सायबर
सुरक्षिततेबाबत सदैव सतर्क असणे आवश्यक
-
पोलीस अधिक्षक योगेशकुमार
हिंगोली,दि.3: माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे
आजच्या डिजिटल युगात ‘सायबर सुरक्षितता’ हा विषय अत्यंत महत्वाचा असून त्याबाबत प्रत्येकाने सदैव सतर्क असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन
पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांनी केले.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा माहिती कार्यालय आणि
जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायबर सेफ वूमन’ आणि ‘महिला
सुरक्षा’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर
वैंजणे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार आणि अशोक
घोरबांड, सायबर तज्ज्ञ विक्रम सारस्वत, ॲड. सत्यशिला तांगडे, ॲड. जयश्री सावरगावकर,
ॲड. वैशाली देशमुख, सहायक पोलीस निरिक्षक प्रभा पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.
योगेशकुमार म्हणाले की, सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून,
यामुळे जगभरातील माहिती एका क्लिकवर सहज प्राप्त करणे शक्य झाले आहे. आज एक
व्यक्ती जगातील कुठल्याही कोपऱ्यातून दुसऱ्या व्यक्तीशी फेसबुक, ट्विटर,
इंस्टाग्राम, टेलीग्राम आदी या सारख्या समाज माध्यमाद्वारे सहज संवाद साधू शकतो.
थोडक्यात काय तर समाज माध्यमे ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. सोशल
मीडियाचे चांगले फायदे असले, तरी आज सोशल मीडियाच्या होत असलेल्या अती वापरामुळे
समाजात रोज नव-नवीन समस्या निर्माण होत आहेत. आजच्या तरुणाईकडून समाज माध्यमांचा
सर्वात जास्त वापर होत आहे. आजची युवा पिढी समाज माध्यमांच्या अभासी जगात एवढे
रमले आहेत की त्यांचा बाह्य जगाशी संपर्कच तुटला आहे.
तसेच
ऑनलाईन शॅापींग, ऑनलाईन बॅंकीग व्यवहाराकरीता स्मार्ट फोन, संगणक या माध्यमांचा वापर
होत आहे. समाजातील ज्येष्ठ नागरीक, महिला, विद्यार्थी, युवक हे याद्वारे मोठ्या प्रमाणात
व्यवहार करत असताना ई-प्रणालीचा जबाबदारी आणि जागरुक राहून उपयोग करणे गरजेचे आहे.
या व्यवहारांमध्ये पुरेशी काळजी घेतली जात नाही. ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची
गरज असून, नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून
मिळणारी माहिती उपस्थितांनी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन ही पोलीस अधिक्षक योगेशकुमार
यांनी केले.
यावेळी ॲड. सत्यशिला
तांगडे सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शनात म्हणाल्या की, महिलांनी सोशल मीडियाचा
वापर करतांना स्वत: दक्ष राहून काळजी घ्यावी. आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र,
पत्ता, बँकीग व्यवहाराची माहिती इत्यादी शेअर करु नये. सोशल मीडियाद्वारे आपल्या
वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची जास्त शक्यता असते. स्त्री ही अबला नसून सबला
आहे. ॲड. श्रीमती तांगडे म्हणाल्या की, मुलींना स्वयंसिध्द होण्यासाठी
स्वयंसिध्दतेचे शिक्षण देण्याचे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी सायबर विषयक विविध
घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी घ्यावयाची खबरदारी तसेच सायबर गुन्ह्यातील विविध
कलमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. जयश्री सावरगावकर महिला सुरक्षा या विषयावर
बोलतांना म्हणाल्या की, आजच्या युगात स्त्री ही कणखर झाली पाहीजे. तसेच समाजात
येणाऱ्या विविध समस्यांना तिने समर्थपणे
सामोरे गेले पाहीजे. यावेळी त्यांनी गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा, कलम 376, कलम
354, कौटूंबीक कायदे सन-2005, आदी विविध कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. वैशाली देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात
महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक छळापासून संरक्षण आणि त्यावरील विविध
उपाय आणि कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कार्यालयात स्थापन
करण्यात येणाऱ्या विशाखा समिती विषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी पोस्को
कायद्यातील विविध कलमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे मार्गदर्शन
करतांना म्हणाल्या की, आजच्या काळात महिलांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी
स्वयंसिध्द होण्याची आवश्यकता आहे. तसेच महिलांच्या संरक्षणाकरीता जिल्ह्यात पोलीस
विभागामार्फत ‘पोलीस दीदी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक
महाविद्यालयात विद्यार्थीनींना तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार पेटीची सुविधा उपलब्ध
करण्यात आली आहे.
यावेळी सायबर तज्ज्ञ विक्रम सारस्वत यांनी पॉवर
पॉईट प्रेझेंटेशनद्वारे सायबर जगतात घडणारे विविध प्रकारचे गुन्हे यामध्ये लैंगिक
छळ, नोकरीचे प्रलोभन, लग्नाचे आमिष, ऑनलाईन गेमींग, खोटी माहिती देणारी
संकेतस्थळे, सायबर स्काउट, बँकीग विषयक फसवणूक इत्यादी गुन्हे घडण्याची पार्श्वभूमी, गुन्ह्यांपासून
बचावात्मक कसे राहावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सायबर
तज्ज्ञ विक्रम सारस्वत यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन
व्यवहार करतांना तसेच सोशल मीडीयाचा वापर करतांना घ्यावयाची काळजी आदी बाबींवर सादरीकरण
केले. तसेच मोबाईलवर अनावश्यक अॅप डाउनलोड
करू नये, ॲप डाउनलोड करतांना आपली वैयक्तिक माहिती देवू नये. आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही
सांगू नये, फसव्या मेलपासून सावध रहावे. मोबाईल, संगणक यावर चांगल्या दर्जाची संरक्षण
यंत्रणा ठेवावी. अशी माहिती त्यांनी दिली.
महिला
व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गन्हे रोखण्यासाठी व यासंदर्भातील कायद्याची
माहिती देण्यासाठी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त राज्यभर
एकाच दिवशी ‘सायबर सेफ वूमन’ ही जनजागृती मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस
निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी प्रास्ताविकात दिली.
सर्वप्रथम
मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्यांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेचे
सुत्रसंचालन महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी माया सूर्यवंशी यांनी केले.
तर जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यशाळेस यावेळी महाविद्यालयीन
विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी-कर्मचारी,
तसेच पत्रकार आदी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment