कर्जमुक्ती योजनेची शेतकरी बांधवांना वेळेत लाभ देण्यासाठी
प्रशासनाने प्रयत्न करावा
-- पालकमंत्री वर्षा गायकवाड
हिंगोली, दि.25: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घोषणा
केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळावा याकरीता प्रशासनाने प्रयत्न करावा, असे
निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात
विविध विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी.
तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, शेतकरी बांधवांना
चिंतामुक्त करण्यासाठी सहज, सोपी आणि पारदर्शक अशी "महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना" या
योजनेची शासनाने घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम
जमा होणार असल्याने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँकेच्या कर्जखात्याशी संलग्न करुन
त्याचे प्रमाणिकरण करुन घेण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री यांनी जिल्ह्यात रब्बी हंगामात पीक निहाय व तालूका
निहाय पेरणीचा आढावा घेतला. तसेच अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना वितरीत
करण्यात आलेले अनुदान आणि मागणी केलेल्या अनुदानाबाबत माहिती घेतली. तसेच
बँकांच्या शेतीपूरक उद्योगासाठी काही योजना आहे का याबाबत विचारणा केली. जिल्ह्यात
नवीन उद्योग सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बँकांनी
उद्योग उभारणी कर्जयोजना सुरु करता येईल का याचा अभ्यास करावा, असे ही त्या
म्हणाल्या.
आपल्या जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी मोठी संधी आहे.
याकरीता आपण सर्वजण मिळून चांगले काम करु अशी अपेक्षा ही पालकमंत्री वर्षा गायकवाड
यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment