प्रशिक्षणार्थ्यांच्या कौशल्याला उत्पादनाभिमुखतेची जोड देऊन रोजगारनिर्मितीवर भर द्यावा
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भेटीदरम्यान सूचना
हिंगोली, दि. २ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्ह्यातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या कौशल्याला उत्पादनाभिमुखतेची जोड द्यावी. तसेच प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष उत्पादन व उद्योगक्षेत्राशी संबंधित कौशल्यविकासावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन संस्थेतील विविध व्यवसायांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधून त्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणार्थ्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा प्रत्यक्ष उत्पादनासाठी उपयोग होईल, यादृष्टीने प्रशिक्षणाची दिशा निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी मागील वर्षी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या अप्रेंटिसशिप तसेच रोजगाराच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांना अप्रेंटिसशिप, रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने उद्योगक्षेत्राशी समन्वय वाढवावा, असे त्यांनी सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून केवळ प्रशिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी नव्हे, तर कौशल्याच्या आधारे रोजगारनिर्मिती आणि उत्पादनक्षमतेत योगदान देणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, उत्पादनाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगाराच्या उपलब्ध संधी यांची सांगड घालण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment