07 May, 2019

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.7: सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
पालकमंत्री श्री. कांबळे यांचे गुरुवार, दिनांक 9 मे 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता हिंगोली येथे आगमन, सकाळी 11.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कळमनुरी, वसमत व औंढा तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावांना भेटी व शेतकऱ्यांशी चर्चा मुक्काम हिंगोली .
शुक्रवार दिनांक 10 मे, 2019 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजता हिंगोली व सेनगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना भेटी व शेतकऱ्यांशी चर्चा, दुपारी 3.00 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

04 May, 2019

आता अतिसार कमी करण्यासाठी रोटा व्हायरस लसीकरण


आता अतिसार कमी करण्यासाठी  रोटा व्हायरस लसीकरण

हिंगोली,दि.4:  बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणुमुळे  होणारा अतिसार आणि यामुळे  होणारे बालमृत्यु रोखण्यासाठी आता आरोग्य विभागाकडून उपाययोजना आखल्या आहेत. अतिसाराला आळा घालण्यासाठी रोटा व्हायरस लसीकरण करण्यात येणार आहे. बालकांना  सदर लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सभागृहामध्ये सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्‍य  अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, यांची कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृह येथे आज घेण्यात आली.
 या कार्यशाळेला डॉ. मुजीब  सय्यद एस.एम.ओ. व डॉ. सावरगांवकर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. तुम्मोड म्हणाले की, सर्व संबंधितांनी या लसीकरणाचे प्रशिक्षण पूर्ण करुन निर्धारीत वेळेत रोटा व्हायरस लसीचा वापर  नियमित करावा.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार म्हणाले देशात रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांपैकी 40 टक्के मुले रोटा व्हायरसचे शिकार होतात. देशात 78 हजार मुलांचा यामुळे मृत्यू होतो. यातील 59 हजार मुले ही दोन वर्षाच्या आतील असतात.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास म्हणाले की, देशात दरवर्षी दीड लाख बालके जन्माला येतात. त्यामुळे या लसीकरणाचा फायदा त्यांना होईल. दीड महिना, अडीच महिना व साडेतीन  महिने असे तीन वेळा 2.5 एम.एल. लस तोंडावाटे दिली जाईल.
डॅा. मुजीब सय्यद म्हणाले, पहिल्या टप्प्यात चार राज्यात  ही लस सुरु  झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात साधारणत:  जून महिन्यात महाराष्ट्रासह 12 राज्यात रोटा व्हायरस  लसीकरणाची ही मोहीम सुरु होईल. यापूर्वी  ही लस खाजगी  रुग्णालयात  हजार ते पंधराशे  रुपयात मिळत होती. आता आरोग्य विभागामार्फत  ही लस मोफत मिळणार आहे.
यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीष रुणवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड,  डॉ. कोरडे, डॉ. देशमुख आदींची उपस्थिती होती.
नवजात बालकांना धोका
नवजात बालकांना रोटा व्हायरस विषाणुमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका अधिक प्रमाणात असतो. या व्हायरसचे संक्रमण झाल्यावर दोन तीन दिवसात लक्षणे दिसतात. प्रथम उलटी, मळमळ, संडास व त्यामुळे  शरीराचे डीहायड्रेशन व ईलेक्ट्रालाईट इम्बॅलेन्समुळे बालकाचा मृत्यू होऊ शकतो. पाच वर्ष  वयापर्यंत  बालक कूपोषित  होण्याचा धोका असतो. या रोगाचा कोणतीही चाचणी व विशेष उपचार उपलब्ध नसून केवळ लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. अनेकदा  सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील नवजात बालकांना रोटा व्हायरस  विरोधी लस घेता येणे परवडत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन  शासनाने आता रोटा व्हायरस लसीकरण मोहिम  हाती घेण्याचे ठरविले आहे.
****


पाणी टंचाई परिस्थितीवर नियंत्रण व समन्वयासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना


पाणी टंचाई परिस्थितीवर नियंत्रण व समन्वयासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना
हिंगोली, दि.4: महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन परिपत्रक दिनांक 26 ऑक्टोबर 2018 मध्ये निर्देशित केल्यानुसार
पाणी टंचाई  निवारण संदर्भात उपाय योजना करण्यासाठी व पाणी टंचाई  निवारण तक्रारी बाबत वस्तुस्थिती विचारात घेऊन अशा तक्रारींना वाव मिळू नये, यासाठी जिल्हा स्तरावर  उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी यांची नियुक्ती करुन पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीकोणातून नियंत्रण व समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर पाणी टंचाई नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 02456-221450 व टोल फ्री क्र. 02456-221077 असा असून जिल्ह्यातील पिण्याच्या पाणी टंचाई बाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी उपरोक्त क्रमांकावर आपल्या तक्रारी  नोंदवाव्यात. तक्रारींची दखल घेऊन तात्काळ नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हास्तर प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे.
****

उन्हाळी कराटे व स्क्वॅश क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


उन्हाळी कराटे व स्क्वॅश क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

       हिंगोली,दि.4: क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच हिंगोली जिल्हा स्पोर्टस कराटे असोसिएशन, हिंगोली डिस्ट्रीक्ट स्क्वॅश रॅकेट असोसिएशन  यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने कराटे व स्क्वॅश क्रिडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणार्थ तसेच त्यांचे आरोग्य सृदृढ होऊन खेळाची  आवड निर्माण करण्याकरिता स्क्वॅश या खेळाची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा  क्रीडा प्रशिक्षण केंद्र, हिंगोली येथे 15 दिवसांचे कराटे प्रशिक्षण  शिबिराचे आयोजन दि. 5 ते 20 मे 2019 या कालावधीत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, हिंगोली येथे करण्यात आले आहे. दिनांक 10 ते 30 मे 2019 या कालावधीत  स्क्वॅश या खेळाची प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
          सदर प्रशिक्षण शिबीर हे नि:शुल्क असून कराटे प्रशिक्षण शिबिराचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील शालेय मुले, मुली व युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे .

03 May, 2019

शहीद जवान संतोष चव्हाण यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप · शासकीय इतमामात शहिद संतोष चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार












शहीद जवान संतोष चव्हाण यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप
·   शासकीय इतमामात शहिद संतोष चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार

हिंगोली,दि.03: अमर रहे... अमर रहे... शहीद जवान संतोष चव्हाण अमर रहे..., भारत माता की जय..., वंदे मातरम... या देशभक्ती उत्तेजित करणाऱ्या घोषणांनी मौजे ब्राम्हणवाडाचे आसमंत निनादून गेले. महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालूक्यातील दादापूर येथे नक्षल्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात औंढा नागनाथ तालूक्यातील मौजे ब्राम्हणवाडा येथील सी-60 कमांडो जवान संतोष चव्हाण यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी मौजे ब्राम्हणवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मौजे ब्राम्हणवाडा येथील त्यांच्या शेतात शहीद जवान संतोष चव्हाण यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी  शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या तीन वर्षीय सुपूत्र तेजस याने मुखाग्नी दिला. यावेळी शहिद जवान संतोष चव्हाण यांच्या पत्नी अश्वीनी चव्हाण, लहान तीन महिन्याचा मुलगा योगेश चव्हाण, वडील देवीदास चव्हाण, आई भागूबाई चव्हाण, बहिण उषाबाई पवार, वंदनाबाई जाधव, नंदाबाई राठोड, रंजनाबाई राठोड आणि सिंधूताई राठोड यांच्यासह परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी साश्रु नयनांनी शहिद संतोष चव्हाण यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी आमदार संतोष टारफे, तान्हाजी मुटकुळे, रामराव वडकुते, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक आर. बी. जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी प्रविण फूलारी, तहसीलदार अनिल माचेवाड यांनी शहिद संतोष चव्हाण यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वा‍हिली. यावेळी सर्व मान्यवरांनी शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.
सुरूवातीस शहीद जवान संतोष चव्हाण यांचे पार्थिव औंढा नागनाथ शहरात आले असता, अनेक नागरिकांनी अमर रहे… च्या घोषणा देत पूष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
यावेळी अंतिम संस्काराला लोकप्रतिनिधी, पोलीस दलाचे अधिकारी-कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
****



01 May, 2019




महाराष्ट्र राज्याची  विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती
पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली,दि.01: महाराष्ट्र राज्याची 1 मे, 1960 रोजी स्थापना झाली. तेव्हा पासूनच राज्याने शिक्षण, आरोग्य, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून, त्यामुळेच आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
येथील पोलिस कवायात मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी श्री. कांबळे हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय वन अधिकारी केशव वाबळे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी रामदास पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री कांबळे म्हणाले की, देशाच्या विकासात आपल्या महाराष्ट्र राज्याचा खुप महत्वाचा मोठा वाटा आहे.  1 मे, 1999 रोजी निर्माण झालेल्या आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या स्थापनेचा आज वर्धापन दिन  आहे. विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, ही आनंदाची बाब असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता शासन कटीबध्द आहे. तसेच  जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल. त्याकरीता समन्वय आणि सहकार्याची भावना ठेवत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्व जण एकजुटीने प्रयत्न करु यात असे आवाहन ही श्री. कांबळे यांनी यावेळी केले. तसेच जगात आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही साजरा होत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा खुप महत्वाचा वाटा असल्याचे सांगुन श्री कांबळे यांनी कामगार बंधुना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
            प्रारंभी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, अग्निशमन दल, श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद विरोधी वाहन, आपत्ती व्यवस्थापन आरोग्य विभागाचे आरोग्य पथक संचलनात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
            कार्यक्रमांचे सुत्र संचलन मदन मार्डीकर यांनी केले. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

****



महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

            हिंगोली, दि.01:  जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.   
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, सह जिल्हा निबंधक संजय पाटील, राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्राचे बारी सिद्दिकी, खुदाबक्श तडवी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील अधिकारी - कर्मचारी यांची उपस्थिती होती.