07 December, 2020

ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण करा -निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

 




             हिंगोली,दि.7: जिह्याला ध्वज दिन निधी संकलनाचे 2020 साठीचे 19 लाख 92 हजार रूपयांचे उद्दीष्ट असून सर्व विभागांनी आपले उद्दीष्ट पूर्ण करावे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी  केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2020 निधी संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमात श्री. सुर्यवंशी बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अपर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगीरे, माजी सैनिक सय्यद मीर, केशव भडंगे, अ.क.स. नामदेव मस्के यांची उपस्थिती होती.

            निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी यावेळी म्हणाले की, संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेचे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन होय. ‘माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबिय यांच्या कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीचे संकलन केले जाते.

लष्करी अधिकरी जवान आपल्या कुटुंबीयांची पर्वा न करता देश आणि आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना आपले जवान सैनिक सण, समारंभ, कार्यक्रम यांचा विचारही न करता ते सतत देशसेवा करत असतात. अशा लष्करी अधिकारी जवानांची आणि त्यांच्या कुटूंबियाची काळजी घेणे ही आपणां सर्वांची नैतीक जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या भावनेतून सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्याच्या सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे श्री. सुर्यवंशी यावेळी म्हणाले.

            यावेळी प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संजय केवटे यांनी की सन 2019 चे 183 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, सन 2020 करीता 19 लाख 92 हजाराचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात शहिद जवानांना श्रध्दांजली वाहुन करण्यात आली तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

            

000000

No comments: