छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत
कर्जमाफीची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी
-- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली, दि.25: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीची
रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया पुर्ण
करावी. तसेच या योजनेपासुन एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता
घेण्याच्या सूचना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेच्या आढावा बैठकीत श्री. कांबळे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष
बाबाराव बांगर, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ
पठाण, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक श्री. शिंदे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार
यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी
सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लवकरात-लवकर त्यांची
कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून, लवकरच सदर
रक्कम खात्यावर जमा होणार आहे. संबंधीत विभागानी आणि बँकांनी याद्या प्राप्त होताच
संबंधीत लाभार्थ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करावी.
जिल्हा उपनिबंधक श्री. मेत्रेवार यांनी कर्जमाफी योजनेची माहिती
सादर करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत
जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार 385 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 37 हजार 228
लाभार्थ्यांना 120 कोटी 53 लाख कर्जमाफी झाली असून आतापर्यंत 33 हजार 461
लाभार्थ्यांच्या खात्यावर 103 कोटी 38 लाख 50 हजार रक्कम जमा झाली आहे. बँकांनी
दिलेली कर्ज खात्यांची माहितीतील त्रूटी आणि शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रूटीमुळे
उर्वरीत शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत लाभ मिळाला नाही. सदर उर्वरीत शेतकऱ्यांच्या
अर्जातील त्रूटी दूर करण्याचे काम सुरु असून जशा याद्या प्राप्त होतील तशा संबंधीताच्या खात्यावर रक्कम जमा
करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मेत्रेवार यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी, बैठकीत उपस्थित
अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून सदर योजनेबाबत सूचना जाणून घेतल्या. यामध्ये सदर
योजनेमध्ये प्रोत्साहनपर रक्कम ही 50 हजार वाढवावी. आत्महत्याग्रस्त आणि मयत
शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी. समझोता योजना (ओटीएस) मधील शेतकऱ्यांना
कर्जमाफीची दीड लाखाची रक्कम आधी देण्यात यावी. सदर सूचना मा. मुख्यमंत्री
यांच्याकडे सादर करणार असून याबाबत पाठपूरावा करणार असल्याचे श्री. कांबळे यावेळी
म्हणाले.
आढावा बैठकीस यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी, बँक व्यवस्थापक
यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment