जिल्हा व सत्र न्यायालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
हिंगोली, दि. २ ऑक्टोबर (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, हिंगोली यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. न्यायालयीन परिसर तसेच बागेची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात हिंगोली न्यायिक जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, जिल्हा वकील संघातील विधिज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले.
यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर, जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस. एन. माने-गाडेकर, जिल्हा न्यायाधीश-२ डि. जी. ढोबळे, जिल्हा न्यायाधीश-१, वसमत डि. एस. थोरात, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, हिंगोली तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. एम. मानखैर यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर आर. घुगे तसेच अॅड. एम. ए. कांबळे, अॅड. व्ही. एस. घोंगडे, अॅड. एन. एस. घुगे, अॅड. बी. टी. कावरखे, अॅड. डी. जे. पवार, अॅड. ए. यू. चव्हाण यांच्यासह न्यायालयीन अधिकारी, विधिज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, विधी सेवा प्राधिकरण, हिंगोली श्रीकांत एल. आणेकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन स्वच्छता, शिस्त व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी यांच्या विचारांचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली तसेच हिंगोली न्यायिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील न्यायिक अधिकारी, जिल्हा वकील संघातील विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment