28 February, 2022

नाफेडच्या वतीने 01 मार्च पासून हमीभावाने चना खरेदी सुरु

चना खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 :  केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने रब्बी हंगाम 2021-22 मध्ये  चना  हमीभावाने  खरेदी  करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून या खरेदी केंद्रावर चना खरेदीसाठी दि. 16 फेब्रुवारी, 2022 पासून नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच याच खरेदी केंद्रावर दि. 01 मार्च 2022 पासून ते दि. 29 मे, 2022 पर्यंत चना खरेदी सुरु करण्यात आलेली आहे.

चना खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            हिंगोली तालुक्यासाठी प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था , हिंगोली ही संस्था असून खरेदी केंद्राचे ठिकाण जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर, तोफखाना, हिंगोली  असा आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून समीर भिसे हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422922222 असा आहे. तसेच संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगांव ता. जि. हिंगोली  येथे असून या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र.7820863673 असा आहे.

कळमनुरी तालुक्यासाठी कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी ही संस्था असून या संस्थेचे खरेदी केंद्र कळमनुरी व वारंगा फाटा या दोन ठिकाणी आहे. कळमनुरी येथील केंद्रावर केंद्र चालक म्हणून महेंद्र माने हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9736449393  असा आहे. तसेच वारंगा फाटा येथील खरेदी केंद्रावर केंद्र चालक म्हणून विजय ठाकरे हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 6209939393 असा आहे.

औंढा नागनाथ तालुक्यासाठी औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) ही संस्था असून या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर  केंद्र चालक म्हणून कृष्णा हरने हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9175586758 असा आहे.

वसमत तालुक्यासाठी  वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत ही संस्था असून या संस्थेचे खरेदी केंद्र मार्केट कमिटी, वसमत येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून सागर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमाक 8390995294 असा आहे.

सेनगांव तालुक्यासाठी श्री संत भगवानबाबा  स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज ही संस्था असून या संस्थेचे खरेदी केंद्र साई जिनिंग,  तोष्णीवाल कॉलेज समोर, हिंगोली रोड, सेनगाव येथे आहे. या केंद्राचे केंद्र चालक म्हणून संदीप काकडे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7758040050  असा आहे. तसेच विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे साखरा ता. सेनगाव येथे खरेदी केंद्र असून या केंदावर केंद्र चालक म्हणून उमाशंकर माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9657260743 असा आहे.

            शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी हंगाम 2021-22 मधील पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबूकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक,  आय.एफ.एस.सी. कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी चना हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन के. जे. शेवाळे,जिल्हा पणन अधिकारी परभणी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

****


 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही

02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, तर 30 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर आज 02 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 512 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 78 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 30  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19)  ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे देशात व राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने सर्व राज्यांना सतर्कता बाळगण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी व दिवसा जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

दि. 01 मार्च, 2022 रोजी महाशिवरात्री, दि. 04 मार्च, 2022 पासून 12 वी उच्च माध्यमिक परीक्षा तसेच        दि. 15 मार्च, 2022 पासून 10 वी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा, दि. 5 व 6 मार्च, 2022 रोजी कळमनुरी येथील श्री रामचंद्र स्वामी महाराज व श्री जगदंबा देवी संस्थान कळमनुरी (लमाणदेव यात्रा) साजरी होणार आहे.

दि. 01 नोव्हेंबर, 2021 रोजी पासून हिंगोली, कळमनुरी, वसमत या तिन्ही आगारातील समस्त कर्मचारी यांनी सामुहिक संप पुकारलेला आहे. जोपर्यंत राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करुन घेणार नाहीत तो पर्यंत संप मागे घेणार नाही असा ईशारा दिला आहे. तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 01 मार्च, 2022 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 15 मार्च, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी  आदेश काढले आहेत.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे

ऐनवेळी दोन बालविवाह रोखण्यात यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे कळमनुरी तालुक्यातील मौजे बेलथर येथील ऐनवेळी 02 बालविवाह रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी दिली आहे.  

दि. 26 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता कळमनुरी तालुक्यातील मौजे बेलथर येथील 2 बालविवाहातील 3 अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती हिंगोली चाईल्ड लाईन (1098) ला मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, तसेच हिंगोली चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक आकाश शिखरे, टीम मेंबर राजरत्न पाईकराव, विकास लोणकर, समुपदेशक पुनम अंबोरे आदींनी विवाहस्थळी भेट दिली व बालविवाहातील 03 अल्पवयीन बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले आणि होणारे बालविवाह थांबविले. या वेळी ग्राम बाल संरक्षण समिती, बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक व आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बी.बी.पुंड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.जे.चव्हाण यांच्या समक्ष कुटुंबियांकडून आम्ही बालकाचे वय 21 वर्ष व बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब घेण्यात आले.

जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह प्रतिबंध समिती स्थापन आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत. शासनाने बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलीचे लग्नाचे वय 18 वर्ष व मुलाचे लग्नाचे वय 21 वर्ष ठरविले आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी नागरिक आपल्या मुलांचे कमी वयात लग्न लावून देत आहेत, असे चित्र पाहावयास मिळत आहे. बालविवाह होत असल्यास गोपनीय माहिती कोणताही नागरिक 1098 या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

******

 

कळमनुरी येथील श्री. रामचंद्र स्वामी महाराज व

श्री जगदंबा देवी संस्थानची यात्रा रद्द

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : कळमनुरी येथील श्री. रामचंद्र स्वामी महाराज व श्री जगदंबा देवी संस्थानच्या वतीने दिनांक 5 ते 6 मार्च 2022 पर्यत यात्रेचे  आयोजन करण्यात आले आहे.

या कालावधीत सर्व समाजाचे लाखो भक्तजन या यात्रेत येतात. त्यामुळे  व्यक्तींना, भाविकांना वरील नमूद कालावधीत प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. तसेच पुढील कालावधीत जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात  भाविक जमा होणारे धार्मिक कार्यक्रम मेळावे , यात्रा, महोत्सव साजरा करण्यास जनहितार्थ प्रतिबंध करणे अत्यावश्यक आहे.

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. तसेच जिवित हानी होऊ नये या दृष्टीने  सुरक्षिततेची उपाययोजना  म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये श्री. रामचंद्र स्वामी महाराज व श्री जगदंबा देवी संस्थानची दिनांक 5 ते 6 मार्च, 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

******

27 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही

एका रुग्णांचा मृत्यू, तर 32 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 512 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 76 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 32  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 





सिरसम व बळसोंड येथे जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या हस्ते

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

 

 

           हिंगोली, (जिमाका) दि. 27 : आज सिरसम व बळसोड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून करण्यात आले.

            यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. मालू, वैद्यकीय अधिकारी डॉ. गट्टू, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बळसोंड (अंतुले नगर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पल्स पोलिओ लसीकरण जनजागृती रॅली काढली होती. या विद्यार्थ्यांनी बाळाला लसीकरण करुन घ्यावे आणि पोलीओला टाळावे अशा घोषणाही यावेळी दिल्या.

            तसेच सुरेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनीष आखरे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ. डि. बी घोलप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनुराधा गोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मालू, आरोग्य कर्मचारी बबन कुटे, आरोग्य सेविका संगीता गोबाडे आदी उपस्थित होते.

 

नरसी नामदेव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन

 

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संजय दैने यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नरसीचे सरपंच, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खांडेकर, डॉ.शुभांगी वाणी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, विस्तार अधिकारी कमलेश इशी, आरोग्य सहाय्यक डी.आर.पारडकर, जोजारे, गायकवाड, श्रीमती खाडे, श्रीमती सोनुने आदी उपस्थित होते.

नरसी येथून हिंगोली कडे परत येत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी इतर राज्यातून कामासाठी आलेल्या कामगारांच्या वस्तीला भेट देऊन पोलिओ बाबत विचारपूस केली व लाभार्थ्यांना पोलिओचा डोस पाजला .

 

*****

 




मराठी भाषा दिनानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

 

 

           हिंगोली, (जिमाका) दि. 27 : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठीतील विविध ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन  डॉ. महेश मंगनाळे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. महेश मंगनाळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, मराठी ही ज्ञान भाषा होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सांगितले.

            या कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, औरंगाबाद विभाग ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद सोनकांबळे, रामभाऊ पुनसे  व ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.  

हे ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांसाठी खुले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

 

*****

 



पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजून

भारत पोलिओ मुक्त करण्यास सहकार्य करावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यातील सर्व गावांतील नागरिकांनी जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजावा व भारत पोलिओ मुक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार तान्हाजी मुटकुळे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, बालरोग तज्ज्ञ डॉ. दीपक मोरे, डॉ. नंदिनी भगत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, जिल्ह्यातील 1 लाख 27 हजार 748 बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे. यासाठी 1175 बूथची स्थापना करण्यात आली असून यासाठी 3128 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या पाल्यांना पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, नागरिक उपस्थित होते.

****

 

26 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही

03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, तर 33 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर आज 03 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 01 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 512 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 76 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 33  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 403 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

25 February, 2022


 

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

सामाजिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे

                                               - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सर्वच विभाग प्रमुखांनी पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत दिले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी, विहान प्रकल्पाचे प्रतिनिधी, सेतू चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या महिलांची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गर्भाशयाची शस्त्रक्रिया आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या गरजू रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, आवश्यक संसाधने खरेदी करावेत. त्यासाठी योग्य नियोजन करावेत. तसेच महिला व बालविकास विभागामार्फत एचआयव्ही पाझिटिव्ह व अनाथ असलेल्या सर्व मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. तसेच एचआयव्ही/एड्स च्या मोफत हेल्पलाईन टोल फ्री क्र. 1097 ची प्रसिध्दी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतून किमान एक भिंती चित्र काढण्यात यावेत. या संबंधीचे आदेश पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गा्रमपंचायतींना द्यावेत. जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च, 2022 रोजी एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांना आधारकार्ड  काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष शिबीराचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी एप्रिल ते डिसेंबर, 2021 या कालावधीत सामान्य गटातील 30 हजार 420 व्यक्तींची तर 25 हजार 885 गरोदर मातांची मोफत एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातील सामान्य गटाचे 115 टक्के आणि गरोदर मातांचे 112 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. या चाचणीमध्ये सामान्य गटातील 16 आणि गरोदर मातांमधून 06 नवीन एचआयव्ही संसर्ग झालेले व्यक्ती आढळून आलेले आहेत. या सर्वांना एआरटी औषधोपचारावर ठेवण्यात आलेले आहे. याच कालावधीत 11 एचआयव्ही पाझिटिव्ह  असलेल्या मातांनी जन्म दिलेली बालके योग्य उपचार पध्दतीच्या आणि स्तनपान समुपदेशनामुळे 18 महिन्याच्या एचआयव्ही चाचणीमध्ये  एचआयव्ही निगेटीव्ह म्हणजेच एचआयव्ही मुक्त करण्यात यश आले आहे. तसेच टीबी (क्षयरोग) आणि एचआयव्ही असे दोन्ही आजार असलेले 7 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांना एआरटी आणि डॉटस्‍ या दोन्ही उपचार पध्दतीवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत सादर केली.

शेवटी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी बैठकीस उपस्थित सर्व समिती सदस्यांचे आभार मानले.

******

 

भिक्षावृत्तीमुक्त भारत उपक्रमासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ‘SMILE- Support For Marginalized Individuals For Livelihood and Enterprise’ उपजिविका आणि उपक्रमासाठी उपेक्षित व्यक्तींसाठी समर्थन ही योजना तयार केली आहे. ज्यामध्ये भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींचे सर्व समावेशक पुनर्वसन या उपयोजनेचा समावेश आहे. उपयोजनेमध्ये भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींसाठी कल्याणकारी उपायांसह अनेक व्यापक उपायांचा समावेश आहे. पुनर्वसन , वैद्यकीय सुविधांची तरतूद , समुपदेशन , मुलभूत  कागदपत्रे , शिक्षण कौशल्य विकास, आर्थिक संबंध इत्यादींवर या योजनेचा भर आहे. ही योजना राज्य, केंद्रशासित प्रदेश सरकार, स्थानिक नागरी संस्था, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था संघटना, समुदाय आधारित संस्था आणि इतरांच्या पाठिंब्याने राबविण्यात येणार आहे.

या उपयोजनेतून देशाला भीक्षावृत्तीमुक्त भारत (भिक्षेपासून मुक्त) बनविण्यासाठी भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींपैकी केंद्र आणि राज्य सरकार , स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर जनता अशा विविध भागधारकांच्या समन्वित कार्यवाहीव्दारे भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे सर्व समावेशन करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण आणि ओळख, भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे एकत्रीकरण, निवारा, पुन:भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचा शाश्वत विकास करण्यासाठी आणि लक्षित लोकसंख्येचे एकूण आरोग्य आणि कल्याण सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यानुसार संस्थेचे  अनुभव पात्रतेच्या आधारे पुढील प्रक्रियेसाठी स्वयंसेवी संस्थांची निवड केली जाईल. संस्थेची निवड खालील प्रमाणे करण्यात येईल. संस्थेची मान्य कर्मचारी संख्या, संस्थेतील कर्मचाऱ्याची भिक्षेकरीमुक्त क्षेत्रात कामाची गुणवता, भिक्षेकरीमुक्त शहराचा प्रकल्प अहवाल इत्यादी बाबींवर आधारित संस्थेची निवड होणार आहे.

ही योजना दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, इंदौर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पटना, अहमदाबाद इत्यादी शहरांसाठी राबविण्यात येत आहे. यासाठी पुढील दिलेल्या संकेतस्थळावर  https://grants.msje.gov.in/ngo-login या लिंकवर e-anudaan वर गुगल फॉर्मव्दारे प्रस्ताव ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

******