हिंगोली,
दि. 23 : कोरोना विषाणू संसर्ग
प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक असून या ॲपवर नोंदणी करतांना वापरण्यात आलेले ओळखपत्रच लसीकरणाच्या
वेळी सादर करणे आवश्यक आहे, त्याशिवाय लस दिली जाणार नसल्याचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोव्हिड-19 कोरोना विषाणू
संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
बोलत होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे औरंगाबाद विभागाचे सर्वेलन्स मेडीकल
ऑफीसर डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गित्ते, उपविभागीय अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी,
गट शिक्षण अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास
प्रकल्प अधिकारी, आय.एम.ए., आय.पी.ए., निमा संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती
होती.
श्री. जयवंशी पुढे
म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेत काम करणारे शासकीय व खाजगी रुग्णालयातील
डॉक्टर्स, नर्स, अधिकारी-कर्मचारी यांना कोव्हिडची लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम
यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे. यासाठी प्रत्येक
विभागाने आपल्या यंत्रणेला आदेश देवून त्याचे नियोजन करावे. तसेच या लसीकरणासाठी
लसीकरणाचे ठिकाण लसीकरणासाठी लागणारे कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश
यावेळी त्यांनी दिले.
प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 लोकांना लस
देण्याचे नियोजन असून त्याप्रमाणे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे निश्चित करुन
अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करावी, तसेच प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षालय कक्ष, लसीकरण
कक्ष आणि निरीक्षण कक्ष स्थापन करावे. तसेच या केंद्रावर हॅन्ड सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसिंगचे
पालन करावे. लसीकरणासाठी टोकन पध्दत अवलंबविण्यात यावी. तसेच प्रत्येक केंद्रावरील
निरुपयोगी साहित्याची तात्काळ विल्हेवाट लावावी. तालुकास्तरावर टास्क फोर्सची दर शुक्रवारी बैठका घेवून वेळोवेळी
आढावा घ्यावा, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.
या बैठकीत
जागतिक आरोग्य संघटनेचे औरंगाबाद विभागाचे सर्वेलन्स
मेडीकल ऑफीसर डॉ.
मुजीब सय्यद यांनी कोव्हिड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तीन टप्प्यात लसीकरण करण्याचे
नियोजन असून कोविन ॲपद्वारे रुग्णांची नोंद करणे, एसएमएस देणे, माहिती संकलीत करणे
तसेच लसीकरणाविषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
*****
No comments:
Post a Comment