22 February, 2022

 

हिंगोली जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहिमेचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे महत्वकांक्षी धोरण निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने क्षयरोग (टीबी) मुक्त सर्वेक्षणाच्या विशेष मोहिमेस दि. 21 फेब्रुवारी, 2022 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील निश्चित केलेल्या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोग सदृश्य आजारी व्यक्तींची तपासणी करुन थुंकी नमुना अहवाल चोवीस तासात प्राप्त होईल असे नियोजन केलेले आहे. या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने 2015 ते 2021 संपूर्ण नोंदवह्या , उपचार कार्डची पाहणी करुन प्राथमिक स्वरुपाच्या काही रुग्णांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात दहा पथक तयार करण्यात आलेले असून एका पथकामध्ये दोन व्यक्ती असणार आहेत. या व्यक्तींना जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने प्रशिक्षित केलेले आहे.

ही सर्वेक्षण मोहिम बाह्य यंत्रणेकडून होत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील क्षयरोग विभाग परिपूर्ण तयारी करत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर नवीन टीबी केसेस कमी करणे हा उद्देश आहे. जिल्हा किंवा राज्य क्षयरोग (टीबी) मुक्त म्हणून दर्जा मिळविल्यास त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी. एस. मिरदुडे यांनी सांगितले.

सर्वेक्षण मोहिम सुक्ष्म आराखड्यानुसार करण्यात येणार आहे. आवश्यक मनुष्यबळ तसेच अनुषंगिक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्हा क्षयरोग मुक्तीसाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील पंधरा दिवसापर्यंत विशिष्ट भागामध्ये होणाऱ्या सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकामधील कर्मचारी स्वयंसेवक यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी केले आहे.

****

No comments: