22 December, 2020

महा आवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 


 

हिंगोली, दि. 22 :- महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आज सकाळी 11.00 वाजता व्हि.सी.द्वारे व जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात प्रत्यक्षात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या कार्यशाळेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) डॉ. एम. पी. पोहरे, विभागीय स्तरावरुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु.व स्व.) उमेश स्वामी, कार्यकारी अभियंता (ग्रा. पाणी पुरवठा), जिल्हा अभियान व्यवस्थापक एम.एस.आर.एल.एम., एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी व्हि. पी. राठोड, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तहसीलदार, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा मार्गदर्शी बँक अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, तसेच पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथील योजनाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.     

या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याची महा आवास अभियानात दिलेल्या उद्देशांची कामगिरी कौतुकास्पद असून या अभियानामध्ये अजून चांगली कामगिरी करुन जिल्ह्याने राज्यात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावे, असे मनोगत व्यक्त केले.

महा आवास अभियान हे अतिशय महत्वपूर्ण असून 2022 पर्यंत सर्वांना घरकुल मिळावे ह्या अनुषंगाने तालुक्याने नियोजन करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांनी सर्व संबंधितांना सूचना दिल्या. अभियानाचे स्वरुप व विविध स्तरावर मिळणारे गुण याबद्दल प्रकल्प संचालक धनवंत माळी यांनी सख्रोल मार्गदर्शन केले.  

केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कुत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दि. 19 नोव्हेंबर, 2020 च्या शासन निर्णयानुसार दि. 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर राबवायचे आहे.

 त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांनी गृह निर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामीण घरकुलात गुणवत्ता आणणे तसेच शासकीय यंत्रणेबरोबर समाजातील सर्व घटक पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लाभार्थी, ग्रामस्थ यांचा सक्रीय सहभाग वाढवणे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणणे हा उद्देश असून त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले .

00000

No comments: