12 January, 2018

जिल्हा कृषि महोत्सवासाठी संपर्क कक्षाचे उद्घाटन संपन्न

            हिंगोली, दि. 12 : महाराष्ट्र शासनाने जिल्हानिहाय कृषि महोत्सवाचे आयोजन जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तसेच कृषि व संलग्न विभागांच्या सहभागाने रामलीला मैदानावर दि. 10 ते 14  फेब्रुवारी, 2018 या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरीता स्वतंत्र संपर्क कक्षाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सहकार व पणन सुधीर प्रभु मेत्रेवार यांचे हस्ते प्रकल्प संचालक आत्मा यांचे कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे, प्रकल्प संचालक आत्मा तथा सदस्य सचिव जिल्हा कृषि महोत्सव एम. डी. जाधव, प्रकल्प उपसंचालक आत्मा एम. डी. तिर्थकर, कृषि उपसंचालक, एस. व्ही. लाडके व कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विषयक योजनांची माहीती सामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचविणे,  शेतकरी - शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार -शेतकरी - विपणन साखळी सक्षमीकरण करण्याकरीता तसेच समुह/गटांना संघटीत करून स्थापीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता वृध्दींगत करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व ग्राहकाला उच्च दर्जाचा शेतमाल मिळण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे, कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता व खरेदीदार यांना एकत्र आणून बाजाराभिमुख कृषि उत्पादन आणि विपणनास चालऩा देणे असे विविध उद्देश ठेवून        यावेळी बोलताना जिल्हा उपनिबंधक यांनी या संधीचा फायदा जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी समुह, महिला समुह, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, विविध कृषि निविष्ठांच्या कंपन्या व डीलर्स, कृषि यांत्रिकीकरणाशी संबंधी कंपन्या, सुक्ष्म सिंचन साहीत्य पुरवठादार कंपन्या, प्रक्रिया उद्योजक, खाजगी बाजार, शासकीय व निमशासकीय कृषि संलग्न विभाग यांनी घ्यावा. यासाठीच कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार व पणन विभाग सर्व योजनांचा प्रचार व प्रसार करून संपूर्ण मनुष्यबळासह उपस्थित राहील असे सांगीतले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीव ओतून शेतकऱ्यासाठी या महोत्सवात काम करण्याचे आवाहन केले.
             प्रकल्प संचालक आत्मा एम. डी. जाधव यांनी विविध शास्त्रज्ञांचे विविध कृषि विषयक तंत्रज्ञानावर आधारीत मार्गदर्शनाकरीता परिसंवाद सभामंडपासहीत चार भव्य प्रदर्शन दालने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्रे, विक्रेता खरेदीदार संम्मेलन, शेतकरी सन्मान समारंभ, धान्य महोत्सव या कृषि महोत्सवातील प्रमुख बाबी असतील. जिल्ह्यातील कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्था, उपक्रम यांचा यथोचीत सत्कार या महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पिकविल्या जाणाऱ्या शेतमालाची ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी स्वतंत्र दालन, विविध कृषि निविष्ठा, कृषि यांत्रिकीकरण कंपन्या, सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया उद्योजक यांना या निमित्ताने आपापल्या उत्पादनासहीत निमंत्रीत केले जाईल. यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाची एकत्रित माहिती जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मिळेल. कृषि, पणन, पशुसंवर्धन, सहकार, रेशीम उद्योग, वखार महामंडळ, मत्स्यविकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, बियाणे महामंडळ, इ. शासकीय व निमशासकीय विभाग तसेच  खाजगी बीजोत्पादन कंपन्या, खते व किड संरक्षण औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचेकडील तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार या महोत्सवाच्या माध्यमातून करणार आहे.
            जिल्हा कृषि महोत्सवात सहभाग घेवू इच्छिणाऱ्या कंपनी व शेतकऱ्यांनी नोंदणी कक्षाचे संपर्क अधिकारी गजानन कन्हेरकर (संपर्क क्र  7588434672) यांचेशी संपर्क साधावा.
*****




वृत्त क्र. 17                                                                                                        दिनांक : 12 जानेवारी 2018
एचएएम रेडिओ प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन
            हिंगोली, दि. 12 : नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्तीमध्ये तात्काळ मदत कार्य पोचवण्यासाठी व शोध व बचाव कार्य करण्यासाठी संपर्क यंत्रणा महत्वाची व गरजेचे असते. हिंगोली जिल्ह्यात शासनामार्फत एचएएम रेडिओ (HAM RADIO) संपर्क यंत्रणा येत्या काळात कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी एचएएम रेडिओ प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
पुर, भूकंप, वादळी वारे व इतर आपत्तीमध्ये टेलिफोन, मोबाईल तसेच इंटरनेट इत्यादी संपर्क यंत्रणा प्रभावित झालेल्या असतात. मात्र यावेळी एचएएम रेडिओ (HAM RADIO), व्हीएचएफ (VHF) वायरलेस या संपर्क यंत्रणेचा वापर करून एकमेकांमध्ये समन्वय साधून आपत्तीत मदत कार्य पोचवता येते. या यंत्रणेच्या वापरासाठी आपत्ती काळात तज्ज्ञ मनुष्यबळाची जिल्हाधिकारी कार्यालयास गरज आहे.
याकरीता सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत HAM RADIO चे प्रशिक्षण, त्यानंतर केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागामार्फत HAM RADIO ची परीक्षा व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाचा HAM RADIO वापराचा परवाना देण्यात येईल. यासाठी लागणारा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाकरीता शासकीय/निमशासकीय विभागाचे अधिकारी/कर्मचारी, निवृत्त सैनिक, इतर निवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरीक इत्यादी या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करू शकतात. तरी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी दि. २० जानेवारी, २०१८ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास संपर्क साधावा. (मो. क्र.९४०५४०८९३९), असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

No comments: