30 December, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 08 रुग्ण ; तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज 56 रुग्णांवर उपचार सुरु

 

         हिंगोली,दि. 30 : जिल्ह्यात 08 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

       आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 02 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 04 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती, तर वसमत परिसर 01 व्यक्ती असे एकूण 08 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 01 कोविड-19 रुग्ण बरा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 02 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़. व 01 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 03 कोविड-19 रुग्णांवर सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 515 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 406 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 56 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 53 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****

29 December, 2020

अशासकीय कल्याण संघटक पदाकरीता संपर्क साधावा

 

 अशासकीय कल्याण संघटक पदाकरीता संपर्क साधावा

 

हिंगोली,दि.29: जिल्ह्यातील सर्व माजी ऑरनरी नयाब सुबेदार/सुबेदार/सुबेदार मेजर यांच्याकडुन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली येथे अशासकीय कल्याण संघटक पद भरण्याकरीता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

तरी जिल्ह्यातील सर्व माजी नयाब सुबेदार/सुबेदार यांना आवाहन करण्यात येते की अशासकीय कल्याण संघटक या पदाकरीता दि. 03 जानेवारी, 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली येथे संपर्क साधवा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 हिंगोली,दि.29: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय आणि  आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू-2, (महिला-1, पुरुष-1), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1 व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-1, यांच्या कार्याच्या योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये 10 हजार देण्यात येणार असून पुरस्काराचे वर्ष 01 जुलै, 2019 ते 30 जुन 2020 असे राहील.

जिल्ह्यातील उत्कृष्ठ कामगीरी करणारे खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता यांनी दि.09 जानेवारी ,2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत आपले प्रस्ताव सादर करावे. या अगोदर प्रस्ताव सादर केलेल्यांनी परत प्रस्ताव सादर करु नयेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलिमोद्दीन फारुखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.****

सातव्या आर्थिक गणनेसाठीची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न

 

सातव्या आर्थिक गणनेसाठीची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न

हिंगोली, दि.29:सातव्या आर्थिक गणनेसाठी गठीत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक 28 डिसेंबर, 2020 रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी श्री. गिरगावकर,  नगर प्रशासन अधिकारी शैलेश फडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पारवेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आर्थिक गणनेच्या कामामध्ये कुठलीही व्यावसायिक आस्थापना सुटणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या भागामध्ये गणनेचे काम शिल्लक असेल त्याठिकाणी स्थानिक प्रशासन आणि जनतेचे सहकार्य घेवुन सदर गणनेचे काम पुर्ण करावे अशा सूचना केल्या. समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पारवेकर यांनी आर्थिक गणनेचे काम हे जिल्ह्याच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत करण्यात येत असून जिल्ह्यात गणनेचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे फक्त काही भागामध्ये गणनेचे काम शिल्लक असुन ते लवकरच पुर्ण होणार असल्याचे सांगितले.

****

नाबार्डच्या संभाव्य वित्त आराखड्याचे विमोचन

 


नाबार्डच्या संभाव्य वित्त आराखड्याचे विमोचन

            हिंगोली,दि.29: जिल्ह्यासाठी सन 2021-22 नाबार्डच्या संभाव्य वित्त आराखड्याचे विमोचन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आज  करण्यात आले. यावेळी बैठकीस महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उपमहाप्रबंधक जी. आर. शिंदे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शशिकांत सावंत, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक पी.एम. जंगम, आरसेटी संचालक धनाजी बोईले यांच्यासह बँक प्रतिनिधीची उपस्थिती होती.

            नाबार्डच्या संभाव्य कर्ज आराखड्यानुसार सन 2021-22 साठी 1597.25 कोटी रुपयांचे पीक कर्ज निश्चित करण्यात आले आहे. तसेच शेतीमधील मुदत कर्जासाठी 262.80 कोटी रुपयांचा संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. शेतीसह शेतीपूरक कर्ज तसेच एमएसएमई, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, अक्षय ऊर्जा इत्यादी प्राथमिक क्षेत्रातील सर्व घटकांरिता हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण 2564.59 कोटी रुपयांचा कर्ज आराखडा तयार करण्यात आला आहे.

            यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सर्व बँक प्रतिनिधींना दिलेल्या लक्षांशानुसार वेळेत कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या.

****

24 December, 2020

नाफेडच्या वतीने हमीभावाने तूर खरेदी सुरु 28 डिसेंबरपासून नोंदणी करण्याचे आवाहन

 


 

हिंगोली, दि.24: केंद्र शासनाच्या वतीने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2020-21 या हंगामामध्ये नाफेडच्या वतीने हमीभावाने तूर खरेदी सुरु करण्याबाबत शासनाने दिनांक 21 डिसेंबर,2020 च्या पत्रान्वये कळविले आहे. त्याप्रमाणे परभणी व हिंगोली जिल्ह्यात जिंतूर, पूर्णा, पाथरी, सोनपेठ, बोरी, सेलू, जवळा बाजार, वसमत, हिंगोली, कळमनुरी, सेनगाव या 11 केंद्रांवर तूर खरेदीसाठी दिनांक 28 डिसेंबर, 2020 पासून नोंदणी सुरु करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ज्या त्या तालुक्याच्या खरेदी केद्रावर नोंदणी करण्यात यावी, नोंदणीसाठी आधारकार्ड, चालू वर्षाचा ऑनलाईन सातबारा उतारा, पिकपेरा, बँकेचे पासबूक ही कागदपत्रे स्कॅन करुन नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, परभणी / हिंगोली यांनी केले आहे.

*****

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 15 बाल कामगारांची सुटका

 



 

 हिंगोली, दि. 24 : शहरातील नांदेड नाका परिसर, बस स्थानक, मच्छी मार्केट, इंदिरा चौक, हॉटेल व गॅरेज इ. ठिकाणी पथकांकडून बालकामगार शोध मोहिम राबविण्यात आली. ज्या मध्ये बालकामगार, अनाथ, निराधार, निराश्रीत व एक पालकत्व असलेल्या बालकांना बाल कल्याण समिती समोर हजर करुन त्यांना बालगृहात प्रवेश दिला जातो. शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. तसेच त्यांना बालसंगोपन योजनेंतर्गत 18 वर्षाखालील बालकांना शासनाच्या वतीने मासिक 425 रुपये लाभ दिला जातो. यामुळे साहजिकच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवन सुखकर होण्यास मदत होते. शहरात मोहिम राबवित असतांना सापडलेल्या 15 बालकामगारांचे व त्यांच्या पालकांचे जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने समुपदेशन करुन त्यांची सुटका केली व पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

येथील पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दि. 23 डिसेंबर, 2020 रोजी ऑपरेशन मुस्कान मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेचे आयोजन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, पोलीस उप अधीक्षक आश्विनी जगताप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे, तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले होते.

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस जमादार शेख इस्माईल, म.पो.अ. श्रीमती स्वाती डोल्हारे, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी मोहिम राबविण्यासाठी सहकार्य केले.

*****

23 December, 2020

लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक -- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 


 


         हिंगोली, दि. 23 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक असून या ॲपवर नोंदणी  करतांना वापरण्यात आलेले ओळखपत्रच लसीकरणाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे, त्याशिवाय लस दिली जाणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोव्हिड-19 कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे औरंगाबाद विभागाचे सर्वेलन्स मेडीकल ऑफीसर डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गित्ते, उपविभागीय अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आय.एम.ए., आय.पी.ए., निमा संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 

  श्री. जयवंशी पुढे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेत काम करणारे शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, अधिकारी-कर्मचारी यांना कोव्हिडची लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या यंत्रणेला आदेश देवून त्याचे नियोजन करावे. तसेच या लसीकरणासाठी लसीकरणाचे ठिकाण लसीकरणासाठी लागणारे कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले.

             प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 लोकांना लस देण्याचे नियोजन असून त्याप्रमाणे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे निश्चित करुन अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करावी, तसेच  प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षालय कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष स्थापन करावे. तसेच या केंद्रावर हॅन्ड सॅनिटायझर, मास्क    सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. लसीकरणासाठी टोकन पध्दत अवलंबविण्यात यावी. तसेच प्रत्येक केंद्रावरील निरुपयोगी साहित्याची तात्काळ विल्हेवाट लावावी. तालुकास्तरावर टास्क फोर्सची दर शुक्रवारी बैठका घेवून वेळोवेळी आढावा घ्यावा, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.

            या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे औरंगाबाद विभागाचे सर्वेलन्स मेडीकल ऑफीसर डॉ. मुजीब सय्यद यांनी कोव्हिड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तीन टप्प्यात लसीकरण करण्याचे नियोजन असून कोविन ॲपद्वारे रुग्णांची नोंद करणे, एसएमएस देणे, माहिती संकलीत करणे तसेच लसीकरणाविषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

*****

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 07 रुग्ण ; एका रुग्णाचा मृत्यू 03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज तर 27 रुग्णांवर उपचार सुरु

 


          हिंगोली,दि. 23 : जिल्ह्यात 07 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

        आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, कळमनुरी परिसरात 02 व्यक्ती आणि सेनगांव परिसरात 04 व्यक्ती असे एकूण 07 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज कोव्हिड-19 मुळे आज एका जणाचा मृत्यू झाला असून 03 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

        सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़. व 01 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशा एकूण 04 रुग्णांवर सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 471 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 388 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 30 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 53 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****

 

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 28 डिसेंबर रोजी आयोजन इच्छूक कलावंतानी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 


         हिंगोली, दि. 23 : राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये सन 2020-21 या वर्षात युवा महोत्सव या योजनेंतर्गत जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे.

            हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन        दि. 28 डिसेंबर, 2020 रोजी करण्यात येणार आहे. देशात कोव्हिड-19 महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार होऊन कोणत्याही प्रकारचे एकत्रीकरणास मनाई आहे. म्हणून या वर्षी शासनाच्या प्राप्त सूचनानुसार युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी कलाकारांनी आपले सादरीकरण हे विद्यालय, महाविद्यालयाच्या रंगमंचावर किंवा आपल्या आवडत्या रंगमंचावर करावे. ही अत्यंत महत्वाची सूचना असून या सूचनेचे सर्व संघानी काटेकोरपणे पालन करावे.

            युवा महोत्सवात खालील कलाप्रकारांचा समावेश आहे.

सांघिक बाबी : (1) लोकनृत्य या कला प्रकारासाठी कलाकारांची संख्या सहकलाकारासह 20 असणे आवश्यक असून कला सादर करण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. (2) लोकगीत या कला प्रकारासाठी कलाकारांची संख्या सहकलाकारासह 20 असणे आवश्यक असून कला सादर करण्यासाठी 07 मिनिटाचा वेळ असणार आहे.

वैयक्तीक बाबी : (1) एकांकिका (इंग्रजी किंवा हिंदी) ही कला सादर करण्यासाठी कलाकारांची संख्या सहकलाकारासह 12 असणे आवश्यक असून कला सादर करण्यासाठी 45 मिनिटाचा वेळ असणार आहे. (2) शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी) ही कला सादर करण्यासाठी कलाकराची संख्या एक असून यासाठी 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. (3) शास्त्रीय वाद्य (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी) यामध्ये सितार, बासरी, वीणा ही कला सादर करण्यासाठी कलाकाराची संख्या प्रत्येकी एक याप्रमाणे असून ही कला सादर प्रत्येकी 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. 4) तबला, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गिटार ही कला सादर करण्यासाठी कलाकाराची संख्या प्रत्येकी एक याप्रमाणे असून ही कला सादर प्रत्येकी 10 मिनिटाचा वेळ असणार आहे.     (5) शास्त्रीय नृत्य यामध्ये मणिपुरी, ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी ही कला सादर करण्यासाठी कलाकाराची संख्या प्रत्येकी एक याप्रमाणे असून ही कला सादर प्रत्येकी 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. (6) वकृत्व (हिंदी किंवा इंग्रजी) ही कला सादर करण्यासाठी कलाकराची संख्या एक असून यासाठी 04 मिनिटाचा वेळ असणार आहे. असे एकूण 56 कलाकारांची संख्या असणार आहे.

            वरील कला प्रकारामध्ये कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक-युवती, युवक मंडळे, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी होऊ शकतात. युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या प्रवेशिका मंडळाच्या, शाळेच्या, कॉलेजच्या लेटरपॅडवर कलाकारांचे नाव, जन्म दिनांक व स्वाक्षरी इत्यादी माहिती भरुन 26 डिसेंबर, 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा, हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर कराव्यात किंवा कार्यालयाच्या ई-मेल dsohingoli01@gmail.com किंवा व्हॉट्सॲप नं. शेख वसीम-9527120645, संजय बेतेवार-9423306345 यावर सादर करावा. स्पर्धकांनी आपल्या जन्म तारखेचा पुरावा सादर करावा लागेल. युवा महोत्सवाचे आयोजन हे आपल्या महाविद्यालयातील रंगमंच, व्यासपीठावर सादर करावयाचे आहे. सदरील सादरीकरणासाठी आपणास वेळ निश्चित करुन देण्यात येईल त्यावेळेस त्या संघांनी ऑनलाईन उपस्थित राहुन आपली कामगिरी कौशल्य (प्रफार्मस) दाखवायचे आहे.

या युवा महोत्सवाचे परिक्षण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे पंचाच्या/निरीक्षक यांच्या उपस्थित स्पर्धा आयोजनाच्या दिवशी होणार आहे. या स्पर्धेतील विजयी संघास पुढील विभागीय स्पर्धेसाठी ऑनलाईन/व्हर्च्युअल पध्दतीनेच सादरीकरण करावयाचे आहे. प्रत्येक कलाकाराने  त्यांना आवश्यक असणारे वेशभुषा, ड्रेस, साहित्य, वाद्य, मेकअप साहित्यासह आपले सादरीकरण करावे. तसेच सी.डी. कॅसेटस, डि.व्ही.डी. यावर कला सादर करता येणार नाही. कला सादर करताना कुठल्याही प्रकारची इजा दुखापत अथवा गंभीर इजा झाल्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी संघ व्यवस्थापक व कलाकार यांची राहिल. पंचानी दिलेला निर्णय अंतिम राहील.

हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवतीनी, शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छुक कलावंतांनी स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या युवक महोत्सवात ऑनलाईन/व्हर्च्युअल पध्दतीने सहभागी होऊन आपल्या अंगी असलेली कला गुण सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे

*****

22 December, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 05 रुग्ण ; तर 03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


27 रुग्णांवर उपचार सुरु

          हिंगोली,दि. 22 : जिल्ह्यात 05 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

       आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती आणि वसमत परिसरात 02 व्यक्ती असे एकूण 05 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 03 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 04 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़. व 01 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशा एकूण 05 रुग्णांवर सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 464 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 385 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 27 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****

24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

 


 

         हिंगोली, दि. 22 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त दि. 24 डिसेंबर, 2020 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्राहक दिनानिमित्त दुपारी 02.00 ते 03.00 या कालावधीत गुगल मिट (Google meet) मार्फत वेबिनार घेण्यात येणार आहे. यासाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल मध्ये प्ले स्टोर (Play store) मधून गुगल मिट (Google meet) अप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे. यासाठी दुपारी 02.00 वाजता https://meet.google.com/dwg-vdkq-mkm या लिंकवर ग्राहक कल्याण क्षेत्राशी संबंधित सर्व मान्यवरांनी  कनेक्ट व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी केले आहे.

ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 हा दि. 20 जुलै, 2020 पासून लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने 24 डिसेंबर, 2020 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्र शासनाकडून New Features of Consumers Protection Act-2019 ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम बेविनार माध्यमाद्वारे घेण्यात यावा, असे शासनाचे निर्देश आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये संबंधित शासकीय अधिकारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय प्रतिनिधी, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील जिल्ह्याशी संबंधित अशासकीय प्रतिनिधी, ग्राहक कल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, लोकप्रतिनिधी तसेच ग्राहक कल्याण क्षेत्राशी संबंधित इतर मान्यवर यांचा समावेश घेण्याचेही शासन निर्देशात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती येथील जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

*****

लघु उद्योग घटकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

         हिंगोली, दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनायाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रथम व द्वितीय पारितोषिक देवून गौरवण्यात येते. प्रथम पुरस्कारसाठी 15 हजार रुपये रोख व गौरवचिन्ह तसेच द्वितीय पुरस्कारासाठी 10 हजार रुपये रोख व गौरवचिन्ह दिले जाते. सन 2019 व 2020 या दोन वर्षाच्या जिल्हा पुरस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

            उद्योग घटकाची जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे स्थाई लघु उद्योग म्हणून तीन वर्षापूर्वी म्हणजेच       दि. 01 जानेवारी 2016 पूर्वी नोंदणी झालेली असावी. उद्योग घटकामागील दोन वर्षापासून उत्पादनात असणे आवश्यक आहे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी ज्या उद्योग घटकांना राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले नाहीत असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरतील. विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दि. 15 जानेवारी,2021 असा राहील, यांची नोंद घ्यावी.

            वरील बाबींची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. व्ही. जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

*****

महा आवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 


 

हिंगोली, दि. 22 :- महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आज सकाळी 11.00 वाजता व्हि.सी.द्वारे व जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात प्रत्यक्षात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या कार्यशाळेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) डॉ. एम. पी. पोहरे, विभागीय स्तरावरुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु.व स्व.) उमेश स्वामी, कार्यकारी अभियंता (ग्रा. पाणी पुरवठा), जिल्हा अभियान व्यवस्थापक एम.एस.आर.एल.एम., एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी व्हि. पी. राठोड, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तहसीलदार, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा मार्गदर्शी बँक अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, तसेच पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथील योजनाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.     

या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याची महा आवास अभियानात दिलेल्या उद्देशांची कामगिरी कौतुकास्पद असून या अभियानामध्ये अजून चांगली कामगिरी करुन जिल्ह्याने राज्यात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावे, असे मनोगत व्यक्त केले.

महा आवास अभियान हे अतिशय महत्वपूर्ण असून 2022 पर्यंत सर्वांना घरकुल मिळावे ह्या अनुषंगाने तालुक्याने नियोजन करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांनी सर्व संबंधितांना सूचना दिल्या. अभियानाचे स्वरुप व विविध स्तरावर मिळणारे गुण याबद्दल प्रकल्प संचालक धनवंत माळी यांनी सख्रोल मार्गदर्शन केले.  

केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कुत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दि. 19 नोव्हेंबर, 2020 च्या शासन निर्णयानुसार दि. 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर राबवायचे आहे.

 त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांनी गृह निर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामीण घरकुलात गुणवत्ता आणणे तसेच शासकीय यंत्रणेबरोबर समाजातील सर्व घटक पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लाभार्थी, ग्रामस्थ यांचा सक्रीय सहभाग वाढवणे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणणे हा उद्देश असून त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले .

00000

21 December, 2020

डी.एल.एड प्रवेश प्रक्रिया सन 2020-21 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

डी.एल.एड प्रवेश प्रक्रिया सन 2020-21 साठी

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि. 21:  सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येतील. प्रवेश प्रक्रीया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण  परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशक्षिण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

प्रवेशाची शैक्षणिक पात्रता- इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5 %  व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 %  गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दिनांक 22 ते 26 डिसेंबर, 2020, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे दिनांक 22 ते 27 डिसेंबर, 2020, प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्ग रुपये 200/-, खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये 100/-

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन अप्रुव्ह करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन ॲप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही . या प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीन मधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे.  विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल लॉगीन मधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे अधिव्याख्याता तथा सेवापूर्व विभाग प्रमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी कळविले आहे.

00000

 

18 December, 2020

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विजय दिवस साजरा

 



हिंगोली दि. 18 :  भारताने पाकिस्तानवर 16 डिसेंबर, 1971 रोजी युद्धामध्ये विजय मिळवला त्या दिवसापासून 16 डिसेंबर हा दिवस भारतामध्ये विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने 16 डिसेंबर, 2020 रोजी संपूर्ण भारत देशामध्ये विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विजय दिनानिमित्त येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांच्या हस्ते झेंडावंदन  करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुखी, जिल्हा कोषागार अधिकारी मा. एम. झुंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी युद्धामध्ये शहीद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. शहीद जवानांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमास शासकीय तंत्रनिकेतन येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून उत्साहाने सहभाग नोंदवला.

*****

 

 

 

‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ उत्साहात साजरा

 


 

 हिंगोली, दि. 18 : जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत आज अल्पसंख्यांक हक्क दिवस अत्यंत उत्साहात कोव्हिड 19 विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेऊन केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ऑनलाईन पध्दतीने जिल्हा प्रशासनामार्फत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर, सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी यांनी अल्पसंख्यांक समुदायाबाबत अत्यंत अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले.

या ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांकासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत जिल्ह्यात अल्पसंख्यांक लोक समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाबाबत अत्यंत विस्तृत माहिती दिली. तसेच सद्यस्थितीत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी वसतीगृह, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, अल्पसंख्यांक ग्रामपंचायतींना अनुदान, नागरी भागातील अल्पसंख्यांकासाठी सुविधा, डॉ. झाकीर हुसेन मदरसांना अनुदान, खाजगी व विनाअनुदानित शाळांना मुलभूत सुविधासाठी अनुदान, मा. पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम आणि प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PVJMK) अंतर्गत हिंगोली शहरामध्ये सद्भावना मंडप बांधकाम करणे इत्यादी योजनांची सविस्तर माहिती दिली. यापुढेही अल्पसंख्यांकासाठीच्या योजना अधिक चांगल्याप्रकारे राबविण्यात येतील, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे समन्वयक प्रभाकर मठपती यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व सर्व अल्पसंख्यांक जनतेचे आभार मानले.

****

17 December, 2020

‘ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020’ 14 व 15 जानेवारी रोजी भरणारे आठवडी बाजार रद्द

 

                                 

हिंगोली, दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा. तसेच मतदान शांततेत पार पडावे यासाठी हिंगोली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. अशा ग्रामपंचायती मधील दि. 14 जानेवारी, 2021 व दि. 15 जानेवारी, 2021 रोजी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश प्र.जिल्‍हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये दिले आहेत.

हा आदेश निवडणुकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दि. 14 जानेवारी, 2021 रोजीचे मध्यरात्री 12.00 वाजेपासून ते 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रीया होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामूळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकांवर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.

*****

निवडणूक कालावधीत सार्वजनिक, खाजगी व्यक्तींच्या जागेवर झेंडे , भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

 


 

 हिंगोली, दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी काठ्यावर झेंडा लावून उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तींची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाची परवानगी शिवाय व संबंधित परवाना प्राधिकारणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास प्रतिबंध घालणे आवश्‍यक असल्‍याने व प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश पोलीसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करुन त्यास प्रसिध्दी देण्याचे ओदश सर्व संबंधितास नोटीस देवून त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्‍य नसल्‍याने  निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 18 जानेवारी, 2021 पर्यंत प्र.जिल्‍हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये त्यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

हे आदेश दि. 18 जानेवारी, 2021 रोजीच्या 23.00 वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे प्र.जिल्हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण ; तर 04 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


32 रुग्णांवर उपचार सुरु

 

         हिंगोली,दि. 17 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

       आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर आज 04 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 447 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 363 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 32 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****