01 January, 2018

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ




वृत्त क्र.01                                                                                          दिनांक : 01 जानेवारी 2018

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ

·   प्रधानमंत्री मुद्रा योजनेची चित्ररथाद्वारे 26 दिवस 78 गावात प्रसिध्दी


            हिंगोली,दि.01 : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, गरजू व्यक्ती व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखिवणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या व्यापक प्रसिध्दीकरीता तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा आज 01 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी.एस. ढावरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            या चित्ररथावर शिशु गटामध्ये 50 हजार रूपयांपर्यंतचे कर्ज, किशोर गटामध्ये 50 हजार ते 5 लाख रूपयापर्यंतचे कर्ज आणि तरूण गटामध्ये 5 लाख ते 10 लाख रूपयापर्यंतचे कर्ज देण्यात येत असल्याचा संदेश लावण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेचे स्वरूप, या कर्जासाठी कोणतेही आनुषांगीक शुल्क नाही, सवलतीची प्रक्रिया शुल्क, कमी व्याजदर, संयुक्तीक परतावा, कालावधी, मुद्रा कार्डद्वारे खेळते भांडवली कर्ज ही या कर्जाची मुख्य वैशिष्टे आहेत. मुद्रा कार्ड प्राप्त करा हा संदेशही या चित्ररथावर देण्यात आला. मुद्रा योजना विषयक 4 ऑडिओ जिंगल्सद्वारे योजनेचा प्रचार प्रसार होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यास हा आकर्षक चित्ररथ उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात 26 दिवस हा चित्ररथ विविध 78 गावात भ्रमण करणार आहे.
            बसस्थानके, बँका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय, महत्वाचे चौक, महत्वाची शासकीय कार्यालय, आठवडी बाजार, तालुक्यातील महत्वाच्या गावामध्ये जाणार आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवती, गरजू व्यक्ती व महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यास चित्ररथाची महत्वाची भूमिका राहणार आहे.
0000

No comments: