी पात्र असतील ई.डब्ल्यू.एस. पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष वयोगटातील असावी.
नांदेड डाक विभागातील एकूण 154 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 75, एस. सी. साठी 14, एस.टी. साठी 12 आणि ओ.बी.सी. साठी 38 तसेच ई.डब्ल्यू.एस. साठी 15 जागा आरक्षित केलेल्या आहेत. या भरतीसाठी अर्जदारांनी  https://indiapost.gov.in अथवा http://appost.in/gdsonline या संकेतस्थळाला भेट द्यावी व ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत 1 ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. संबंधित संकेतस्थळावर पात्रता निकष याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरावेत असे आवाहन डाक अधिक्षक, नांदड यांनी केले आहे.

****




No comments: