25 February, 2022


 

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

सामाजिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे

                                               - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सर्वच विभाग प्रमुखांनी पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत दिले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी, विहान प्रकल्पाचे प्रतिनिधी, सेतू चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या महिलांची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गर्भाशयाची शस्त्रक्रिया आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या गरजू रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, आवश्यक संसाधने खरेदी करावेत. त्यासाठी योग्य नियोजन करावेत. तसेच महिला व बालविकास विभागामार्फत एचआयव्ही पाझिटिव्ह व अनाथ असलेल्या सर्व मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. तसेच एचआयव्ही/एड्स च्या मोफत हेल्पलाईन टोल फ्री क्र. 1097 ची प्रसिध्दी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतून किमान एक भिंती चित्र काढण्यात यावेत. या संबंधीचे आदेश पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गा्रमपंचायतींना द्यावेत. जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च, 2022 रोजी एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांना आधारकार्ड  काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष शिबीराचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी एप्रिल ते डिसेंबर, 2021 या कालावधीत सामान्य गटातील 30 हजार 420 व्यक्तींची तर 25 हजार 885 गरोदर मातांची मोफत एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातील सामान्य गटाचे 115 टक्के आणि गरोदर मातांचे 112 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. या चाचणीमध्ये सामान्य गटातील 16 आणि गरोदर मातांमधून 06 नवीन एचआयव्ही संसर्ग झालेले व्यक्ती आढळून आलेले आहेत. या सर्वांना एआरटी औषधोपचारावर ठेवण्यात आलेले आहे. याच कालावधीत 11 एचआयव्ही पाझिटिव्ह  असलेल्या मातांनी जन्म दिलेली बालके योग्य उपचार पध्दतीच्या आणि स्तनपान समुपदेशनामुळे 18 महिन्याच्या एचआयव्ही चाचणीमध्ये  एचआयव्ही निगेटीव्ह म्हणजेच एचआयव्ही मुक्त करण्यात यश आले आहे. तसेच टीबी (क्षयरोग) आणि एचआयव्ही असे दोन्ही आजार असलेले 7 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांना एआरटी आणि डॉटस्‍ या दोन्ही उपचार पध्दतीवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत सादर केली.

शेवटी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी बैठकीस उपस्थित सर्व समिती सदस्यांचे आभार मानले.

******

No comments: