* प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोनाच्या
अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी.
हिंगोली
दि.01:- 05-औरंगाबाद पदवीधर
मतदारसंघासाठी हिंगोली जिल्ह्यातील 39 मतदान केंद्रावर आज सकाळी 08.00
वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरुवात होऊन सर्व मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक
निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली शहरातील मतदान केंद्राला भेट देऊन
तेथील सोयी सुविधांची पाहणी करून कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची प्रभावी
अमलबजावणी होत आहे की नाही याबाबतची खातरजमा करुन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक
सूचना दिल्या.
यावेळी
हिंगोली जिल्ह्यातील मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अनेक
मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. प्रत्येक मतदान
केंद्रावर जिल्हा निवडणूक प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या
अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत होत्या व मतदान केंद्रात
येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे थर्मल गन द्वारे तपासणी करुन व हाताला सॅनिटाईज करुनच
मतदान केंद्रात सोडले जात होते. ही निवडणूक कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात होणारी
महाराष्ट्र राज्यातील पहिलीच मोठी निवडणूक असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या
निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अत्यंत चोखपणे उपाययोजना राबविल्या.
05-औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 39 मतदान
केंद्रावर 16 हजार 764 मतदार मतदानाचा हक्क बजावतील या दृष्टीने सर्व सोयीसुविधा
उपलब्ध केलेल्या होत्या. सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत मिळालेल्या अंदाजित
आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 10 हजार 994 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता.
मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या 9 हजार 425 इतकी असून महिला मतदारांची
संख्या 1 हजार 569 इतकी आहे. हिंगोली
जिल्ह्यात सरासरी 65.58 इतके टक्के मतदान झालेले आहे.
ही मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर व
सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व पथकांचे नोडल अधिकारी, पोलिंग ऑफिसर,
निवडणूक कामात सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कामकाज केले.
*******
No comments:
Post a Comment