04 January, 2018

ध्वज दिन निधी संकलन म्हणजे सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी - जिल्हाधिकारी अनिल भंडारी



वृत्त क्र.06                                                                                दिनांक : 04 जानेवारी 2018 
           ध्वज दिन निधी संकलन म्हणजे सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी

                                                        -  जिल्हाधिकारी अनिल भंडारी
   
        सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहीमेचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते उद्घाटन
हिंगोली,दि. 4: जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे सशस्त्र सेना दल शौर्य, गुणवत्ता, शिस्त व सेवाभाव या बाबतीत सर्वोत्तम असून संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेचे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन निधी संकलन होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात सशस्त्र ध्वज दिन संकलन मोहिमेचे उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उप जिल्हाधिकारी (सा.प्र)) पी.एस. बोरीकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. भंडारी म्हणाले की, लष्करी अधिकारी, जवान आपल्या कुटूंबियांची पर्वा न करता देशाला सुरक्षा कवच प्रदान केले असल्यानेच आपला देश आणि आपण सुरक्षित आहोत. देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना सैनिक सण, समारंभ, कार्यक्रम आणि आपले कुटूंब यांचा काहीही विचार न करता ते देशाच्या सेवेत कार्यरत असतात. अशा लष्करी अधिकारी-जवानांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सैन्याच्या बलीदानामुळे देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. सैन्यातील सुमारे 90 टक्के सैनिक हे 35 ते 40 या वयात सेवानिवृत्त होतात. त्यांचे देशाच्या संरक्षणामध्ये मोठे योगदान आहे. यामुळेच सैनिका आणि त्यांच्या कुटूंबियासाठी निधी संकलन करणे हे समाजकार्यातील मोठे योगदान असल्याचे हि भंडारी यावेळी म्हणाले.
जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यावेळी म्हणाले की,  देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक सदैव कार्यरत असतात. सैनिक त्यांच्या कुटूंबियासाठी विविध कल्याणकारी उपक्रम व मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य असून यामध्ये सर्वांनी जास्ती-जास्त निधी जमा करावा.
पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यावेळी म्हणाले की, प्रतिकुल परिस्थितीमध्ये सशस्त्र सेना दल सदैव देशाचे रक्षणकरीता तयार असतात. त्याचप्रमाणे नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी देखील ते नेहमी आपले कर्तव्य पार पाडत असतात.                                                                                       
यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या शर्टला सशस्त्र सेनेच्या ध्वजाची पोस्टेज स्टॅम्प आकाराची प्रतिकृती चिकटवून सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी 2017 या वर्षाकरिता उभारण्यात येत असलेल्या ध्वज निधीला आपले वैयक्तिक योगदान दिले. देशसेवा करीत असताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचे कुटुंबीय तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, अत्यंविधीसाठी आर्थिक मदत, मतीमंद पाल्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, वसतीगृह आवास तसेच शिष्यवृत्तीसाठी ध्वज आदीकरीता ध्वज दिन निधी वापरण्यात येतो .
शासनामार्फत सन 2016 ध्वजदिन निधी संकलनाकरीता जिल्ह्यास रु. 28 लाख 45 हजार रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी उदिष्टाच्या 95.90 टक्के म्हणजे रु. 27 लाख 29 हजार उद्दिष्ट साध्य झाले आहे. तर 2017 वर्षाकरीता जिल्ह्यास रु. 19 लाख 92 हजार 144 एवढे निधी संकलनाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत यापैकी रु. 5 लाख 44 हजार उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
 यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते माजी सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले.
यावेळी येथील गंगाराम देवडा अंध विद्यालयातील विद्यार्थीनीनी स्वागत आणि देशभक्तीपर गीत सादर केली. कार्यक्रमात माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीय यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

****



No comments: