24 January, 2020

दहा रुपयात शिवभोजन ·प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन योजनेची सुरुवात


दहा रुपयात शिवभोजन
·        प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन योजनेची सुरुवात


           राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात म्हणजे अवघ्या दहा रुपयांत शिवभोजन थाळी येत्या प्रजासत्ताक दिनापासून शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यात कोणीही भुकेले राहू नये, यासाठी शासनाने शिवभोजन योजना आणली आहे. शासनाच्या या क्रांतीकारी निर्णयामुळे गरीब आणि गरजू लोकांची दुपारच्या भोजनाची सोय होणार आहे.

              
महाराष्ट्र शासनाने अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले त्यामध्ये दहा रुपयांत शिवभोजन थाळी योजनेंचा आवर्जून उल्लेख करायला हवा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ही महत्वाकांक्षी योजना असून मंत्रीमंडळ बैठकीमध्ये दहा रुपयांत शिवभोजन थाळी ही महत्वाकांक्षी योजना जाहीर करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वचनपूर्तीच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.  येत्या प्रजासत्ताक दिनापासून  संपूर्ण   राज्यात  प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 50 ठिकाणी ही योजना सुरु होत असून प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर होत आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागातही राबविण्यात येणार आहे.  स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना निश्चितच यशस्वी होईल, हे मात्र निश्चित !
गरीब आणि गरजू जनतेला विशेषत: ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण देणारी हीच ती शिवभोजन थाळी योजना आहे. शिवभोजन थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा भात आणि 100 ग्रॅमचे एक वाटी वरण दररोज दुपारी 12 ते 2 यावेळेत उपलब्ध होईल, या येाजनेंतर्गत हिंगोलीमध्ये 200  शिवभोजन थाळी उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड  यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ  रविवार दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी येथील जिल्हा रुग्णालय परिसरात होत आहे. सर्वसामान्य आणि गोरगरीबांना अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण मिळणार असल्याने ही योजना जिल्हयातील जनतेसाठी उपयुक्तच  ठरेल.
राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात म्हणजे केवळ दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देणारी योजना योग्य पध्दतीने राबविली जावी यासाठी शासनाने  दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे तर 23 जानेवारी 2020 रोजी एका शासन निर्णयाद्वारे आवश्यक निधीच्या वितरणाबाबत आदेशही पारित केले आहेत. दहा रुपयांत शिवभोजन थाळी या योजनेसाठी सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी म्हणजे तीन महिन्यासाठी जवळपास साडेसहा कोटीचा निधी वित्त विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. दहा रुपयांत शिवभोजन थाळी योजनेसाठी शासनाने मंजुर केलेला निधी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात प्रतिथाळी पन्नास रुपये तर ग्रामीण भागात पस्तीस रुपये इतकी राहील, प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊन त्यांच्यामार्फत जिल्हास्तरीय समितीने ठरविलेल्या खानावळ, NGO, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांना संबंधितांना वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत.
शिवभोजन थाळी योजनेंतर्गत पहिल्या टप्यात जिल्हा मुख्यालय परिसर, जिल्हा रुग्णालय, बस तसेच रेल्वे स्थानक, नगरपरिषद परिसर, बाजारपेठा अशा गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी या योजनेंतर्गत भोजनालये सुरु करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती नसून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असे तूर्त सूत्र राहणार आहे. प्रत्येक भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तीना जेवणासाठी बसता यावे, अशी व्यवस्था असणार आहे. भोजनालयात अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्वच्छ पाणी वापरले जाणार असून स्वच्छ टेबल-खुर्च्या तसेच स्वयंपाकगृहात खाद्यपदार्थ तयार करतांना प्रदुषण होणार नाही, याचीही खबरदारी भोजनालय चालकावर राहील.
महाराष्ट्र शासनाची विशेषत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची महत्वाकांक्षी असलेली योजना प्रत्यक्षपणे येत्या प्रजासत्ताक दिनापासून  संपूर्ण   राज्यात  पहिल्या टप्यात प्रायोगिक तत्वावर सुरु होत आहे. राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना केवळ दहा रुपयांत स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन मिळणार असल्याने ही योजना गरीब आणि गरजूंसाठी वरदान ठरेल, हे मात्र निश्चित !

                                                                             -- अरुण सूर्यवंशी
                                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी,
          हिंगोली
********

No comments: