महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा बुटकँपचे 26 ऑक्टोबर रोजी आयोजन
हिंगोली, दि. 24: उद्योग मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र राज्य नाविन्यता
सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात दिनांक 3 ऑक्टोबर, 2018 ते 3 नोव्हेंबर,
2018 या कालावधीमध्ये महाराष्ट्र स्टार्ट अप
यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रेचा बुट कँप आदर्श कला, वाणिज्य व
विज्ञान महाविद्यालय, हिंगोली येथे दिनांक 26 ऑक्टोबर 2018, शुक्रवारी रोजी सकाळी
9:30 वाजता करण्यात आला आहे. यामध्ये कोणतेही विद्यार्थी/भावी उद्योजक स्वत: उपस्थित
राहून आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना (Business Idea) सादरीकरण करु शकतील. यामध्ये
निवड होणाऱ्या 3 ते 5 संकल्पना धारकांचे नागपूर येथे दि 1 व 2 नोव्हेंबर रोजी गहन प्रशिक्षण
होईल आणि दि 3 नोव्हेंबर रोजी महाअंतीम फेरी होईल यामध्ये निवड होणाऱ्या संकल्पनाधारक
व नवउद्योजकांना पारितोषीक व इनक्युबेशन ऑफर देण्यात येईल.
स्टार्ट अप इंडिया योजना घोषीत
झाल्यानंतर अलिकडच्या काही वर्षात उद्योजकता विकासास वेग प्राप्त झाला आहे. तसेच टायर
2 आणि टायर 3 शहरामधील नाविन्यपूर्ण स्टार्ट अपच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि
लहान शहरातील उद्योजकही यात लक्षणीय प्रगती करित आहेत. क्षेत्रीय स्तरावरील ही लक्षणीय
क्षमता/प्रतिभा टॅप करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र स्टार्ट अप आयोजन करण्यात आले
आहे. या माध्यमातून लहान शहरातील आश्वासक उद्योजकांना आकर्षित करणे, त्यांना त्यांच्या
उद्योजक होण्याच्या आकांक्षा पुर्तीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल.
स्टार्ट अप या विषयातील मार्गदर्शन,
संसाधने, इन्क्युबेटर, ॲक्सेलरेटर यासारखे स्टार्टअपशी संबधित विविध कार्यक्रम, निधी
मिळविण्याची सर्वात महत्वाची प्रक्रिया आणि स्टार्टअपशी इको सिस्टिम कडून स्टार्टअपना
मिळणारे फायदे हे सर्वच इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असणाऱ्या एका विशिष्ट वर्गापर्यंत
मर्यादित आहेत. ही परिस्थिती बदलणे आणि महाराष्ट्रातील छोटया शहरामध्ये स्टार्ट अप
सिस्टिम रुजवणे हे या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे ध्येय आहे.
महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा
या उपक्रमांतर्गत स्टार्ट अप व्हॅन, बुट कँप माध्यमातून राज्यातील 23 जिल्हयामध्ये
शैक्षणिक संस्थेच्या मदतीने स्टार्ट अप व उद्योजकता विषयक जनजागृती स्टार्ट अप विश्वातील
नामांकित यशोगाथा व उद्योजकता विकास विषयक माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर सदर स्टार्ट
अप यात्रेमध्ये भारतीय स्टार्ट अप विश्वातील नामांकित मराठी स्टार्ट अप उद्योजक देखील
सहभागी होणार असून, सहभागी नवउद्योजकांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येईल. तसेच विविध
कार्यशाळेच्या माध्यमातून स्टार्टअपशी संबधित विविध विषयामध्ये मागदर्शन करण्यात येईल.
सदर बुट कँप मध्ये सहभागी होण्यासाठी www.msins.in किंवा www.startupindia.gov.in या
संकेत स्थळावर नोंदणीकृत होता येईल. तसेच बुट कँप स्थळीसुध्दा सकाळी 09:30 ते कार्यक्रम
सुरू होईपर्यंत प्रत्यक्ष नोंदणी करता येईल.
सदर नोंदणी व सहभाग विनाशुल्क आहे.
दि. 26 ऑक्टोबर 2018 रोजी आदर्श
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली येथे आयोजीत केलेल्या बुट कँपसाठी विविध
स्तरातील व्यवसाय/उद्योग या संबधित संकल्पनेसह विद्यार्थी व नवउद्योजकांनी मोठया संख्येने
सहभागी व्हावे असे आवाहन सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, व प्राचार्य,
आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली व कार्यक्रमाचे समन्वयक तथा सहायक
प्राध्यापक डॉ. जोशी यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment