07 January, 2020

इतर मागास प्रवर्गातील सन 2019-20 वर्षातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


इतर मागास प्रवर्गातील सन 2019-20 वर्षातील विद्यार्थ्यांचे
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.7 : एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासुन वंचित राहु नये या हेतुने शासनाने सन 2019-20 या चालु वर्षापासुन इ. 5 वी ते 10 वीत शिकणा-या अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींप्रमाणेच इतर मागासप्रवर्गातील (OBC) मुलींना देखीलसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ लागु केली आहे. ज्यात 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थीनींना 600/-रु. 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थीनींना 1000/- रु. प्रमाणे शिष्यवृत्ती, तसेच इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणा-या इतर मागास प्रवर्गातील  (OBC) विद्यार्थ्यांना भारत  सरकार  मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना ज्यात विद्यार्थ्याच्या पालकांची उत्पन्नाची मर्यादा 2.50 लक्ष वार्षिक इतकी राहील.
सदर योजनेत प्रत्येक विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचे दर हे अनिवासी विद्यार्थ्यांना 1500/- रु . वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना 5500/- प्रमाणे शिष्यवृत्तीचे दर राहतील. तसेच इ.1 ली ते 10 वीत शिकणा-या विमुक्त जाती भटक्या जमाती (DNT) विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉ.आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना लागु केली आहे. ज्यात विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न मर्यादा 2.00 लक्ष वार्षिक इतकी असेल. दर योजनेत इ. 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना 1000/-रु. इ. 9 वी  10 वी मधील विद्यार्थ्यांना 1500/- रु. प्रमाणे शिष्यवृत्तीचे दर राहतील. अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती बाबतच्या योजना समाज कल्याण विभागामार्फत नव्याने लागु करण्यात आलेल्या आहेत.
वरील सर्व योजनेतंर्गत पात्र विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते उघडुन त्वरीत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज/प्रस्ताव गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सॉफ्टकॉपीसह (पेन ड्राईव्ह मध्ये) समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयात लवकरात लवकर सादर करावे.
तसेच सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील जि.प. समाज कल्याण विभागातर्फे देण्यात येणा-या इतर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती,  मॅट्रिकपुर्व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, इ. योजनेअंतर्गत एखाद्या शाळेकडुन प्रस्ताव येणे बाकी असेल तर अशा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्वरेने शिष्यवृत्तीचे प्रस्ताव जि.प. समाज कल्याण विभागात सादर करावेत. शासनाच्या शिष्यवृत्ती  योजनेपासुन एकही विद्यार्थी वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
****



No comments: