26 January, 2018

घटना दूरुस्तीमुळे वंचीत व दुर्लक्षीत घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली
                                                                        -- पालकमंत्री दिलीप कांबळे

हिंगोली, दि.26: स्थानिक स्वराज्य संस्थाना घटनात्मतक दर्जा देऊन त्रिस्तरीय व्यवस्था विकसीत करण्यात आलेल्या 73  74 व्या घटनादूरुस्तीला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाले आहे. घटना दूरुस्तीमुळे वंचीत व दुर्लक्षीत घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाल्याचे  प्रतिपादन सामाजीक न्याय राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी राज्याच्या व जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,  उपजिल्हाधिकारी खुदाबक्क्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री. बोरगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, 73  74 व्या घटनादूरुस्तीमुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे. लोकशाहीमध्ये लोकसहभाग हा सकारात्मक असणे आवश्यक आहे. लोकशाही समाजातील उच्च स्तरातील अधिकारापासून तळा-गाळातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही लोकशाही समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही बळकट करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. पारदर्शक निवडणूकाद्वारे निवडून दिलेल्या शासनाने सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजावून घेत त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हाच सुशासनाचा मुलमंत्र आहे.
            महाराष्ट्राने विविध क्षेत्रात विकासात्मक भरारी घेतली असून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवून राज्यात पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी शाश्वत पाण्याची उपलब्ध करण्याच्या कामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हिंगोली जिल्ह्यानेही या उपक्रमात गती घेऊन प्रगती केली आहे. मागील दोन वर्षात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 304 गावे निवडून तेथे कामे घेण्यात आले आहे. त्यातून 5 लाख 50 हजार टी.सी.एम. पाणीसाठा व 50 हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी  लाभ घेतला. गतवर्षी 80 सामूहिक शेततळी पूर्ण झाली. प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेअंतर्गत 6 हजार शेतकऱ्यांनी ठिबक-तुषार संच बसविले. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 76 ट्रॅक्टर व 216 औजारांचे गरजूंना वितरण झाले. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील 240 गावांची निवड करण्यात आली.
            याशिवाय स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत 3 नगर परिषदा व 2 नगर पंचायतीचे पूर्ण भाग हागणदारीमुक्त घोषित झाले. 563 पैकी 396 ग्रामपंचायतींनी  या कामात यश मिळविले. जिल्ह्यातील सर्व 883 जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्याने जिल्हा प्रथम पुरस्कार विजेता ठरला. महारेशीम अभियानातंर्गत रेशीम उत्पादनामध्ये जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच जिल्ह्यातील 7/12 ऑनलाईनचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना संगणकीय 7/12 कोणत्याही वेळी उपलब्ध होण्यासाठी 7/12 एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व 795 रास्त भाव दुकानात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरीत करण्यात येत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत जिल्ह्यातील 15 हजारहून अधिक लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन देण्यात आल्याचे सांगितले.
            यावेळी मंत्री महोदयांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, डिजिटल शाळा, आय.एस.ओ. मानांकन प्राप्त 32 पशु वैद्यकीय दवाखाने आदींच्या प्रगतीची सविस्तरपणे माहिती दिली.

            राज्याप्रमाणेच प्रगतीच्या क्षेत्रात अग्रभागी राहण्याचा हिंगोली जिल्ह्याने सतत प्रयत्न केला असे गौरवोदगारही त्यांनी यावेळी काढले.
            प्रारंभी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, अग्निशमन दल, नॅशनल कॅडेट कोर, श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद विरोधी वाहन, आपत्ती व्यवस्थापन चित्ररथ, मुद्रा बँक योजना चित्ररथ, सामाजीक वनीकरणाचा हरीत चित्ररथ, आरोग्य विभागाचे आरोग्य पथक यांच्यासह विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी देखील या संचलनात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
            कार्यक्रमांचे सुत्र संचलन डॉ. निलावार यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येनी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


*****

No comments: