05 January, 2018

जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू



वृत्त क्र.07                                                                                दिनांक : 05 जानेवारी 2018 
जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 05 :  जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत दिनांक 7  जानेवारी रोजी पोलीस पाटील पदाची परीक्षा होणार असून, दिनांक 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांत सण साजरा होणार आहे. तसेच दिनांक 1 जानेवारी रोजी  भिमा कोरेगाव येथे झालेल्या  भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदने, रास्ता रोको , बंद वगैरे  अशा घटना  घडत  असल्याने  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता  नाकारता येत नाही . तसेच रामलीला मैदान हिंगोली  येथील फेरीवाल्यांच्या प्रश्नांवरुन असंतोषाचे  वातावरण  आहे , शेतकऱ्यांच्या मालाला भाव , शेतकऱ्यांना  वीज जोडणी , लोडशेडींग अशा वेगवेगळ्या  प्रश्नांमुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको अशा विविध  प्रश्न हाताळण्यासाठी  व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता  संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 5 जानेवारी 2018 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 19 जानेवारी 2018 रोजीचे  24.00 वाजेपावेतो मुं मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील याउद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
000000

No comments: