03 November, 2026

पीक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज द्या- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

▶️ दत्तक गावातील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट 
निर्देश

हिंगोली, दि.३ (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे, तसेच नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 

या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उद्योग कर्ज वितरण तसेच पीक कर्ज वाटपाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बँकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

पीक कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार दत्तक गाव असलेल्या बँकेतून किंवा ज्या बँकेत त्यांचे पूर्वीचे पीक कर्ज माफ झाले आहे, त्याच बँकेमार्फत पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेत मिळण्यास मदत होईल. पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि हिंगोली जिल्ह्याचा महत्त्वाचा आधार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके तसेच शेतीच्या इतर आवश्यक बाबींसाठी आर्थिक नियोजन करणे सुलभ होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अधिक गतिमान, सुलभ करून पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून देण्याची आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग कर्ज वाटपाला गती द्या*

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, नवउद्योजक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच युवकांना स्वावलंबी होण्याची संधी मिळते. त्यामुळे या योजनेअंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणांचा बँकांनी प्राधान्याने निपटारा करावा. पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी व वितरणासाठी अनावश्यक विलंब करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या.

जिल्ह्यातील सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप आणि उद्योग कर्ज वितरणाबाबत समन्वयाने काम करावे. शेतकरी आणि नवउद्योजकांना बँकिंग सेवांचा लाभ सुलभतेने मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्याच्या दृष्टीने बँकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाची तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग कर्ज वितरणाची सद्यस्थिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी जाणून घेतली. शेतकरी आणि नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी अधिक संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले.

No comments: