25 August, 2016

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानात गणेश मंडळांनी सहभागी व्हावे
29 ऑगस्ट पर्यंत तालुका गट शिक्षणाधिकाऱ्याकडे अर्ज करण्याचे गणेश मंडळांना आवाहन

हिंगोली,दि.25: राज्याच्या पर्यटन व सांस्कृतीक विभागामार्फत लोकमान्य महोत्सव व लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान-2016 या वर्षीपासून राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील जास्तीत-जास्त गणेश मंडळांनी या अभियानात सहभागी होऊन, समाजपयोगी उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करुन जिल्ह्याचा  लौकिक वाढवावा, असे आवाहन आज येथे लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान तसेच लोकमान्य उत्सव या निमित्ताने आयोजित बैठकीत करण्यात आले.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अभियान समिती सदस्य बसवराज मंगरुळे, पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, जिपचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, श्रीमती अनुराधा ढालकरी, अतिरीक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांची प्रमुख उपस्थीती होती.
बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या अभियानातील स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी  होण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि अभियानाचे सदस्य बसवराज मंगनाळे यांनी केले. ‘स्वराज्य...हा माझा जन्मसिदध हक्क आहे..आणि तो..मी मिळवणारच’ या उद्गारास 100 वर्ष पुर्ण असून हे वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे 160 वी जयंती वर्षे आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त साधून हे सांस्कृतिक उपक्रम राज्यात यंदा वर्षभर राबविण्यात येणार. सार्वजनिक गणेशोत्सव अभियानात सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन संकल्पनेवरील देखावा तयार करणे आवश्यक असणार आहे. या स्पर्धेसाठी 29 ऑगस्ट 2016 पर्यंत अर्ज तालूका शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहेत.
उत्कृष्ट गणेश मंडळाना तालुकास्तरासाठी अनुक्रमे 25 हजार, 15 हजार व तृतीय क्रमांकासाठी  10 हजार रुपये असे बक्षिस असणार आहे. तर जिल्हास्तरासाठी प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार तर तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे बक्षिस आहे.  विभागीय स्तरावर अनुक्रमे 2 लाख, 1 लाख 50 हजार आणि एक लाख रुपये अशी बक्षिसे असणार आहेत.
यावेळी बैठकीस पोलीस उपविभागीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी / प्रतिनीधींची  उपस्थिती होती.
*****





No comments: